Add

Add

0
वंचित समाजासाठी सामाजिक दृष्टिकोन बदलणे गरजेचे..दादासाहेब इदाते यांचे प्रतिपादन
                ; ‘संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत

पुणे(प्रतिनिधी):-“ प्रत्येकाच्या मनातून जो पर्यंत जात जात नाही तो पर्यंत या देशातील सामाजिक स्थिति मध्ये आमूलाग्र परिवर्तन होणार नाही.आजही देशातील वंचित समाज हा सामाजिक अंधश्रद्धेमधून मुक्त झालेला नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रतिज्ञेला सत्यात उतराविले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे की अशा समाजाला सामावून घेतले पाहिजे.” असे प्रतिपादन भटक्या व विमुक्त जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर- तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 23व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना ‘जे का रंजले ते गांजले’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते. 
तसेच, याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आय.के.भट, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे व एमआयटीचे प्राचार्य डॉ.एल.के. क्षीरसागर हे उपस्थित होते. 
दादा इदाते म्हणाले,“ जे का रंजले, गांजले या वाक्य कीर्तनापुरतेच उरले आहे. त्यानुसार देशात उपेक्षित कोटयवधी लोकांचा उध्दार व त्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी कोणीही कृती केलेली नाही. मनुष्य हा परमात्म्याचे रूप असेल तर मानवा मानवात भेदा भेद दिसता कामा नये.
वंचित समाजानेच या देशाची संस्कृती उभी केली आहे, त्यामुळे वर्तमानकाळात इतिहासाचा अभ्यास करून भविष्यकाळ मजबूत केल्यास वंचित समाजाच्या बर्‍याच प्रश्‍नांचे निराकरण होईल. वंचितासाठी काहीही केले गेले नाही, तर येणारा काळ सर्वांसाठीच घातक ठरेल.
 अमेरिकेत स्वामी विवेकानंद यांनी 7 मिनिटात संपूर्ण जग जिंकले होते. पण, जेव्हा भारत भूमीत त्यांनी पाय ठेवला तेव्हा येथील वंचित समाजाची स्थिती पाहून त्यावेळेस वेड्याचे इस्पितळ हा शब्द त्यांनी उच्चारला होता. तीच स्थिती आजच्या काळातही दिसून येत आहे. आता आमच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. देशातील उग्र प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी आपल्या दृष्टिकोनात परिवर्तन करून परिस्थिती बदलावी लागेल. तुझे आहे तुजपाशी या शब्दाचा अर्थ समजून घेऊन प्रत्येक भारतीयाने सभोवतालच्या समाजाची जाणीव ठेऊन कार्य करावे.
संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम हे मनोवृत्ती मजबूत करण्याचा पाया आहे. तसेच महाभारत, रामायण या शिवाय मानवधर्म पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच अशा वंचितांची समस्या सोडविण्यासाठी अध्यात्माची पार्श्‍वभूमी असेल तर ते कार्य पूर्णत्वास होईल.”
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ आमच्या बालपणी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्यापेक्षाही अधिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगणारे लोक आहेत. त्यांना दादांच्यासारखे मार्गदर्शक लाभले तर तेही आपली प्रगती करून घेऊ शकतील.”
सकाळच्या सत्रात मंदार भारदे व गिरीश दाबके यांची व्याख्याने झाली.
मंदार भारदे म्हणाले, आपली जात व आपला धर्म हे आपल्याला जन्मानेच  प्राप्त होतात. त्यामुळे त्या चौकटीतच विचार करण्याची आपणास सवय लागते.  पण त्यामुळे आपला विकास होत नाही. आपण स्वतंत्रपणे विचार करावयास शिकले पाहिजे. त्यातूनच आपले आचार बदलतात. जगात जेवढी माणसे आहेत तेवढे विचार अस्वितात येतील. असा स्वतंत्र विचार ज्ञानेश्‍वर व तुकाराम यांनी केला. म्हणूनच सर्व जगाला मान्य होईल व आदरणीय वाटेल अशी निर्मिती ते करू शकले. आपणेही याच प्रकारे वागून स्वतंत्रपणे चिंतन केले पाहिजे. 
गिरीष दबके म्हणाले, परकियांनी ज्या प्रकारे प्रचार केला आहे त्या प्रमाणे आपला देश मागासलेला मुळीच नव्हता. हा  देश समृध्द होताच. पण, येथे समाजाला आवश्यक असलेल्या अनेक यंत्रणा होत्या. येथील शिक्षण पध्दती उत्तम होती. प्राचीन बांधकामे पाहिली, तर आपली स्थापत्य कला, गणित, व इतर अनेक शास्त्रे पराकोटीला पोहचलेली होती असे दिसेल. १८२० मध्ये सुध्दा आपला देश भरभराटीला आलेला होता. ब्रिटिशांनी हेतू पुरस्सर असा प्रचार केला आहे की त्यांनी भारतात प्रवेश केल्या नंतरच देश आधुनिक शास्त्रांनी व विद्यांनी युक्त बनला. दुर्देवाने आम्हा भारतीयांनाच आपल्या उज्ज्वल इतिहासाची कल्पना नव्हती. म्हणूनच भारतीय अस्मिता जागविण्याचे कार्य येथील नेत्यांना करावे लागले.
डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. एल.के.क्षीरसागर यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top