Add

Add

0
अराजकाच्या परिस्थितीत देशरक्षणासाठी हिंदूच पुढाकार घेतील ! -  अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर

*शिरवळ  हिंदु राष्ट्र-जागृती सभेत दुमदुमली हिंदु राष्ट्राची ललकारी

शिरवळ (जिल्हा सातारा) - हिंदूंच्या प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. शस्त्रपूजन हा हिंदूंचा अधिकार आहे. आज देश अराजकाच्या आणि गृहयुद्धाच्या दिशेने चालला आहे. दाभोलकर, लंकेश यांच्या पाठिंब्याने नक्षलवादी सोकावले आहेत. जेव्हा हा देश कोलमडून टाकण्यासाठी नक्षलवादी रस्त्यावर उतरतील, जेव्हा अराजक माजेल, तेव्हा देशरक्षणासाठी हिंदूच पुढाकार घेतील आणि या देशाला हिंदु राष्ट्र बनवतील.  बलशाली मनगट आणि कणखर ह्रदय असणारे साधक आणि संन्यासी योद्धेच करू शकतील, असे जाज्वल्य प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले.23 डिसेंबर या दिवशी ज्ञान संवर्धिनी शाळेच्या मैदानात हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्यांनी पुरोगा म्यांच्या आतंकवादाचा समाचार घेत हिंदु विधीज्ञ परिषदेच्या यशस्वी लढ्याविषयी सर्वांना अवगत केले. या विराट सभेला सनातन संस्थेच्या सद्गुरू(कु.) स्वाती खाड्ये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनीही संबोधित केले. येवली, पळशी, भांबवडे,कापूरहोळ,विंग,मोर्वे, खानापूर, आळंदेवाडी अशा जवळपासच्या 100 हून अधिक गावांमधून प्रसार करण्यात आला होता. 4 सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. 
शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने सभेला प्रारंभ झाला.त्यानंतर मान्यवर वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर झालेल्या वेदमंत्रपठणाने सभास्थळी चैतन्य निर्माण झाले. या सभेच्या निमित्ताने सनातनचा नूतन ग्रंथ  ‘मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर अधिक श्रेष्ठ’ याचे प्रकाशन अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या हस्ते, तसेच वर्ष 2019 च्या सनातन पंचांगाचे आय.ओ.एस. प्रणालीचे प्रकाशन सनातनच्या सद्गुरू (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते करण्यात आले.  मालेगाव स्फोट प्रकरणात जामिनावर सुटलेले श्री. समीर कुलकर्णी, तसेच हिंदुत्वनिष्ठांची न्यायालयात बाजू परखडपणे मांडणारे अधिवक्ता धर्मराज चंडेल या धर्मवीरांचा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवर वक्त्यांची भाषणे झाली. सभेच्या शेवटी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी घोषणांच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद देत हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा केली. 

अन्वेषण यंत्रणांचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी ‘क्षात्रधर्म साधना’ 
              या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करणार ! - सद्गुरु (कु.) स्वाती खाडये  
  सनातन संस्थेची मुस्कटदाबी करण्यासाठी अन्वेषण यंत्रणांनी नवनवीन मसालेदार कथा रचत सनातन संस्थेचा ‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा जावईशोध लावला आहे. या ग्रंथांमध्ये महाभारतातील वचने आणि शिकवण यांचा समावेश आहे. मागणीच्या अभावी या ग्रंथांचे पुनर्मुद्रण सनातन संस्थेने थांबवले होते; पण अन्वेषण यंत्रणांचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी आम्ही या ग्रंथांचे पुनर्मुद्रण करू आणि जाहीररित्या ते प्रकाशित करू. सनातन नावाची दहशत समाजात निर्माण व्हावी आणि समाज संस्थेपासून दूर व्हावा, अशी काँग्रेसची कूटनीती होती.आता हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍यांचे शासन असूनही तीच नीती चालू आहे.हिंदु राष्ट्राचा उद्घोष करत असल्यानेच सनातन संस्थेची मुस्कटदाबी केली जात आहे; मात्र ‘कोंबडा कितीही झाकला, तरी सूर्य उगवतोच’ हे धर्मविरोधकांनी लक्षात घ्यावे', असा घणाघात सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केला.

हिंदु धर्मासाठी कृतीशील व्हा ! - सुनील घनवट
 आज हिंदु धर्मावर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. एकेकाळच्या विराट भारताची शकले होऊन अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आदी भूभाग भारतापासून विलग झाले. सध्याही देशाच्या विविध राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य होत आहेत. हिंदूंना जातीपातींत विभागण्याचे षड्यंत्र चालू आहे. मंदिरांचे सरकारीकरण होते; मात्र मशिदी आणि चर्च कह्यात घेण्याचा कुणी विचार करत नाही. अवैध असल्याचे सांगत हिंदूंची मंदिरे भुईसपाट केली जात आहेत; मात्र पोलीस प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले थडगे उखडत नाहीत. हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात जात-पात-संप्रदाय, गटतट विसरून हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक आहे. 
       सभेच्या प्रवेशद्वारापाशी क्रांतीकारकांच्या वेशभूषेतील बालकार्यकर्त्यांचा उभारण्यात आलेला प्रबोधन कक्ष विशेष लक्षणीय ठरला. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीमध्ये 8 ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्याची धर्माभिमान्यांनी सिद्धता दर्शवली. फेसबूकच्या माध्यमातून सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्या माध्यमातून 20 सहस्र लोकांनी सभा पाहिली, तर 34 सहस्र लोकांपर्यंत सभेचा विषय पोहोचला. 

Post a Comment

 
Top