Add

Add

0
                     सुखाचा  'नॉस्टॅल्जिया'  ... 


आमच्या काळात असं नव्हतं...' या डायलॉगवरून निघालेली उपदेश एक्स्प्रेस 'शाळेसाठी पाच-पाच किलो मीटरची पायपीट, कापडी पिशव्यांची दप्तरं, ठिगळाच्या चड्ड्या, चिमणीच्या उजेडात केलेला अभ्यास' अशी अनेक वळणं घेत शेवटी 'मी फक्त एक सुटकेस घेऊन या शहरात आलो होतो, शून्यातून सगळं निर्माण केलंय' या स्टेशनात येऊन थांबते. हा असा बापलोकांचा त्यांच्या भूतकाळातून आपल्या वर्तमानाला डागण्या देण्याचा उपाय आयुष्यात प्रत्येकाने अनुभवला असतो. हे असलं काही ऐकणाऱ्या आपल्या मनात, 'मला पण द्या, एखादी सुटकेस, मी पण जातो शून्यातून विश्व निर्माण करायला. पण प्लीज बोअर नका करू राव' असा रिप्लाय तयार झालेला असतो; पण तो ओठांवाटे बाहेर येत नाही. कारण, फुकटचे रट्टे कुणाला खायचेत? त्यापेक्षा घोटभर उपदेशाचे डोस पचवलेले बरे. बापलोकांचं हे असं उपदेश देत देत स्वतःच्या भूतकाळात चक्कर मारून येणं.त्यांना वेगळीच मनःशांती देऊन जातं. आपण किती ग्रेट होतो हे सांगताना, पुसट झालेल्या आठवणी जाग्या होत असतानाचा आनंद ते उपभोगत असतात. 
शृंगार,वीर,करुण,अद्भुत,हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत या नवरसांनी आपलं मन काठोकाठ भरलेलं आहे. त्यांना फक्त कुठल्या ना कुठल्या कलाकृतीने जागं करण्याची गरज असते. जी कलाकृती यातील एक किंवा अधिक रसांना तीव्रतेने जागं करेल, ती कलाकृती आपल्याला भावते. या नवरसांत 'नॉस्टॅल्जिया' नावाचा एक रस कोंबायला पाहिजे होता, असं बऱ्याचदा वाटतं. भूतकाळातल्या आठवणी जाग्या होणे म्हणजे, 'नॉस्टॅल्जिक' वाटणे. आपण एखादी गोष्ट पाहून, ऐकून आपल्या फ्लॅशबॅकमध्ये जातो, त्या आठवणी आपल्याला वेगळंच सुख देऊन जातात. 
'पारले'चं चॉकलेट, रेनॉल्ड पेन, आंतरदेशीय पत्र, पॅरॅगॉनची स्लीपर, 'कॅमल'ची कंपास, लाइट लागणारा बूट, रोलचा कॅमेरा, 'नटराज'ची पेन्सिल हे असलं काही आज पहायला मिळालं तरी आपण भूतकाळात रमतो. आपल्याला आपल्या वस्तू, आपल्या गमतीजमती, वेगवेगळे किस्से आठवू लागतात. विको वज्रदंती, वॉशिंग पावडर निरमा, चार बुंदो वाला उजाला, ठंडा मतलब कोकाकोला या अशा जाहिरातींच्या जिंगल्स आजही आपल्याला तोंडपाठ असतात. शक्तिमान, ज्युनिअर जी, चंद्रकांता, कर्नल ध्यानचंदचं आंखे, रविवारचं रंगोली आणि छायागीत, बायोस्कोप मध्ये तीन भागात दाखवलेले सिनेमे, नाहीच काही तर 'दा..मि..नी..' असा सूर लांबवलेली जवळपास आठ वर्षे वगैरे चाललेली मालिका यांबद्दल कुणी काही बोललं तरी, आपलं दिमागी टाइम मशीन आपल्याला त्या काळात घेऊन जातं. 'यो यो' म्हणत आज कितीही रॅप केलं, तरी 'साजन'मधलं 'बहुत प्यार करते है तुमको सनम', 'बॉर्डर'चं 'संदेसे आते है, बोले चुडिया', 'ओये राजू प्यार ना करियो' अशी काही गाणी कानावर आली, तरी एक वेगळंच स्माइल चेहऱ्यावर येतं. म्हणूनच की काय आजकाल सगळ्याच नव्या सिनेमांत जुनी गाणी नवा तडका मारून दाखवण्याचा ट्रेंड चाललाय. 
2015मध्ये रिलीज झालेल्या 'दम लगा के हैशा' नावाच्या सिनेमाने खूपच सुंदर पद्धतीने नव्वदीचा काळ जागवला होता. प्रेम नावाच्या तरुणाचे संध्यासोबत लग्न लावून दिले जाते. प्रेम साधारण बांध्याचा उंचापुरा देखणा आहे, पण संध्या मात्र लठ्ठ. या तिच्या लठ्ठपणामुळे आणि प्रेमला शाखेत मिळणाऱ्या ब्रह्मचर्याच्या संस्कारांमुळे प्रेम-संध्या मनाने आणि शरीराने एकत्र येत नाहीयेत. शेवटी, नवऱ्याने बायकोला पाठकुळीवर घेऊन पळण्याची 'दम लगा के हैशा' नावाची स्पर्धा त्या दोघांना कशी एकत्र आणते, याची गमतीशीर पण तेवढीच विचार करायला लावणारी या सिनेमाची गोष्ट आहे. या सर्व घडामोडी चालू काळात नव्हे, तर 1995च्या भवतालात घडत आहेत,हे जास्त मनाला भावणारं होतं. प्रेमचं व्हिडिओ कॅसेट्सचं दुकान, त्याचं कुमार सानूच्या गाण्यांबद्दल असणारं वेड्यासारखं प्रेम, टेपरेकॉर्डर आणि त्याच्या छोट्या कॅसेट्स. या सगळ्या सोबत रंगीबेरंगी ओढण्या उडवत डान्स केलेलं कुमार सानू, साधना सरगमच्या आवाजातलं 'दर्द करारा' गाणं या सगळ्याची रेसिपी म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच होती. 
दंगल, वन्स अपॉन टाइम इन मुंबई, लुटेरा, मेरी कोम, स्पेशल छब्बीस, पॅडमॅन, रईस या काही हिंदी फिल्म्स आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, हरिश्चंद्राची फॅक्टरी, दुनियादारी, बालक पालक,शाळा,टपाल,काकस्पर्श, दशक्रिया या काही मराठी फिल्म्सने पुसट झालेल्या जुन्या आठवणींना जागं करण्याचा प्रयत्न केला होता. सोनी चॅनलवर चालू असलेली 'यह उन दिनो कि बात है' मालिका सुद्धा नव्वदच्या दशकाची गोष्ट सांगताना दिसते आहे. 
बाजीराव-मस्तानी, पद्मावत,मणिकर्णिका,फर्जंद, तानाजी यांसारखे ऐतिहासिक चित्रपटसुद्धा एक विशिष्ट काळ जागवत असतातच, पण त्या काळातले लोक सध्या हयात नसल्याने ते मनोरंजन किंवा माहितीपुरतेच मर्यादित राहतात. या उलट आपल्या डोळ्यासमोर होऊन गेलेल्या जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतात, तेव्हा मिळालेला आनंद काहीतरी वेगळाच असतो.याच 'नॉस्टॅल्जिया'च्या भावनेला हात घालत, 'टी.व्ही.एफ'या अव्वल वेबसिरीज निर्माण करणाऱ्या भारतीय टीमने 'येह मेरी फॅमिली' नावाची वेब सिरीज बनवली आहे. 
या वेबसिरीजचा हिरो आहे हर्षु गुप्ता, नावाचा किशोरवयीन मुलगा. हर्षु, हर्षुची आई,वडील, मोठा भाऊ आणि लहान बहीण असं पंचकोनी मध्यमवर्गीय गुप्ता कुटुंब आहे.हा हर्षू हट्टी आहे, अभ्यासात कच्चा आहे, पण मनाचा मात्र एकदम सच्चा आहे. त्याचा मोठा भाऊ डब्बू. 
अभ्यासात चांगलाच हुशार आहे.म्हणूनच बिचाऱ्या हर्षूच्या डोक्याला मोठा ताप आहे. वडील एकदम बिनधास्त आहेत, भारी भारी उदाहरणांतून पोरांना तत्वज्ञान देणारे आहेत, तर आई एकदम कडक शिस्तप्रिय, पण तेवढीच लेकाचं मन जाणणारी आहे. वरवर बेबनाव दिसत असला, तरी प्रत्येक नात्यातील भावनिक वीण एकदम घट्ट आहे. 'आज प्रतिभा मॅम माधुरी दीक्षितवाला, 'एक दो तीन..' गाणे पे डान्स सिखानेवाली है' असे बोबडे डायलॉग बोलत डान्स क्लासला जाण्यासाठी हट्ट करणारी छोटी निरागस चिट्ठी. हर्षूचा मित्र-तत्वज्ञ-वाटाड्या म्हणजे 'मितवा' असलेला मित्र श्यांकी. अगदी मनासारखा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरच्यांना कसं पटवावं, मुलगी पटवण्यासाठीचे मार्ग, मोठ्या भावाला मात देण्याचे नुस्खे असे वेगवेगळ्या विषयांवर हर्षुला धडे देण्याचं काम हा श्यांकी करत असतो. इतर मुलं वर्गातल्या मुलींवर लाइन मारत आहेत, तर हा बहाद्दर थेट शिक्षिकेवरच लाइन मारतोय. सर्वात शेवटचं पण महत्वाचं पात्र म्हणजे, आपल्या हीरोचं हर्षुचं क्रश विद्या. गोरी गोरी पान, फुलासारखी छान, अभ्यासात पण महान, अशी ही विद्या. साउथ इंडियन रंगनाथन यांची मुलगी, हर्षुची वर्गमैत्रीण. 
आई-मुलगा, बाप-मुलगी,दोघे भाऊ आणि एकूणातच गुप्ता फॅमिलीच्या नात्यांची घट्ट वीण असलेली ही वेबसिरीज गोष्ट म्हणून उत्तम आहेच. त्यासोबतच ही सर्व गोष्ट 1998 च्या उन्हाळ्यात घडत असल्याचं दाख वण्यासाठी घेतलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहेत. ढिल्याढाल्या जीन्स, ढगळ्या टी-शर्टची पँटमध्ये टक इन करण्याची पद्धत, हर्षुच्या आईचे कोपरापर्यंत बाह्या असणारे, खांद्याला फुगे असणारे ब्लाउज. मुलांचे कानावर आणि कपाळावर रेंगाळणारे केस. सिन्सियर डब्बूचा तेलाने चपट करून बसवलेला भांग. मिल्टनची वॉटर बॅग, वॉकमन, 'डब्ल्यू डब्ल्यू एफ'च्या रेसलरचे फोटो असणारे कार्ड्स. मारिओ गेम, नागराज वगैरे कॉमिक्स अशा कित्येक बारीकसारीक गोष्टींनी व्यापलेली ही सिरीज आपल्या मनाचा ठाव घेते. गुलाबी लेडिज सायकलवर स्लो मोशनमध्ये आलेली विद्या जवळ येऊन चेहऱ्यावरचा स्कार्फ हळूवार काढू लागते. हर्षु तिच्याकडे रोमँटिक नजरेने पाहतो, तेव्हा बॅकग्राउंडला दूरदर्शनवर ऐकलेलं भीमसेन जोशींच्या आवाजातलं 'मिले सूर मेरा तुम्हारा' ऐकू येतं. भीमसेन जोशींचा आवाज चक्क रोमान्ससाठी मदत करू शकतो, यावर आपला विश्वाससुद्धा बसतो. हा प्रसंग एवढा रोमांचक बनलाय की, हा पूर्ण सिरीजमध्ये 'चेरी ऑन द टॉप' वाटतो. यातले डायलॉग तर एकसे बढकर एक आहेत. आपण आता विशीतले असू किंवा चाळिशीतले आपल्या बालपणात आपण जाऊन येणार हे नक्की. 
ही सात एपिसोड असणारी सिरीज 'नेटफ्लिक्स' वर आहे आणि 'टीव्हीएफ प्ले' या अॅपवर मोफत उपलब्ध आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सतत नेहरू-गांधी कुटुंबाचा कर्तृत्वाचा उद्धार करणारे प्रधानसेवक भूतकाळातून वर्तमानात यायला तयार नाहीत, मग आपण 'यह मेरी फॅमिली' पाहून काही काळ आपल्या बालपणात जाऊन आलो, तर काय हरकत आहे, नाही का? 
                                                                                        महेशकुमार मुंजाळे 
                                                                              लेखकाचा संपर्क : 8308639377
                                                           (लेखक पुणेस्थित नव्या पिढीतले पटकथाकार - दिग्दर्शक आहेत.)  

Post a Comment

 
Top