Add

Add

0
                                                        भ्रमंती कोकणची .. 1
               चला ! ‘डेस्टिनेशन चिपळूण’ पाहू या !  


      मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपारिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे चिपळूण. हाच विचार करून जगप्रसिद्ध हॉटेल ‘ताज’ने साधारणत सन 1989 ते 95च्या दरम्यान कोकणाचा स्वामी असलेल्या भगवान परशुराम मंदिर परिसरात,महेंद्रगिरी डोंगरात,निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या वाशिष्ठी नदीपात्राचे दर्शन घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जागेवर थ्री-स्टार हॉटेल उभारले.पुढे इथेच निसर्गाच्या आधाराने ‘विसावा पॉइंट’ जन्माला आला, निसर्ग तर पहिल्यापासूनच खुणावतच होता. तेव्हापासून असलेली चिपळूणची ‘विश्रांतीस्थान’ ही ओळख बदलण्याचे प्रयत्न गेल्या 20-25वर्षांत अनेकांनी आपापल्या परीने केलेत.त्याच-त्याचपर्यटनस्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांसाठी ‘डेस्टिनेशन चिपळूण’ एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. अलिकडच्या काही वर्षांत ‘क्रोकोडाईल टुरिझम’साठी महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेल्या चिपळूणच्या विविधांगी ‘पर्यटन श्रीमंती’चा हा आढावा....     
    चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. 741-42 दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स.1151च्या ताम्रपटात 'चित्पुलुण'असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. शहराच्या चारही बाजूंना डोंगर,पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे' परिसर पाहायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. 8 एप्रिल 1674ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली,9 मे 1674 ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते, इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत, येथील नेचरट्रेक वेगळा अनुभव ठरावा. निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण, विकासाची झेप घेण्याची प्रचंड क्षमता असलेले चिपळूण पर्यटन आजही उपेक्षित आहे. संपूर्ण कोकणाकडे खूप काही असल्यामुळे ही अडचण निर्माण होते, ज्यांच्याकडे दाखवण्यासारखं थोडंस आहे ते मात्र हमखास प्रगती साधतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी’चे गेल्या पाच वर्षातील ‘आपण चालायला लागलो की रस्ता बनायला सुरूवात होते’ अशा विचाराचे प्रयत्न महत्वाचे आहेत. सन 1964-65 ला मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले.तत्पुर्वीपासून परशुराम मंदिराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील बंडोपंत आणि लीलाकाकू सहस्रबुद्धे यांचे ‘विश्रांतीस्थान’हीच चिपळूणातीलच नव्हे तर कोकणातील (कदाचित) एकमेव पर्यटक व्यवस्था होती. त्याकाळी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांचा धामणदेवीमार्गे प्रवास चाले. भरणेनाका नाका सोडल्यानंतर चिपळूणपर्यंत एकही हॉटेल नव्हते,वीज,वाहतूक व्यवस्था नव्हती. तेव्हा हे ‘विश्रांतीस्थान’ 24तास सुरु असायचे. येथूनच ‘कोकम सरबत’ महाराष्ट्रभर पोहोचले. पर्यटन कंपन्या चहा-फराळासाठी इथे थांबत असतं. पाठीमागील वाशिष्ठीची खाडी हे तेव्हाही आकर्षण होते, क्रोकोडाईल टुरिझमसह विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत पर्यटन आकाराला आलेलेच नव्हते. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला शैलेश वरवाटकर, रविकिरण जाधव, संदेश संसारे आदि काहींनी वाशिष्ठी खाडीत वैयक्तिक प्रयत्नांना सुरुवात केली होती. सन 2008 साली आम्ही (धीरज वाटेकर) आणि समीर कोवळे यांनी,तालुक्यात पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणाऱ्या सौ.नूतन आणि श्री.विलास महाडिक यांच्या सहकार्याने ‘चिपळूण तालुका पर्यटन’ हे नामवंत इतिहास संशोधक कै. निनाद बेडेकर यांची आशीर्वादपर प्रस्तावना लाभलेले, इथल्या पर्यटनाची खडानखडा माहिती देणारे अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले. त्यानंतरच्या कालखंडात इथल्या पर्यटन चळवळींनी आकार घ्यायला सुरुवात केली. ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’हे त्याचे आजचे सर्वात समृद्ध स्वरूप होय.याच संस्थेच्या सहकार्याने, ट्रॅव्हल एजंट असोसि एशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे, इंटरप्रायाझिंग ट्रॅव्हलर एजंट असोसिएशन, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया आदि संस्थांमार्फत कार्यरत प्रसन्ना टूर्स, ट्रॅव्हल मास्टर, गिरिकंद ट्रॅव्हल्स, ओम टूर्स, पॅराडाईज मार्केटिंग, मिहीर टुरिझम, सिमास ट्रॅव्हल्स आदि राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांसोबत काम करणाऱ्या नामांकित 35 टूर ऑपरेटर्सचा तीन दिवशीय चिपळूण पर्यटन दौरा याचवर्षी जानेवारी महिन्यात संपन्न झाला. चिपळूणची पर्यटन श्रीमंती दाखवून आगामी काळात अधिकाधिक पर्यटक चिपळूणात आणता यावेत, हा या मागचा मुख्य हेतू होता.  
      भगवान श्रीविष्णूंच्या दहापैकी सहावा चिरंजीव अवतार म्हणजे ‘परशुराम’ होय. कोकण भूमीच्या या निर्मात्याचे महेंद्रगिरी पर्वत क्षेत्रात, ‘ब्रह्मंद्रेस्वामी’ यांच्या प्रयत्नाने हिंदूधर्मीय भक्तांसाठी, मुस्लिमांनी द्रव्य पुरवठा केलेले आणि ख्रिश्चन कारागिरांनी उभारलेले सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले मंदिर आहे. सहाशे वर्षांपूर्वीच्या आदिलशाही वैभवाची वास्तू येथे पाहावयास मिळते.त्यामुळे मंदिराच्या स्थाप त्यात मंदिर, मशीद आणि चर्च रचनेचा सुंदर संगम साधला गेला आहे. मंदिराबाहेर बाणगंगा तलाव, श्रीदेवी रेणुकामाता मंदिर आहे. जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होय. परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. कर्नाटकातल्या विजयनगर-होळसर घराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे, द्विमुखी गरुडाच्या आकृतीला दिलेले मानवी रूप असे स्वरूप असलेले गंडभेरुंड शिल्प, पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला शुभसूचक प्राणी शरभ, शीलालेख हे रेणुकामाता मंदिराच्या खांबांवर, माथ्यावर पाहता येतात. राष्ट्रकूट राजांची कुलदेवता असलेल्या अर्धवर्तुळाकृती राजचिन्ह 'गजान्तलक्ष्मी' जुन्या काळभैरव मंदिर आवारात आहे. त्यांचा काल इ.स. 500 ते 900असा सांगितला जातो. आठव्या शतकातील श्रीदेवी विंध्य वासिनी मंदिर हे विंध्याचलचे अंशपीठ,सतींच्या 51शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.देवीची यादव कालीन मूर्ती ही महिषासुरमर्दिनीस्वरूप शाळीग्राम शीळेतील अष्टभूजा मूर्ती आहे. कार्तिकस्वामींची सहामुखी (षडानन),दुर्मीळ,महाराष्ट्रातील सर्वात सुबक आणि देखणी मूर्ती याच मंदिरात आहे. 'करंजी' च्या वृक्षातून प्रगट झालेल्या, आठव्या शतकातील याच श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव अखिल महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. शेरणे कार्यक्रमासाठी नवसाचा नारळ पिवळ्या कापडात, नावाची चिट्ठी आणि दक्षिणेसह गुंडाळून शिमगोत्सवाचा जागेवरील वाळूत पुरला जातो.हा नारळ शिमगोत्सवा दरम्यान देवीच्या पालख्या आपल्या ढाल-काठीच्या माध्यमातून शोधून काढतात.चिपळूणात गौतमेश्वर,वीरेश्वर,गांधारेश्वर,कृष्णेश्वर,रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडी वर जलाभिषेक केल्यास आजही विशेष प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे 3 इंच रुंद, 4 इंच लांब आणि 1 इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक ‘स्वामी’ अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला ‘नंदी’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान 500 वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात ‘श्रीलक्ष्मी मल्लमर्दन’ची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला 108 विष्णू लिंगे कोरलेली आहेत.वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे.बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ,सव्वा दोन फूट उंच,‘श्रीलक्ष्मीकेशव’ स्वरूप प्राचीन मूर्ती आहे.दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य, राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे. डेरवणनजीक कुडप गावी मोठाल्या झाडाच्या खोडालाही लाजवतील अश्या वेलीनी समृद्ध 37एकर देवराईच्या वनात,भगवान शंकराचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभार्यात तीन शाळूंखेवर सोमेश्वर,रामेश्वर,वैजनाथ ही तीन रूपे चार लिंगात स्थापित असलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी जांभ्या दगडातील 92 पायर्या चढून जावे लागते. अभ्यासकांच्या अंदाजानुसार, सन 1750 ते 1800दरम्यानची ही लिंगे स्मृती स्वरूपात स्थापन केली गेली असावीत. यातील दुहेरी लिंग हे दोन गुरूबंधू अथवा गुरू-शिष्य प्रतीक असावे. फार पूर्वी आपल्याकडे महत्वाची व्यक्ती गेल्यानंतर ‘लिंग’ स्थापन करण्याची प्रथा होती. अनेक प्राचीन वीरगळींवर आपल्याला शिवपिंडी कोरल्याचे दिसते. निसर्गरम्य लोटनशहा दर्गा हे शहरातील उंचीवरचे ठिकाण आहे. इथल्या वनराईत विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे.
    सावर्डेपासून 2 कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीता रामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन 1985 साली उभारली आहे. कै. गणेश (दादा) पाटकर या शिल्पकाराने सुमारे 15वर्षांच्या मेहनतीतून इथे शिल्पे साकारली आहेत.शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले छत्रप तींच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग पर्यटकांना खिळवून ठेवतात. येथे भारतीय पोषाखातच दर्शनार्थ प्रवेश दिला जातो. वैजी गावातील प्राचीन विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे. चिपळूणच्या इतिहासात प्राचीन संदर्भ असलेल्या, ई.स.सहाव्या शतकापासूनचे पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या ‘राजेशिर्के’ यांचे कुटरे, डेरवण आणि तळसर येथील मराठा वास्तुशैलीने युक्त चौपाखी वाडे आपला इतिहास सांभाळून आहेत. या वाड्यात दोन दशकांहून अधिक काळातील वापरातील विविध वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यासोबतच मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या “ रामचंद्र वासुदेव मराठे न्यास” या हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे 2हजार चौ.फूट आकारा च्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. वास्तू परिसरात 80 आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमां मागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते.त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, या करिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे.हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाण कार असावा.मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे.
      चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक 26 जानेवारी 1937ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. 108 फूट खोल, 25 मैल लांब या खाडीत एकावेळी 2/3 टनाच्या किमान 100 कार्गोज उभ्या राहू शकतात. सन1950 पर्यंत गत 300 वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली,त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन 1808साली अमेरिके तील बोस्टन येथे ‘विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा. चिपळूणचा पहारेकरी अशी नोंद असलेला, दोन एकर शेत्रात विस्तारलेला किल्ले गोविंदगड आवर्जून पाहावा असा आहे.342 पायऱ्या चढून वा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण 12 बुरुजांपैकी 4 बुरुज सुस्थितीत आहेत. चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात आहे. किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या याच देवीचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चिपळूणात, शहरानजीक दीडशे फुटावरून कोसळणारा बाह्यवक्र जलप्रपात 'सवतसडा'हा अगदी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांच्या पावसाळी आकर्षणाचा विषय आहे. त्यासोबतच वीर-देवपाट येथे 100फुट उंचीवरून दोन टप्यात कोसळणारा बारमाही धबधबा, अडरे धबधबा आणि कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात विसावा पॉइंट असून येथून वळणावळणाच्या ‘वाशिष्ठी’नदी पात्राचे विहंगम दृश्य पाहाता येते.चिपळूणचे उद्योग पती श्रीराम रेडीज यांनी धामणवणे येथील आपल्या 100एकर जागेत ‘एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स’ फार्मची उभारणी केली असून येथे जंगल सफारी, नेचरट्रेल, पक्षी अभयारण्य, शेततळे, कँप, बाल्या नृत्य, जाखडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्थाही अशा ठिकाणी  मागणीनुसार होऊ शकते. याखेरीज शहरात पेढे-परशुराम येथे तालुक्यातील पहिले ‘श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्र’ असून अशी इतर 7-8 केंद्रे कार्यरत आहेत.40वर्षांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले डी.बी.जे. महाविद्यालयाचे जैवसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध 21 दुर्मीळ प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे जतन येथे करण्यात आले आहे. तालुक्यात 112 देवराया असून त्यातल्या दसपटी,कुडप,वीर,शिरवली, गुढे, शिरंबे येथील देवरायात ‘नेचरट्रेल’ची अनुभूती घेता येते.   
   चिपळूणात अवघ्या 60 ते 100 किमीच्या पट्यात ‘खाडी, डोंगर, बॅकवॉटर,किल्ले,निसर्ग,जंगल, संस्कृती,लोककला,हेरीटेज’ अशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे.याची नीट प्रसिद्धी, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून निर्माण झाल्या तर पर्यटक चिपळूणात रमतील. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे 3 इंच रुंद, 4 इंच लांब आणि 1 इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक ‘स्वामी’ अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात,हे एक आश्चर्य आहे.तालुक्यातील मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या “ रामचंद्र वासुदेव मराठे न्यास” या हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे 2 हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तू ची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गालगत अतिशय जवळ नितांत सुंदर म्हणून सवतसडा धबधबा प्रसिद्ध आहे. वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार असलेले दादरचे श्रीरामवरदायिनी मंदिर, टेरवचे भवानी माता मंदिर, तीन हजार फुट उंच किल्ले भैरवगड, शारदादेवी मंदिर तुरंबव, चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले शिरंबेचे श्रीमल्लिकार्जुन मंदिर, शहराच्या पश्चिमेकडील अरण्यमय महालक्ष्मीण डोंगर भागात असलेले मिरजोळीत श्रीदेवी महालक्ष्मी - साळूबाई हे देवस्थान, वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या किनार्‍यावर असलेल्या गोंधळे गावी सन 1696 मध्ये आप्पाजी गोंधळेकर यांनी बांधून पूर्ण केलेले श्रीहरिहरेश्र्वर मंदिर, त्या मंदिराशेजारील विशाल आकारमानाची 40 पायऱ्यांची प्राचीन विहिर,डॉ.आंबेडकरांच्या वास्तव्याने पुनित वास्तू ‘राजगृह’, चिपळूण शहर दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन असल्याचा पुरावा सांगणारी कोल्हेखाजन बौद्ध गुंफा लेणी, शहरातील गजान्तलक्ष्मी शिल्प, विजयस्तंभ, भोगाळेतील घोडेबाव,ई.स.सहाव्या शतकापासूनचे चिपळूणातील पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे असलेल्या राजेशिर्के यांची 350वर्षाचा इतिहास लाभलेली वाडासंस्कृती इथलं वैभव आहे. नमन, जाखडीच्यापलिकडे जाऊन पालखी नृत्य पुढे आणण्याची गरज, बारमाही सवतसडा, चिपळूणचा रोपवे प्रकल्प, सतत मगरी दिसाव्यात म्हणूनचे प्रयत्न, शहरात आगामी फलक उभारणी, गाडी व्यावसायिकांच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न, गोवळकोट किल्याचे सुशोभीकरण, वाशिष्ठीचे पाणी अडवून बोटिंग प्रकल्पाचा विकास व्हायला हवा आहे. चिपळूण पर्यटन वाढीसाठी सातत्याने त्याचा ‘प्रचार आणि प्रसार’ करण्याची आवश्यकता, शहरात चांगले पर्यटन फलक,शहरातील तळ्यांचा विकास, इथे येणाऱ्या पर्यटकांना नदीत डुंबायला मिळण्याची व्यवस्था, ‘चिपळूण दर्शन’ गाडीची सोय, उत्तम गाईडची व्यवस्था, पर्यटकांच्या शॉप्पिंगसाठीचा विचार, तालुक्यातील पाटाच्या पाण्याच्या व्यवस्था, मालदोलीतील ‘हेरीटेज होम’, पर्यटन विकसित करताना सुरुवातीला माफकदर ठेवण्याची मानसिकता, आपली ‘उन्हाळी-पावसाळी-हिवाळी’ शक्तीस्थळे शोधण्याची गरज,स्थानिकांचा सहभाग,फूड फेस्टिव्हल, मोंगापार्टी महोत्सव,जंगल आणि कृषी पर्यटन,अद्ययावत पर्यटन माहितीचे सतत प्रसूतीकरण, स्वत: चिपळूणकरांनी शहर आणि तालुका पाहण्याची गरज,सह्यादी शिक्षण संस्थेचे संस्थेचे कलादालन, कोकण दाखविणाऱ्या गाईडची वाढ, पर्यटकांना तासादोन तासांकरिता माफक दरात रिक्षांची सोय असे अनेक विषय इथल्या पर्यटनाच्या विकासासाठी आम्हांला लक्षात घ्यावे लागणार आहेत.‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या श्रीराम रेडिज,इब्राहिम दलवाई,संजीव अणेराव,आलिम परकार,मिलिंद कापडी, निलेश बापट, धीरज वाटेकर, रमण डांगे, राजेश पाथरे, विश्वास पाटील, समीर कोवळे, विलास महाडिक, मनोज गांधी, महेंद्र कासेकर, शाहनवाज शाह, समीर जानवलकर यांच्यासह प्रा. सौ. मीनल ओक, डॉ. मनोज रावराणे, संदेश संसारे, सत्येंद्र वैद्य, अभिजित चव्हाण, प्रकाश चव्हाण, सचिन कुलकर्णी, विद्या सरखोत, श्रीकांत बापट आदि अनेकजण ‘चिपळूण पर्यटन’ विकसित व्हावे म्हणून धडपडत आहेत.   
  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान वन्यजीव विभागाने 8‘हॉट स्पॉट’ नजीकच्या बफर झोनचे दरवाजे नुकतेच उघडले. यात चिपळूण नजीकच्या सह्याद्री पट्यातील काही ‘ट्रेकरूट’चा समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात याठिकाणीही सह्याद्री साहसी पर्यटन बहरायला वाव आहे. इतिहासात, ‘देश आणि कोकण’ या दरम्यान चालणारी चिपळूणसह त्याला जोडलेल्या अनेक गावांची व्यापारी देवघेव ज्या मार्गाने चालत होती तो घाट ‘बैलमारव घाट’ या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्वांपार या मार्गाने लमाणांचे तांडे कोकणात येत असत. सन 1846 च्या दरम्यान रत्नागिरी-सातारा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातून बैलगाडी प्रवास सुरु झाला आणि या ‘बैलमारव घाट’ परिसराचे व्यापारी महत्त्व हळूहळू कमी होत गेले. मात्र प्रदूषणाने घेरलेल्या सध्याच्या काळात या प्राचीन घाटमार्गांवर असणाऱ्या पदभ्रमण मार्गांना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.मौजे पेढांबे गावाच्या माथ्यावर खडपोली,कळकवणे यांच्या सीमामध्यावर पंधराशे फूट उंचीचा बारराव कोळ्यांचा ‘किल्ले बारवई’ आहे. तेथे १२ कोरीव लेणी(ओवरी/खोली) आहेत. तिवरेचे ग्रामदैवत श्रीदेवी व्याघ्रांबरी देवस्थानचा ञैवार्षिक जञोत्सव (समा) आपली सुमारे पाचशे वर्षांची परंपरा जोपासून आहे.गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागात, खडकाळ नदीप्रवाहाच्या तीरावर ‘गंगाकुंड’ आहे.या कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात सातशे वर्षापूर्वीपासून गंगा उगम पावते आहे. या पर्वणी काळात गंगास्नानास भाविक, जिज्ञासू, पर्यटक यांची येथे रीघ लागलेली असते. तिवरे येथील सहयाद्रीच्या रांगेत उंच टेबलासारखा पठारवजा डोंगर दिसतो तो तिवरेगड. तिवरे गावातून बैलमारव घाटातून या गडाकडे, मालदेवकडे जाण्याचा रस्ता आहे. तिवरे मालदेवसह तिवडी आणि इतर अन्य ट्रेकरुट आगामी काळात पर्यटनाच्या नकाशावर येतील. तसेच ‘वाशिष्ठी सफर (परिक्रमा) : उगम ते संगम’ हा चिपळूण पर्यटनातील महत्वकांक्षी उपक्रम पर्यटकांसाठी लवकरच सुरु केला जाणार आहे. या प्रकल्पाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे.   
  पर्यटकांना अवघ्या 60 ते 100 कि.मी.च्या पट्यात‘खाडी,डोंगर,बॅकवॉटर,किल्ले,निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेज’ आदि सारी अमर्याद पर्यटन समृद्धी देणाऱ्या चिपळूणात जवळपास 35 हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार हॉटेलात 70 रूम्सची उपलब्धी आहे.उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील 15 हॉटेलात 150खोल्यांची व्यवस्था आहे. तालुक्यातील पर्यटन संपूर्णतः विकसित करण्याचे प्रयत्न ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ करते आहे. या साऱ्याची प्रसिद्धी करण्याबरोबरच दर्जेदार पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही चिपळूणात सुरु झाले आहे. आगामी काळात पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवेल, ज्यातून पर्यटक चिपळूणात रमतील हे नक्की !
                                                                                                  धीरज वाटेकर
विधीलिखित’, 1263-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण-415605, जि. रत्नागिरी   
मो. 9860360948
dheerajwatekar@gmail.com
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे सतत कार्यरत पत्रकार आहेत.)


Post a Comment

 
Top