प्रदूषणात वाढ ! धुराने काळवंडतोय हिंजवडी आयटी परिसर
हिंजवडी (प्रतिनिधी ):- हिंजवडी, माण आयटीनगरी परिसरात सध्या कचºयाच्या ढिगाºयाला अचानक लागणाºया आगीच्या घटनांमुळे हवेत नेहमीच काळेकुट्ट धुराचे लोट दिसतात. आयटी पार्क परिसरातील मोकळ्या जागांवर कचरा, प्लॅस्टिक, फोम, तसेच वाहनांचे टायर, हॉटेलमधील उरलेले अन्नपदार्थ बिनदिक्कतपणे टाकले जात असल्याने अनेक ठिकाणी छोट्या स्वरूपातील कचरा डेपो तयार झाले आहेत. कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आग लागून हिंजवडी परिसरात निरभ्र आकाशात काळेकुट्ट धुराचे लोट दिसून येत असल्याने आयटी परिसरात प्रदूषण करणाºया कंपन्या दाखल झाल्या की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आयटी पार्क परिसरात सुमारे 128 हून अधिक आयटी कंपन्या आहेत. उच्चशिक्षित, उच्चभ्रू जीवनशैली जगणारे हजारो आयटीयन्स या ठिकाणी काम करतात. सध्या मोकळ्या जागांवरील कचºयाला आग लागण्याच्या घटना या भागात नित्याच्याच झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात घनकचरा, कंपन्यांचे भंगार, प्लॅस्टिक, शिळे अन्नपदार्थ टाकले जात असून, ग्रामपंचायत, एमआयडीसी अथवा या परिसरात काम करणाºया जबाबदार संस्था यांपैकी कोणीच याकडे लक्ष देत नाही.
पंधरा दिवसांत कचºयाला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. फेज -1मधील हिंजवडी, माण रस्त्यावरील अशोक मिडोज सोसायटीशेजारील मोकळ्या मैदानात रात्री मोठ्या प्रमाणात कचरा टाकून पेटवण्यात आला होता,तर चार दिवसांपूर्वी माण हद्दीतील फेज-3 मधील गंगारामवाडीजवळील मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात कचºयाच्या ढिगाºयाला आग लागली होती. फेज-3 मधील अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली होती. कचरा मोकळ्या जागेत टाकला जात आहे.

उपाययोजना : यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव...
कचºयाच्या ढिगाºयामध्ये कंपन्यांचे प्लॅस्टिक, भंगार मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा एमआयडीसी, ग्रामपंचायत अथवा संबंधित यंत्रणा यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अज्ञातांचे फावते; मात्र अशा घटनांना आळा बसला पाहिजे. ही जबाबदारी सर्वांचीच आहे. असा प्रकार होत असल्याचे दिसताच संबंधित यंत्रणांना कळवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीकडे कर्मचारी संख्या अपुरी असते; मात्र परिसरात रात्रंदिवस टेहळणी होणे गरजेचे आहे. 
                                                                                                 - भरत पाटील, 
                                                                                           ग्रामविकास अधिकारी, माण

कचरा टाकून पेटवणाºयांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. कंपन्यांना ओला कचरा कंपनीमध्येच नष्ट करावा लागतो हा नियम आहे, तर भंगार अथवा वेस्ट मटेरियल व्हेंडरकडून बाहेर पाठवले जाते. त्यामुळे कंपन्यांकडून असे प्रकार होत नसावेत; मात्र एमआयडीसी हद्दीत आमचे लक्ष असते. अशा घटना घडू नयेत म्हणून आमचा विभाग दक्ष आहे.
                                                                                                      - नीलेश मोढवे,
                                                                                     कार्यकारी अभियंता, हिंजवडी एमआयडीसी
आयटी पार्कमध्ये कचºयाच्या ढिगाºयाला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. माहिती मिळाल्यावर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली जाते. आगीत प्रामुख्याने प्लॅस्टिक, फोम, स्क्रॅप, अन्नपदार्थ यांचे प्रमाण अधिक असल्याने काळा धूर होतो.
                                                                                          - सुनील इंगवले,
                                                                      अग्निशामक अधिकारी, हिंजवडी फेज-3.