Add

Add

0

महारुद्र काळेल मुळशी किताबाचा मानकरी....

300 मल्लांचा सहभाग : 57 किलो वजनी गटात किरण शिंदे प्रथम

           
पिरंगुट (प्रतिनिधी):-घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे झालेल्या मुळशी किताबाच्या अजिंक्य कुस्ती स्पर्धेमध्ये मल्ल महारुद्र काळेल याने हर्षद कोकाटे याचा पराभव करून मुळशी किताबाचे अजिंक्यपद पटकावले. घोटावडे फाटा येथे झालेल्या मुळशी किताब यास्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास 300 मल्लांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अनेक प्रेक्षणीय कुस्त्यांचे प्रदर्शन मल्लांनी केले. अंतिम मुळशी किताबाच्या अजिंक्य कुस्तीमध्ये इंदापूरच्या महारुद्र काळेल या मल्लाने हर्षद कोकाटे याचा पराभव करून मुळशी किताब पटकावला. ही स्पर्धा पाहण्यासाठी मुळशी तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकिनांनी तुफान गर्दी केली होती. या वेळी भोर- वेल्हे- मुळशीचे आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ हगवणे, जि.प.सदस्य शंकर मांडेकर भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, काँग्रेस मुळशी तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश वाडकर, युवा नेते शिवाजी बुचडे, मुळशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष मोहोळ तसेच खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, पौड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते यांच्यासह मोठ्या प्रमाणावर अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

मुळशी किताबाचे आयोजनसुद्धा मुळशी केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर मोहोळ, अध्यक्ष सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष बाळासाहेब आमले, माजी उपसरपंच महेश मानकर, सचिन मोहोळ, पै. शरद पवार व इतर सहकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.
तर, ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सचिन मोहोळ यांचा मोलाचा वाटा आहे. मुळशी तालुक्यातील महाराष्ट्र केसरी कै. अमृत मोहोळ यांच्या सन्मानार्थ घेण्यात येत असलेल्या अमृता केसरी किताबाच्या कुस्ती स्पर्धेमध्ये साईनाथ रानवडे यानी राजेंद्र राजमाने याचा पराभव करून किताब पटकाविला.

विजेते मल्ल...
वेगवेगळ्या वजनी गटातील कुस्त्यांमध्ये 57 किलो वजनी गटात किरण शिंदेने प्रथम, स्वप्निल शेलारने द्वितीय, प्रीतम घोरपडेने तृतीय क्रमांक मिळविला.
61 किलो वजनी गटात निखिल कदम प्रथम, अभिजित शेळके द्वितीय, भालचंद्र कुंभार तृतीय, 65 किलो वजनी गटात योगेश्वर तापकीर प्रथम, सूरज सातव द्वितीय, प्रशांत साठे तृतीय,70 किलो वजनी गटात तुकाराम शितोळे प्रथम, अरुण खेंगळे द्वितीय, सुमीत म्हसकुठे तृतीय,74 किलो गटात रवींद्र करे प्रथम, अक्षय चोरगे द्वितीय, तर मंगेश दोरगे तृतीय क्रमांक मिळविला.

Post a Comment

 
Top