Add

Add

0

    मुळशी तालुक्‍यात भांबर्डे येथे होणार खासगी धरण... 

गिरीस्थान प्रकल्पासाठी धरण बांधण्यास शासनाची मान्यता...
 तीन टीएमसी इतक्‍या क्षमतेचे असणार... 
पुणे (विशेष प्रतिनिधी):-शासनाने मुळशी तालुक्‍यात नव्याने होऊ घातलेल्या एका गिरीस्थान (हिल स्टेशन) प्रकल्पासाठी खासगी धरण बांधण्यास परवानगी दिली आहे. मुळशी तालुक्‍यातील भांबर्डे याठिकाणी सुमारे तीन टीएमसी इतक्‍या क्षमतेचे हे धरण बांधले जाणार आहे.
मुळशी तालुक्‍यात महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू प्रा.लि मुंबई या कंपनीतर्फे मुळशी तालुक्‍यात गिरीस्थान विकास प्रकल्पासाठी नियोजित ठिकाणी कुंडलिका नदीखोऱ्यात स्वखर्चाने धरण बांधण्याकरिता तसेच घरगुती पाणी आरक्षणासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. महाराष्ट्र सिंचन कायद्यातील तरतुदीनुसार नैसर्गिक स्रोतांवर धरण बांधणे, पाणी अडविणे याबाबत शासनाची मंजुरी मिळणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र जल नियोजन प्राधिकरण अधिनियम -2005 मधील तरतुदींनुसार प्राधिकरणाने या प्रकल्पास जून -2018 मध्ये सहमती दिली आहे. कोकण एकात्मिक जलआराखड्यास या प्रकल्पाचा समावेशही करण्यात आला आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू प्रा.लि या कंपनीचा मुळशी तालुक्‍यात धरण बांधण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या उपसमितीकडे सादर करण्यात आला होता.
त्यानुसार शासनाने महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू प्रा. लि या गिरीस्थान विकास कंपनीला मुळशी तालुक्‍यातील भांबर्डे या गावात सुमारे तीन टीएमसी इतक्‍या क्षमतेचे धरण बांधण्यास मान्यता दिली आहे.
टाटा धरणातील पाणी मिळण्याचा प्रस्ताव लालफितीतच 
यंदा अपुऱ्या पावसामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही पाणीटंचाई समस्या भेडसावत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्याचबरोबर शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर शहराला मुळशी तालुक्‍यातील मुळशी धरणातून (टाटा धरण) पाणी मिळण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्तावही शासनाकडे सादर केला आहे. मात्र, या खासगी धरणातील पाणी शहराला पिण्यासाठी व ग्रामीण भागाला शेतीसाठी देण्यासंदर्भात शासनाने समिती नेमली आहे. मात्र, यावर अजूनही निर्णय झालेला नाही.

पाणीपट्टी ठरविण्याचे अधिकार शासनाला 
यापूर्वीच मुळशी तालुक्‍यात दोन गिरीस्थान प्रकल्प आहेत. त्यांनाही पाणी वापरासाठी अटी व शर्ती शासनाने घालून दिल्या आहेत. त्याचधर्तीवर शासन हिताच्या दृष्टीने आवश्‍यक अटी व शर्ती कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने निश्‍चित करून त्यांचा अंतर्भात मंजुरीच्या पत्रात व करारनाम्यामध्ये समाविष्ट कराव्यात, असे आदेशही शासनाने दिले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण व शासन ठरवेल ते पाणीपट्टी दर, वेळोवेळी होणारे सर्व बाबींमधील नियम, अटी व शासन निर्णय कायद्यातील तरतूदींनुसार लागू होणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.
जमीन संपादनाची जबाबदारी कंपनीवर ... 
मुळशी तालुक्‍यात होणाऱ्या खासगी धरणासाठी जमीन संपादन, पुनर्वसनाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी ही संबंधित संस्थेवर राहणार आहे. त्याचबरोबर धरण सुरक्षितता व पूरनियंत्रण याची पूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार असून जलसंपदा विभागाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्‍यक असल्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

 
Top