Add

Add

0
भविष्य निर्वाह निधीबाबत उद्योगजगताने सर्वोच्च न्यायालयाच्या 
निकालाचा आदर राखावा- अतुल कोटकर, सहाय्यक पी. एफ.आयुक्त, पुणे.

पुणे (प्रतिनिधी ):- भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ बाबत औद्योगिक कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच जारी केलेल्या निकालाचा आदर राखत अंमलबजावणी करावी, असे आवाहन भविष्य निर्वाह निधीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अतुल कोटकर यांनी केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (एन आय पी एम) पुणे विभाग लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "भविष्य निर्वाह निधीबाबात सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाचे परिणाम व विश्लेषण ( The impact of the latest judgement of Supreme Court on salary components for PF contribution)" या विषयावर आयोजित परिसंवादात कोटकर बोलत होते. शिवाजीनगर येथील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने कामगारांचे हित अग्रस्थानी ठेवूनच हा निकाल दिला असून या निकालामागची सामाजिक कल्याणाची तर्कशुद्धता लक्षात घेऊन औद्योगिक कंपनीच्या व्यवस्थापनांनी त्वरेने याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करावी. 
यावेळी बोलताना पुणे लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट आदित्य जोशी यांनी सांगितले की, पीएफ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे ' सर्जिकल स्ट्राईकच' म्हणावे लागेल. या निकालामुळे कामगारांना प्रत्यक्ष हातात मिळणाऱ्या पगाराच्या रकमेत जरी कपात होणार असली तरी निवृत्तीनंतर कामगारांना मिळणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम निश्चित जास्त असणार आहे. 
या नव्या निर्णयानुसार 15,000/- रुपये दरमहा पगाराची कमाल मर्यादा असणाऱ्या कामगारांना सर्व भत्त्यांवर पीएफची रक्कम द्यावी लागणार आहे. तसेच या निकालाची अंमलबजावणी कधीपासून करायची याबाबत स्पष्टोक्ती नसल्याने केव्हाही अंमलबजावणी लागू होण्याची शक्यता गृहीत घेऊन मनुष्यबळ व्यवस्थापकांनी तयार रहावे असे ऍडव्होकेट आदित्य जोशी यांनी सांगितले. 
तर यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट जयंत कुलकर्णी यांनी पीएफ संबंधीच्या या नव्या निकालातील तरतुदी, अटी, निकष व त्याचे परिणाम याविषयी उदाहरणासह मार्गदर्शन केले. 
या परिसंवादाचे प्रास्ताविक एन आय पी एम पुणे विभागाचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन मुक्ता हुपरीकर यांनी तर आभार प्रदर्शन एन आय पी एम चे सचिव नरेंद्र पाटील यांनी केले.या परिसंवादाला पुणे, पिंपरी-चिंचवड रांजणगाव, हिंजवडी, हडपसर आदी परिसरातील पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपन्यांचे सुमारे 300 मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी उपस्थित होते. 
अधिक माहितीसाठी संपर्क : योगेश रांगणेकर.
मोबा. : 7350014536 / 9325509870 

Post a Comment

 
Top