Add

Add

0
                                                    संघ संस्थापक : डॉ. हेडगेवार 
                  'कई सज्जन यह कहते हुए भी नही हिचकिचाते कि हिंदुस्तान केवल हिंदुओं का कैसे?  यह तो उन सभी लोगों का है जो यहां बसते है। खेद है कि इस प्रकार का कथन/आक्षेप करने वाले सज्जनों को राष्ट्र शब्द का अर्थ ही ज्ञात नही। राष्ट्र केवल भूमि के किसी टुकडे को नही कहते।
                 एक विचार- एक आचार- एक सभ्यता एवं परम्परा मे जो लोग पुरातन काल से रहते चले आए हैं उन्हीं लोगों की संस्कृति से राष्ट्र बनता है। इस देश को हमारे ही कारण हिंदुस्थान नाम दिया गया है। दूसरे लोग यदि इस में बसना चाहते हैं तो अवश्य बस सकते है। हमने उन्हें न कभी मना किया है न करेंगे। किंतु जो हमारे घर अतिथि बन कर आते हैं और हमारे ही गले पर छुरी फेरने पर उतारु हो जाते है उनके लिए यहां रत्ती भर भी स्थान नही। संघ की इस विचारधारा को पहले आप ठीक ठाक समझ लीजिए। '
                                                       - डॉ. केशव बळीराम हेडगेवार
           नागपूर ! महाराष्ट्र राज्यातील उप-राजधानीचे एक मोठे शहर! सर्वात जास्त संत्र्याचे उत्पन्न करणारा विभाग म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळेच नागपूर शहराची ओळख संत्र्याचे शहर म्हणून सर्वदूर आहे. नागपूर शहरात पंडित बळीराम हेडगेवार राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव रेवतीबाई असे होते. बळीराम हेडगेवार यांना महादेव आणि सीताराम अशी दोन मुले होती.01एप्रिल 1889या दिवशी बळीराम पंत यांच्या घरात तिसऱ्या पुत्राचे आगमन झाले. या मुलाचे नाव बळीराम असे ठेवण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी गुढीपाडवा हा सण होता. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस! काय योगायोग असावा यामागे, कारण हिंदू सणाच्या दिवशी जन्मलेला हा बालक भविष्यात हिंदू धर्म रक्षणासाठी आणि प्रसारासाठी फार मोठे कार्य करेल हे नियतीशिवाय कुणाला ठाऊक असणार?
         केशवराव जेमतेम तेरा वर्षांचे असताना हेडगेवार कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. प्लेग या महाभयंकर आजाराने बळीराम हेडगेवार आणि त्यांच्या पत्नी रेवतीबाई या दोघांचा बळी घेतला. केशव पोरका झाला परंतु त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्या दोन्ही भावांनी घेतली. केशवचे प्राथमिक शिक्षण नागपुरातील नील सिटी हायस्कूलमध्ये झाले. केशव नवव्या वर्गात  शिकत असताना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना घडली. त्याकाळी भारतावर इंग्रजांची सत्ता होती. 'भारत माता की जय, वंदे मातरम् ' अशा घोषणा देण्यास बंदी होती. केशव यांचा स्वभाव मुळात क्रांतिकारी विचारांचा होता. कोणतेही बंधन त्यांना अन्यायकारक वाटत असे. ते त्याच्या विरोधात उभे राहात असत. केशव शाळेत असताना एक घटना घडली. राणी व्हिक्टोरिया यांच्या सरकारचा साठावा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शाळेत एक कार्यक्रम होता. केशव त्यावेळी नाराज होता. कार्यक्रम संपला. विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली. केशवलाही मिठाई मिळाली. ती घेऊन केशव घरी आला. घरी पोहोचताच त्याने मिळालेली मिठाई फेकून दिली. ते पाहून केशवच्या भावाने विचारले,  
"केशव, तुला मिठाई मिळाली नाही का?"
"मिळाली होती. पण दादा, याच इंग्रजांनी आपले भोसले घराणे नष्ट केले ना? मग आपण कशाला त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन मिठाई खायची. मी दिली फेकून." केशवच्या तशा उत्तराने त्याचा भाऊ आश्चर्यचकित  झाला.   
         दुसरी एक घटना अशीच महत्त्वपूर्ण आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दसरा या सणाला पूर्वापार फार महत्त्व आहे. यादिवशी गावोगावी सीमोल्लंघनाचे कार्यक्रम होत असतात. रामपायली या गावातही सीमोल्लंघन कार्यक्रम दरवर्षी आयोजित होतो. एकदा केशवराव त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले,
"आज आपला समाज अनेक बंधनात जखडला गेला आहे. ही बंधने झुगारून देणे जसे आवश्यक आहे तसेच ते आमचे कर्तव्यही आहे. आमच्यासाठी अत्यंत कष्टप्रद आणि लाजीरवाणी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आमचे पारतंत्र्य! ज्यावेळी या इंग्रजांना आपण सातासमुद्रापार हाकलून लावू त्यावेळी खऱ्या अर्थाने आपले सीमोल्लंघन होईल." 
हेडगेवार यांचे असे क्रांतिकारी विचार ऐकताच तिथे 'वंदेमातरम्' च्या घोषणा निनादल्या. त्यामुळे इंग्रज सरकारचे पित्त खवळले आणि हेडगेवार यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.                                                  दुसरी घटनाही तशीच हेडगेवार यांचे देशप्रेम उजागर करणारी. एकेदिवशी त्यांची शाळा तपासायला इंग्रज अधिकारी आले. केशवराव हेडगेवार यांनी काही मित्रांच्या मदतीने 'वंदेमातरम्' अशा घोषणा दिल्या. अशा हिंदुत्ववादी घोषणांनी झालेले स्वागत त्या अधिकाऱ्यास आवडले नाही. त्याचा परिणाम म्हणून केशवला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढील शिक्षणाचे काय असा प्रश्न समोर उभा राहिला तेव्हा त्यांच्या दोन्ही भावांनी केशवला पुणे येथे पाठवले. तिथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडली. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एस. मुंजे यांचा केशवराव यांच्याशी परिचय झाला. मुंजे यांनी केशवराव यांची अभ्यासूवृत्ती, हुशारी, घरची गरिबी आणि लहानवयात केशवजवळ असलेली हिंदुत्ववादी विचारसरणी ओळखून त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी कलकत्त्याला पाठवले. तिथे त्यांचा संपर्क त्यांचे मोठे भाऊ महादेवाचे मित्र श्यामसुंदर चक्रवर्ती यांच्याशी आला. चक्रवर्ती यांची कलकत्ता येथे 'गुप्त क्रांतिकारी' संघटना होती.हेडगेवार हे या संस्थेच्या अनुशीलन समितीचे सदस्य सक्रिय सदस्य झाले.1915यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत यशस्वीपणे पूर्ण करून डॉक्टर केशवराव हेडगेवार नागपूरला परत आले. साहजिकच त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की,केशवने नोकरी करावी परंतु केशवला आपले आयुष्य देशसेवेसाठी खर्ची घालायचे होते. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांनी देशसेवेचे व्रत पत्करले. डॉ.केशवराव हेडगेवार यांच्या विचारसरणीवर बाळ गंगाधर टिळक, विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. 
        तो काळ म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा होता. देशातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या आंदोलनात स्वतःचे योगदान देत होता. डॉ. हेडगेवारही या आंदोलनात उतरले. सुरुवातीला हेडगेवार हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाले. हेडगेवार यांचे कार्य पाहून त्यांना विदर्भ विभागाचे सचिव म्हणून नेमण्यात आले.1920या साली नागपूर येथे कॉंग्रेसचे अखिल भारतीय पातळीवरील अधिवेशन झाले. या अधिवेशनात डॉ. हेडगेवार यांनी भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असा ठराव मांडला परंतु दुदैवाने तो फेटाळण्यात आला.1921यावर्षी झालेल्या 'असहयोग आंदोलनात' त्यांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला.  तुरुंगात असताना त्यांच्या मनात एक विचार आला की,कॉंग्रेससोबत राहून पारतंत्र्याच्या विरोधात लढा देणे शक्य होईल असे वाटत नाही. स्वातंत्र्य आंदोलन सुरू असतानाच देशात जी फुटीरतावादी विचारसरणी फोफावते आहे त्या विचारांना दूर करण्यासाठी वेगळे काही तरी करण्याची गरज आहे. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर डॉ. हेडगेवार यांनी नारायण वैद्य आणि ए. बी. कोल्हटकर या दोघांच्या सहकार्याने 'स्वातंत्र्य' नावाचे मराठी भाषेतील दैनिक सुरु केले. या दैनिकाच्या माध्यमातून हेडगेवार क्रांतिकारकांचे विचार आणि आंदोलनाला बळ देणारे साहित्य,विचार प्रामुख्याने प्रकाशित करत असत. त्यामुळे आंदोलनाला एक दिशा आणि बळकटी मिळत होती. त्यासोबतच  डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तो दिवस होता, विजया दशमी! दसरा! वर्ष होते 1925! केशवराव हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक झाले.त्यांच्या सोबत भैय्यासाहेब दाणी, बाबासाहेब आपटे, बाळासाहेब देवरस आणि मधुकर भागवत हे संघाचे सुरुवातीच्या काळातील सभासद. डॉ. हेडगेवार हे संघाच्या सुरुवातीच्या स्थितीबद्दल म्हणाले,
"संघ स्थापन केला त्यावेळची स्थिती फार विचित्र होती. हा देश हिंदुचा आहे असे म्हणणेही वेडेपणाचे लक्षण मानले जात असे. एखाद्या संघटनेला हिंदू संघटना म्हटले की, तो देशद्रोह समजल्या जात असे."  कालांतराने संघाने 'हिंदुस्थान हा हिंदुंचा, नाही कुणाच्या बापाचा' ही घोषणा सर्वत्र गरजू लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होताच हेडगेवारांनी संघाला क्रियाशील राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. यामागे त्यांचा असा विचार होता की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जर इंग्रजांच्या नजरेत भरली तर आपल्या संघाचा विस्तार होणार नाही.' या भूमिकेतून त्यांनी स्वतःला आणि संघीय कार्यकर्त्यांना राजकारणापासून दूर ठेवले.             राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जरी सुरु झाली असली तरीही डॉ. हेडगेवार कॉंग्रेससोबत स्वतंत्रता आंदोलनात सहभाग नोंदवत होते. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कॉंग्रेसने 26 जानेवारी 1930 यादिवशी संपूर्ण देशात तिरंगा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. हेडगेवार यांनी या  देशातील संघाच्या प्रत्येक शाखेत तिरंगा ध्वज फडकवण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला. 
          राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत युवकांची संख्या वाढत होती. सकाळी आणि संध्याकाळी एक-एक तास या शाखांमध्ये काम होत असे. शाखा व्यवस्थित चालाव्यात म्हणून शिक्षक, मुख्य शिक्षक, गटनायक अशा पदांची निर्मिती झाली. संघाच्या या शाखांमध्ये व्यायाम, शारीरिक श्रम, हिंदू राष्ट्रवाद असे शिक्षण देण्यात येऊ लागले. शाखांमध्ये असणाऱ्या काही ज्येष्ठ स्वयंसेवकांना सैनिकी शिक्षणाचे धडे गिरवण्याची संधी मिळत असे. अधूनमधून रात्रीच्या वेळी महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, वीर सावरकर, मंगल पांडे, तात्या टोपे अशा शूरवीरांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकायला मिळत. सोबतच हेडगेवार यांनी हिंदू महासभेचे कार्यही सुरु ठेवले होते. या सभेच्या माध्यमातून हेडगेवार हे वि. दा. सावरकर यांच्या सान्निध्यात आले. सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना हेडगेवार उपाध्यक्ष होते. हिंदू महासभेच्या सहकार्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार करण्यात आला. वि. दा. सावरकर यांचे विचार, त्यांनी लिहिलेल्या 'हिंदूत्व' या पुस्तकातील महत्त्वाचा भागही संघाच्या शाखांमध्ये वाचून त्यावर चर्चा होत असे. सावरकर आणि हेडगेवार या दोघांचाही असा विचार होता की, 'जोपर्यंत हिंदू समाज अंधविश्वास, जुनी परंपरागत विचारसरणी, धार्मिक अवडंबर ह्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत हिंदू समाज जातीयवाद, स्पृश्य-अस्पृश्य, शहरी-आदिवासी, प्रांतवाद यामध्ये अडकला जाईल. जोपर्यंत हिंदू समाज एकजूट होणार नाही तोपर्यंत तो जगात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू शकणार नाही.'
        राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याप्ती पाहून, संघाच्या कार्याने प्रेरित होऊन वि. दा. सावरकर यांच्या मोठ्या भावाने बाबाराव सावरकरांनी त्यांची 'युवक संघटना' आठ हजार सदस्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विलीन केली. त्याचवेळी 'मुक्तेश्वर' नावाची एक संघटनाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समाविष्ट झाली. या संघाचे पाच हजार सदस्य होते. विशेष म्हणजे ही संघटना राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज चालवत होते. यामागे एक विचार असा होता की, हिंदू समाजातील युवकांची एकच संघटना असावी. या दोन घटनांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना एक बळकटी आली, एक समाधान पसरले.
           राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकांना असे वाटत होते की, 'शासकीय सेवेत प्रवेश मिळवून किंवा स्वतःचे इस्पितळ उघडून भरमसाठ पैसा जमा करणे हा डॉ. हेडगेवार यांचा उद्देश नव्हता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा त्यांचा एकमेव विचार होता.दोन-चार इंग्रज अधिकाऱ्यांना यमसदनी पाठवून इंग्रज हा देश सोडतील असे नव्हते. कोणतेही मोठे आंदोलन यशस्वी करावयाचे असल्यास त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर जनतेचे पाठबळ आवश्यक असते. क्रांतिकारकांच्या आंदोलनाला असा पाठिंबा हवा तेवढा मिळत नव्हता. सामान्य जनता जोपर्यंत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पेटून उठत नाही तोपर्यंत स्वतंत्रता मिळत नाही आणि यदाकदाचित स्वातंत्र्य मिळाले तरी ते टिकणार नाही. ही गोष्ट डॉ. केशवराव हेडगेवार यांना जाणवत होती.' 
          1928 यावर्षी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव हे क्रांतिकारकांचे त्रिदेव! या तिघांनी मिळून इंग्रज अधिकारी सांडर्स यांचा खून केला. त्यानंतर हे तिघेही फरार झाले. गुरुदेव हा क्रांतिकारक हेडगेवार यांच्याकडे आला. हेडगेवार यांनी राजगुरूला उमरेड येथे पाठवले. तिथे भय्याजी ढाणी हे संघाच्या शाखेचे प्रमुख होते. त्यांनी राजगुरूची व्यवस्था आपल्या घरीच केली.
          डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे 1925 पासून 1940 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक होते. २१ जून १९४० नागपूर येथे डॉ. हेडगेवार यांच दुःखद निधन झाले.त्यांच्यावर रेशीम बाग पुणे येथे अंत्यसंस्कार झाले. तिथेच त्यांची समाधी बांधण्यात आली.
                         'हिंदू जाति का सुख ही मेरा और मेरे कुटुंब का सुख है।
              हिंदू जाति पर आने वाली विपत्ति हम सभी के लिए महासंकट है
              और हिंदू जाति का अपमान हम सभी का अपमान है। ऐसी आत्मीयता की वृत्ति हिंदू समाज के रोम-रोम मे व्याप्त होनी चाहिए। यही राष्ट्रधर्म का मूलमंत्र है।'
                                                                                                                                                                                                                                                  नागेश सू. शेवाळकर
                                                                                        110, वर्धमान वाटिका फेज-1,
                                                                                            क्रांतिवीरनगर लेन-02,
                                                                                            संचेती शाळेजवळ ,थेरगाव
                                                                                        पुणे -411033 (9423139071)  

Post a Comment

 
Top