Add

Add

0

पुस्तकाचे नाव : " नागकेशर "
सत्तासंघर्षाची उत्कंठावर्धक कुटुंबकहाणी

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची नागकेशर ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दाखल झाली आहे.त्यांच्या अन्य कादंबऱ्यांप्रमाणेच बहुपेडी असं कथासूत्र लाभलेली आणि उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकरणारी ही कादंबरी आहे. 
    ही कादंबरी साखर कारखान्यातील कौटुंबिक सत्तासंघर्षावर आधारित आहे. डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील बापूराव आणि बबननाना या दोन भावांमध्ये गजरा सहकारी साखर कारखान्यातील सत्तेसाठी सुरू झालेल्या आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांतही पोचलेल्या संघर्षाचं हे चित्रण आहे.
          प्रथम शाळामास्तर असलेले बापूराव  गजराचे चेअरमन होतात, तर बबननाना कारखान्यात शिरकाव करण्याच्या हेतूने वरकरणी बापूरावांच्या हितचिंतकाची भूमिका घेतात. बापूंचा मुलगा राजकुमार अर्थात प्रिन्स आणि नानांचा मुलगा बाजीराव ही पुढची पिढी.  प्रिन्सशीr आपला विवाह व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या नेत्रादेवीला विचित्र दैवगतीमुळे बाजीरावच्या गळ्यात वरमाला घालावी लागते; तर नवऱ्याच्या (रमेशच्या) छळाला व मारझोडीला कंटाळून आश्रयाला आलेल्या जिद्दी, करारी व देखण्या शलाकाचा, प्रिन्स पत्नी म्हणून स्वीकार करतो.
          गजरा सहकारी साखर कारखान्याची सत्ता आणि अन्य सत्ताकेंद्रे प्रिन्स आणि शलाकाच्या हातातून काढून घेण्यासाठी नेत्रा, बाजीराव, बबननाना, त्यांची पत्नी चंचला षड्यंत्र रचतात. त्यानंतर स्थानिक पातळीवर चाललेला हा संघर्ष राज्य पातळीवरील राजकारणापर्यंत पोचतो, ते शलाका आमदारकीच्या निवडणुकीला उभी राहते तेव्हा. त्या आखाड्यात मग नेत्रा-बाजीरावचा मुलगा सुपरप्रिन्स, रमेश-शलाकाचा मुलगा अभिषेक हे दोघं उतरतात.
          तर आधी स्थानिक पातळीवरचं राजकारण, मग राज्य पातळीवरचं राजकारण, त्यात एकाच कुटुंबातील भावाभावांचा संघर्ष अशा कॅन्वहासवर हे कथानक विश्वास पाटील यांनी गुंफलं आहे. प्रिन्सचा विवाह दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि वाग्दत्त वधू नेत्राला डावलून विवाहित असलेल्या शलाकाशी विवाह करण्याचा निर्णय प्रिन्स घेतो, अशा नाट्यमय प्रसंगाने या कादंबरीची सुरुवात होते.  या पहिल्याच प्रसंगातून बापूराव, प्रिन्स आणि शलाका या व्यक्तिरेखांचा परिचय होतो आणि अशा नाट्यमय प्रसंगाने सुरू झालेली ही कादंबरी त्यातील सघर्षामुळे उत्तरोत्तर रंगत जाते.
          यातील व्यक्तिरेखा पाटील यांनी उत्तम रंगवल्या आहेत. बापूराव राजकारणाच्या रंगात रंगलेले असले तरी आपल्या हातून घडलेल्या काही चुकांची जाणीव त्यांना आहे. गावाला त्यांनी प्रगतिपथावर नेऊन ठेवलं आहे; पण बबननाना या अस्तनीतल्या सापाला पोसण्याची मोठी चूक त्यांच्या हातून घडली आहे आणि त्याचे परिणाम प्रिन्स आणि शलाकाला भोगावे लागतात. नेत्रा, बाजीराव, बबननाना, त्यांची पत्नी चंचला हे सत्तेसाठी हीन पातळी गाठणाऱ्या वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. तर प्रिन्स आणि शलाका सद्गुणांच्या साहाय्याने प्रगतिपथावर जाऊ पाहतात. सुष्ट आणि दुष्ट यांची ही लढाई पाटील यांनी व्यामिश्रतेने रंगवली आहे. रमेश, त्याचा आणि शलाकाचा मुलगा अभिषेक यांच्या उपकथानकातून या संघर्षाला एक वेगळंच वळण लागतं आणि नेत्राच्या हिडीसपणाचं दर्शन घडतं.साखर कारखान्यातील राजकारण, गावातील राजकारण याचं नेमकंचित्रण  पाटील यांनी केलं आहे. 
          माणसाच्या सत्तापिपासेचं, स्वार्थांधतेचं चित्रण पाटील यांनी अतिशय वास्तवतेने केलं आहे. माणसाच्या हीन, नीच वृत्तीसाठी त्यांनी योजलेली नागकेशर ही प्रतिमा अतिशय समर्पक वाटते. त्या प्रतिमेमुळे या कादंबरीला एक वेगळं परिमाण लाभलं आहे आणि म्हणूनच या कादंबरीचं नागकेशरहे शीर्षकही सार्थ ठरतं. सनसनाटी प्रसंगांनी रंगलेलं हे संघर्षनाट्य मुळातून वाचावं असं आहे. पाटलांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
                                                                                                    
                                                                                        -अंजली पटवर्धन
नागकेशर
लेखक : विश्वास पाटील
पृष्ठसंख्या : 404/-
किंमत : 450/-
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

संतोष खेडलेकर .... 

Santosh Khedlekar…


मराठी भाषेत आजवर जे साहित्य निर्माण झाले आहे त्यात असंख्य विषय हाताळले गेले आहेत मात्र अस्सल राजकीय लिखाण अभावानेच झाले आहे. सिनेमा, नाटकाच्या बाबतीतही असेच झाले आहे. मराठी सिनेमात ग्रामीण महाराष्ट्र दाखवला गेला आहे मात्र एखाद दुसरा अपवाद वगळता त्यातरंगेल पाटील, संगीतबारीतील लावणी आणि यातून निर्माण झालेल्या भानगडी दाखवल्या आहेत. पण हे सारे काहीसे उथळपणे. कोणतीही कलाकृती निर्माण होते ती संबंधितांच्या अनुभवविश्वातून. अनुभवांचे हे भावविश्व जितके समृद्ध तितकी ती कलाकृती अस्सल वठते. महाराष्ट्राचे राजकारण आणि सहकार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. सहकारातल्या पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतल्या अनेक धुरिणांनी आपली चरित्रे लिहून घेतली तर अनेकांनी आत्मचरित्रे लिहिली ( खरे तर लिहून घेतली ). पण काही मोजके सन्माननीय अपवाद वगळले तर बहुतांशी नेत्यांनी किंवा त्यांच्या वारसदारांनी प्रतिमानिर्मिती आणि स्वकर्तृत्वाचे ढोल वाजविण्यासाठीच सत्याचा विपर्यास करीत या साहित्याची निर्मिती केली आहे. काही प्रकाशक अशा गुणगौरवपर पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातले राजकारण कसे चालते याचे अस्सल चित्रण मराठी साहित्यात फारसे आलेले नाही. मात्र नुकतीच माझे मित्र ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांची नागकेशर ही कादंबरी प्रकाशित झाली. मेहता पब्लिशिंग हाऊस सारख्या प्रथितयश प्रकाशनने त्यांच्या लौकिकानुसार अतिशय उत्तमरीत्या आपल्यासमोर कादंबरी सादर केली आहे. दोन रात्रीच्या बैठकीत कादंबरी अधाशासारखी वाचून काढली आणि एका अनामिक तृप्तीचा अनुभव घेतला. ही तृप्ती काही नवे वाचल्याची तर होतीच पण या कादंबरीतील अनेक पात्रे त्यातील प्रसंग वगळता केवळ त्यांच्या स्वभावाचा, वागण्या बोलण्याच्या शैलीचा विचार करता माझ्या आसपास वावरत असल्याचा भास पदोपदी होत होता. नागकेशर हे खरे तर एका वेलीचे नाव. उसाच्या शेतात जर ही वेळ फोफावली तर बघता बघता संपूर्ण फड फस्त करते. नागकेशर हेच प्रतिक घेऊन श्री. विश्वास पाटील यांनी सहकारातल्या अपप्रवृत्ती अतिशय समर्थपणे या कादंबरीत रेखाटल्या आहेत. ज्यांनी महाराष्ट्रातल्या सहकाराच्या पट्ट्यातील गावात काही वर्षे संवेदना जाग्या ठेऊन वास्तव्य केले आहे अशा माझ्यासारख्या अनेकांना कादंबरीतील पात्रे कधीतरी बघितल्याचे जाणवते हे कादंबरीचे खरे यश आहे. कधीकाळी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करणारे बापूराव डोंगरे देशमुख बघता बघता शुगरकिंग बनले. त्यांचे बेरकी बंधू बबननाना या वाटचालीतील साम, दाम, दंड, भेद अशी वाऱ्याची दिशा बघून सोयीस्कर भूमिका घेत त्यांना कशी साथ देतात याचे उत्तम चित्रण कादंबरीत उमटले आहे. बापूराव डोंगरे देशमुखांचा मुलगा प्रिन्स याच्या लग्नाच्या प्रसंगापासून कादंबरी सुरु होते. लग्नाच्या दोन दिवस अगोदर एक घटना घडते आणि प्रिन्स त्याच्या नियोजित वधुशी होणाऱ्या लग्नाला नकार देऊन एका विवाहित स्त्रीशी लग्न करणार असल्याचे जाहीर करतो. इथूनच कादंबरी वाचकांची पकड घेते. मोठ्या राजकीय घराण्यातील एकेका व्यक्तीच्या स्वभावाचे पैलू, खोडी, सत्ताकांक्षा उलगडत असताना विश्वास पाटील यांनी जुन्या म्हणी, प्रतीके यांचा इतका बेमालूम वापर केला आहे की आपणही नकळत या कथानकाचा एक भाग होऊन जातो. सहकाराने महाराष्ट्राला काय दिले याचे उत्तर नक्कीच समृद्धी, संपन्नता असे येईल पण याची एक काळी बाजूही आहे. कधी काळी एकोप्याने जगणाऱ्या छोट्या छोट्या निरागस गावात सोसायट्या, दुध संघ, पतसंस्था स्थापन झाल्या. या संस्थांच्या निवडणुका सुरु झाल्या आणि गावागावात दोन गट पडले, घराघरात गट पडले. एकाच राजकीय घराण्यात सत्ता आणि संपत्तीच्या कारणाने वाद सुरु झाले, या वादाची झळ केवळ त्या कुटुंबालाच नव्हे तर त्या परिसराला लागायला लागली. सत्तेच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करायचे आणि याच संपत्तीचा वापर करून पुन्हा सत्ता हस्तगत करायची या दृष्टचक्रात सध्याचे राजकारण फिरते आहे. या व अशा असंख्य घटनांनी ठासून भरलेली ही कादंबरी वाचताना लेखक विश्वास पाटील हे आपले बोट धरून आपल्याला महाराष्ट्राच्या इरसाल राजकारणाची सफर घडवून आणतात. खरे तर दोन सख्ख्या भावांचा राजकारणातील छुपा संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढीत उघड संघर्षाचे रूप घेतो. या संघर्षात साखर कारखान्याची निवडणूक येते, निवडणुकीतील दारू आणि पैशाचे वाटप येते, हाणामाऱ्या येतात. ऐशीच्या दशकात महाराष्ट्रात खासगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे पेव फुटले. साखर कारखानदारांनी कारखान्याच्या जमिनीवर सभासदांच्या पैशावर कॉलेजच्या इमारती उभ्या केल्या, शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजे असे म्हणत विविध राज्यातल्या गर्भश्रीमंतांच्या मुलांना गडगंज डोनेशन घेऊन प्रवेश दिले गेले. पुढे या शैक्षणिक संस्थांचे खासगी ट्रस्ट तयार झाले. या स्थित्यंतराचे वर्णन खरोखर दाद द्यावे असेच आहे. पूर्वीची छोटी खेडी सुबत्ता आल्यावर कशी बदलली, साखर कारखान्याचे संचालक, त्यांच्या बैठका, कारखान्याच्या गेस्ट हाऊसचे वातावरण, या सगळ्याबरोबर बड्यांच्या नाजूक भानगडी, सत्तापालट झाल्यावर कुंपणावरच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा कशा बदलतात अशा असंख्य घटना घडामोडींचे अचूक चित्रण खिळवून ठेवते. विश्वास पाटील यांची कादंबरी म्हटली की धक्कातंत्र आलेच. त्यांच्या यापूर्वीच्या लस्ट फॉर लालबाग या कादंबरीच्या उत्तरार्धात इतक्या वेगवान घटना घडतात की शेवटची वीस पंचवीस पाने वाचण्यापूर्वी पुढे काय असे म्हणत वाचक अस्वस्थ होतो. शेवटच्या आठ दहा पानात जेव्हा ही कोंडी फुटते तेव्हा वाचकच सुटकेचा निश्वास टाकतो. या कादंबरीतही असेच घडते. कादंबरीचा शेवट काय असणार याचे मनाशी आडाखे बांधत असताना विश्वास पाटील पुन्हा एकदा धक्कातंत्राचा उपयोग करतात. कुणीच कल्पना केली नसते अशा रीतीने या कथानकाचा शेवट करतात. हा शेवट काय आहे हे कादंबरी वाचूनच अनुभवले पाहिजे. वाईटावर चांगल्याचा विजय हा भारतीय जनमानसात रुजलेला लोकप्रिय फॉर्म्युला. पण हे करताना कथानकावर यापूर्वी येऊन गेलेल्या कलाकृतीचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असते. मात्र विश्वास पाटील यांनी ही कादंबरी लिहिताना पूर्वसुरींच्या कोणत्याही प्रभावापासून दूर राहून आपल्या अनुभवविश्वाच्या आधारे कथानकात रंग भरले आहेत. विश्वास पाटील यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर, ज्यांची घराणी राजकारणात आहेत आणि ज्यांच्या घरात राजकारण आहे, अशा मुरब्बी नेत्यांनी, त्यांच्या निष्ठावंत, भाबड्या कार्यकर्त्यांनी, बेरकी नातेवाईकांनी आणि वेशीत घोडं अडवणाऱ्या विरोधकांनी दिलखुलास आस्वाद घ्यावी अशी ..... सहकारमहर्षी डोंगरे देशमुख यांच्या शलाका आणि नेत्रादेवी या दोन सुनांमधील सत्तासंघर्षाची वादळी कुटुंबघेणी कर्मकहाणी नागकेशर ! नागकेशराचा वेल हुमणी किड्यापेक्षा जालीम. रानात उगवला तर बोलबोल म्हणता अख्खा फड खाऊन फस्त करतो.पोटआणि पोटचंया दोन बिंदूभोवती गरगरा फिरणारा पुरोगामी महाराष्ट्र ! गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेटत जाणाऱ्या डावपेचांची आणि निवडणुकांच्या हैदोसाची सुरंगी वातनागकेशर ! प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्राचे राजकारण जवळून बघणाऱ्या आणि अनुभवणाऱ्या विश्वास पाटील यांच्या अचूक निरीक्षणाला मनापासून दाद .... खूप दिवसांनी मराठीत अस्सल राजकीय कादंबरी आली आहे, काहीतरी वेगळे वाचू इच्छिणाऱ्या रसिक वाचकांना नागकेशरम्हणजे मेजवानीच ठरणार हे नक्की....Post a Comment

 
Top