Add

Add

0
                नवागतांना घडविणारा व्रतस्थ पत्रकार...
साधारणत एकवीस वर्षांपूर्वीची, सन 1998सालची लिहिलेलं छापून यायला सुरुवात होण्यापूर्वीची घटना. ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ अशा मथळ्याचा तीन फुलस्केप पानी लिहिलेला लेख घेऊन आम्ही दैनिक सागरच्या कार्यालयात पोहोचलो. सकाळची साधारण अकराची वेळ. कार्यालयातली लगभग नुकतीच सुरु झाली असावी. कोणाशीच ओळख, नीटशी माहिती नसलेल्या आम्ही तो लेख एका टेबलाजवळ वर्तमानपत्र वाचत उभ्या असलेल्या गृहस्थांच्या हातात नेऊन दिला. त्यांनी त्यावरून नजर फिरवली मात्र, पुढच्या काही क्षणात, काही कळायच्या आतच तो लेख आमच्या दिशेने भिरकावला गेला.आमच्यासारख्या नवागतांना घडवू पाहणाऱ्या व्रतस्थ भालचंद्र दिवाडकर साहेबांची आणि आमची ती पहिली भेट !
अखिल भारतातील तालुका (चिपळूण) स्तरावरून सर्वप्रथम प्रसिद्ध होण्याचा मान मिळविणाऱ्या दैनिक सागरचे कार्यकारी संपादक, ‘संदर्भकोष’ अशी ओळख असलेले भालचंद्र दिवाडकर साहेब गेले (१६ फेब्रुवारी) ! आणि गेली अनेक वर्षे मनात कुठलाश्या कोपऱ्यात घर करून बसलेला वरील प्रसंग अचानक आठवला. तो व्यक्त होण्यासाठी मनातल्या मनात झुंजू लागला. व्यक्त व्हावं की होऊ नये ? या विचारात आठवडा निघून गेला. गेली अनेक वर्षे निव्वळ नाना (दैनिक सागरचे संपादक, कोकणचे बुद्धिवैभव निशिकांत जोशी) आणि दिवाडकर साहेबांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी आम्ही अधाशासारखा सागर वाचत आलो आहोत. लेखन संस्कार गिरवण्यासाठी, कोकणच्या प्रश्नांची समूळ जाण होण्यासाठी ते आवश्यकच होते. आता या दोघांच्या लेखनापासून आमच्यासारखे अनेक लिहिते तरुण पोरके झाले आहेत. आम्हाला पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दिनांक 7 सप्टेंबर 1998ला दैनिक सागरनेच दिली. सागर मध्ये लिहूनही प्रत्यक्ष पत्रकारिता करण्याचा योग काही आला नाही. लेखन संस्कारासाठी मात्र सागर कायम महत्त्वाचा राहिला. ज्यांना ‘सागर’ने शब्दशः घडविले अशा पत्रकारांच्या सान्निध्यात आमच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला आहे. गेल्या एकवीस वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. नानांपाठोपाठ दिवाडकरांच्या लेखनातील अनेक मुद्दे संदर्भ म्हणून जसजसे स्वीकारत गेलो तसतशी दिवाडकर साहेबांविषयी एक निश्चित भूमिका आमच्या मनात तयार होत गेली. गेल्या आठ-दहा वर्षांच्या कालखंडातील स्वर्गीय नानांसोबतच्या आमच्या गप्पांचं दिवाडकर साहेबांना विशेष कौतुक वाटत राहिलं आहे.
दिवाडकर साहेबांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेबाबत आम्हाला चिपळूण पर्यटन चळवळीतील आमचे ज्येष्ठ सहकारी संजीव अणेराव यांच्याकडून कळले होते. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तेव्हा ‘ते बरे होत आहेत’ अशी माहिती होती, आणि नंतर अचानक ते गेल्याची बातमी आली.मनात कालवाकालव झाली.17 फेब्रुवारीला सकाळी दैनिक सागरमध्ये जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. भालचंद्र दिवाडकर गेली 45 वर्षे एकाच दैनिकात कार्यरत राहिले.ही आजघडीला अशक्यप्राय वाटणारी गोष्ट त्यांच्या आणि नानांच्या संबंधांची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे. गुहागर तालुक्यातील पेवे या गावातून शिक्षणाच्या निमित्ताने ते चिपळूण शहरात आले. सन 1974साली नानांना भेटून, ‘मला लिहायची आवड आहे. मी सागरासाठी लिहू का?’असे विचारत पुढे ते सागरची ‘पडछाया’ बनले. पुरोगामी डाव्या विचारसरणीचा वारसा त्यांना त्यांचे मामा मधुकर शेट्ये यांच्याकडून मिळालेला होता. आपल्या लेखनात त्यांनी तो कसोशीने जपला.मराठीसह हिंदी,उर्दू,इंग्रजी,गुजराती भाषांवरचे त्यांचे प्रभुत्व,वृत्तपत्रीय जगतातील बदलांना स्वीकारून, स्वतःचे लेखन स्वतः टाईप करून देण्यातला त्यांचा साठीतला उत्साह जबरदस्त होता. त्यांच्या फिलॉसॉफीकल लेखांनी,अग्रलेखांनी काळ गाजवला.अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ‘एनरॉनची अंधारयात्रा’ या एनरॉन प्रकल्पाविषयी परखड विश्लेषण करणाऱ्या पुस्तकासह मुलांसाठीची वैज्ञानिक विषयावरची आणि इतर अशी त्यांची एकूण सात पुस्तकं प्रसिद्ध झाली. तर्कशुद्ध विचार आणि बुद्धिनिष्ठ प्रतिपादन करणारे दिवाडकर साहेब चौफेर वाचन, व्यासंगी वृत्ती, कोकणच्या मातीशी बांधिलकी सांगणाऱ्या शैलीदार लेखनासाठी प्रसिद्ध होते.पत्नी व मुलीच्या निधनाने वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळूनसुद्धा ते जिद्दीने उभे होते. ‘कोकण विकासाची दिशा’ हा विषय तर आम्ही त्यांच्या आणि नानांच्या लेखनातूनच अभ्यासला. दहशतवाद, विविध भागातील राजकारणाचा अभ्यास शोधपत्रकारितेसाठी त्यांनी देशभर प्रवास केला. हजारो लेख लिहिले. पत्रकारितेतील अनेक आव्हाने त्यांनी लिलया पेलली.
तर, एकवीस वर्षांपूर्वीची घटना घडली तेव्हा आम्ही रत्नागिरीला शासकीय तंत्रनिकेतनात शिक्षण घेत होतो. सन1998च्या सप्टेंबर महिन्यात 18ते 20तारखांना होऊ घातलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभा संगम’या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या नियोजन बैठकीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आम्ही पहिल्यांदाच रत्नागिरीहून पुणे शहराचा प्रवास केला. ही घटना जुलै-ऑगस्ट 1998मध्ये केव्हातरी घडली.या प्रवासाचा, तिथल्या बैठकीचा,वातावरणाचा आमच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला की परततनाच आम्ही या संपूर्ण संमेलनाबाबत तीन लेख लिहायचे नियोजन करूनच घरी, चिपळूणला परतलो होतो. त्यातला ‘हाप्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ लिहिलेला हा पहिला लेख काही क्षणात, काही कळायच्या आतच व्रतस्थ भालचंद्र दिवाडकर साहेबांनी आमच्या दिशेने फेकला होता. तेव्हा त्यांच्या तोंडचे वाक्य होते, ‘दिवसातून तीन वेळा एस.टी. गाड्या पुण्याला जाऊन परत येतात. त्या प्रवासावर लेख काय लिहायचा ?’ अभाविकपणे कानावर आदळलेल्या त्यांच्या या वाक्याने आम्ही अक्षरशः थरथरलो होतो. आज आम्ही म्हणू त्या किंवा सुचविणारा सांगेल त्या विषयवर लेख होतो. पण तेव्हा ‘त्या’ लेखाची पाने गोळा करून आम्ही परतलो होतो. अठरा वर्षांचे होतो. अजून एकही लेख कोठेही प्रसिद्ध झालेला नव्हता. काही दिवस विचारात गेले. पुन्हा धाडस करून आम्ही त्या साहित्य संमेलनाचे महत्त्व प्रतिपादित करणारा ‘प्रतिभा संगम’ का ? व कशासाठी ?’हा दुसरा लेख लिहिला. तो मात्र 7 सप्टेंबर 1998 ला छापला गेला. त्यावेळी झालेला आनंद पहिल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर कसा होता ? ते शब्दात सांगता येणार नाही. दिवाडकर साहेबांसोबतची ‘ती’ पहिली भेट आम्हाला ‘बाळकडू’ देणारी ठरली. तो ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ हा अप्रकाशित लेख आजही आमच्या संग्रही आहे.
बाळकडू (शास्त्रीय नाव हेलेबोरस नायगर) हे एक बहुवर्षायू, सदाहरित सपुष्प विषारी झुडूप आहे. दक्षिण व मध्य यूरोपपश्चिम आशिया आणि भारतातील डोंगराळ भागात ते वाढते. लहान मुलांना ठराविक काळाने उद्‌भवणाऱ्या रोगलक्षणांचा (उदा. ताप) प्रतिबंध करण्यासाठी याचा रस योग्य प्रमाणात देतात. त्याची फुले कुळातील नसली तरी रानटी गुलाबाप्रमाणे दिसतात. दिवाडकरांचा आमचा वरील अनुभव हा वरून अत्यंत काटेरी वाटला तरीही तो टवटवीत गुलाबासारखा, प्रसन्न मनाने आम्ही स्वीकारला होता. असे नक्की का घडले असेलं ? अशा स्वाभाविक प्रतिक्रियेमागची दिवाडकर साहेबांची नेमकी भुमिका काय असेल ? या वागण्यातून त्यांना नक्की काय सुचवायचे असेल ? असे प्रश्न स्वतःला विचारून घेत, अनेक अंगांनी आम्ही त्या घटनेचा विचार केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात वरती म्हटल्याप्रमाणे आम्हाला पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दैनिक सागरने दिली. अलिकडच्या काही वर्षांत एखाद्या छानश्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असल्याबाबतची माहिती मिळाल्यावर फोन करून वृत्तांत मागवून घेणारे, चिपळूणात संपन्न झालेल्या जलसाहित्य आणि बोलीभाषा संमेलनांचे महत्त्व एका वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत, विस्तृत वृत्तांत लिहायला लावून ‘रसिक’ पुरवणीत पानभर छापणारे, याच संमेलनात राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांचे झालेले अभ्यासपूर्ण भाषण शक्य तेवढे विस्तृत मागवून छापणारे दिवाडकर साहेब अलिकडच्या प्रत्येक भेटीत नानांप्रमाणे काहीतरी नवीन, सकस, दर्जेदार देऊन जायचे. आमचा तो काही मिनिटांचा वेळ सत्कारणी कसा लागेल ? याचीच जणू ते काळजी घ्यायचे. दैनिक सागरचा वेब माध्यमात तितका जम बसला नाही. याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवायची. म्हणूनच की काय दिवाडकर साहेबांनी ‘कोकण अॅलर्ट’ नावाचे संकेतस्थळ स्वत: सुरु केले होते. त्यावर आमचे काही लेखही, त्यांच्या मेलवर पोहोचल्यानंतर काही तासात प्रसिद्ध झाले होते. मागाहून ते लेख सागरमध्ये प्रसिद्ध झाले. हे सारे पाहिल्यावर आम्हाला, वयाच्या अठराव्या वर्षी पचवलेल्या त्या एकवीस वर्षांपूर्वीच्या ‘बाळकडू’ प्रसंगाची आठवण व्हायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या घटनेनंतर ज्या ‘स्थितप्रज्ञ’ वृत्तीने आम्ही लिहित राहिलो त्याबाबत आमचे आम्हालाच आश्चर्य वाटायचे. दिवाडकर साहेबांना नंतर तो प्रसंग लक्षातही राहिला नसावा !
दुर्दैवाने नानांप्रमाणेच दिवाडकर साहेबांचेही अनेक संकल्पित पुस्तकांचे लेखन राहिले.दैनिक सागर हे नुसते वृत्तपत्र नसून ते कोकणचे सांस्कृतिक प्रतिबिंब आहे. कोकणातील अगण्य लिहित्या हातांचे, ‘सागर’ विद्यापीठ राहिले आहे. अनेकांप्रमाणे स्वर्गीय नाना आणि दिवाडकर साहेबांच्या सावलीत आम्ही लिहिते झालो हे आमचे भाग्य ! पण हा सागर नावाचा संस्कार आमच्या पुढच्या पिढीवर त्याच ताकदीने व्हायला हवायं. नाना गेल्यानंतरच्या पहिल्या भेटीत सागरसाठी साप्ताहिक स्तंभलेखन सुरु करण्याबाबतची सूचना दिवाडकर साहेबांनी केली होती. पण ते जमले नाही. अगदी हल्ली-हल्ली आदरणीय शुभदा जोशी मॅडम यांनीही सागरकरिता रोज एखादी ‘फोटोस्टोरी’ सुरु करण्याबाबत सुचविले होते, दुर्दैवाने तेही जमलेले नाही. लेखनाच्या प्रारंभिक दिवसातील सोबती म्हणूनही असेल कदाचित, पण आजही सागरसाठी आमचा जीव हळवा होतो. म्हणूनच नानांच्या, दिवाडकर साहेबांच्या आठवणी मनात जपत, सागरसाठी शक्य तेवढं लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो.
                                                               धीरज वाटेकर
                                                                                                                                     मो. 9860360948,
                                                 ई-मेल : dheerajwatekar@gmail.com    

Post a Comment

 
Top