Add

Add

0

दहा बाय दहाच्या खोलीत उभारले भारती विद्यापीठ

'माझ्या गावातला मॅट्रिक झालेला मी पहिला. पुण्यात आलो आणि जेथे एक खडा मारला, तर दहा विद्वानांना लागतो, अशा सदाशिव पेठेतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत विद्यापीठाची स्थापना केली,' दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम आपला परिचय करून देताना हमखास अशीच सुरुवात करीत.

स्वयंभू नेता ...कॉमेंट्स पाहा

'माझ्या गावातला मॅट्रिक झालेला मी पहिला.पुण्यात आलो आणि जेथे एक खडा मारला, तर दहा विद्वानांना लागतो, अशा सदाशिव पेठेतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत विद्यापीठाची स्थापना केली,' दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम आपला परिचय करून देताना हमखास अशीच सुरुवात करीत. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरश:साम्राज्यच निर्माण केले. वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना कदम यांनी राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे आपले पाय घट्ट रोवले.
सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पापीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत केली. 1961 मध्ये ते पुण्यात आले. 'रयत'च्याच एका हायस्कूलमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी तेव्हाच्या पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. काही काळाने त्यांनी '1980 च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या' या विषयावर डॉक्टरेट मिळविली. केवळ विशीत असताना त्यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली. आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. गेल्या 53 वर्षांत संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी 180 शाळा-कॉलेजेस असून, त्यात तब्बल दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. त्यामध्ये दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी कॉलेजांची स्थापना केली आहे. त्यांच्या या योगदानाची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. लोकश्री, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल मानवता सेवा अवॉर्ड, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल मराठा विश्वभूषण पुरस्कार, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे एक्सलन्स अॅवॉर्ड इन एज्युकेशन, कोल्हापुरातील उद्योगभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

शिक्षणासह सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. भारती सहकारी बँक, सोनहिरा सरकारी साखर काररखाना, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी, सोनहिरा कुक्कुटपालन संघ, कृष्णा-येरळा सूतगिरणी यांसह पुणे, सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे. भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे.
राजकीय वाटचाल ...
कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जात. ते 1990मध्ये प्रथम राज्याचे शिक्षणमंत्री बनले. पुढे सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील पतंगराव अविभाज्य घटक होते.1999 ते 2004 या काळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री म्हणून पदभार सांभाळला. नोव्हेंबर 2004मध्ये ते सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री बनले.मार्च 2009 मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले.19 नोव्हेंबर 2010 रोजी त्यांच्याकडे वन,मदत आणि पुनर्वसन खात्याची धुरा आली. सांगलीतील वांगी-भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत.डॉ.कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले. दिल्लीतील वरिष्ठांशीही अत्यंत घनिष्ठ संबंध होते. अघळपघळ, आणि स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखविणे, हा त्यांचा स्वभावविशेष होता.
लोकप्रिय नेता ...
पतंगराव कदम राजकीय वर्तुळात दिलदार, पण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते.त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीला शक्य ती मदत करण्यास ते अजिबात मागेपुढे पाहत नसत. मात्र,रोखठोकपणामुळे काही वेळा अडचणीतही येत. मदत आणि पुनर्वसन खात्यामार्फत त्यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठी मदत केली. म्हैसाळ योजनेचे वीजबिल मदत आणि पुनर्वसन विभागाच्या योजनांतून भागवीत.त्यांचा मतदारसंघही दुष्काळी भागात मोडत असे.तेथे साखळी बंधाऱ्यांची योजना राबवून कदम यांनी तेथील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजना मार्गी लागाव्यात यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. पलूस येथे औद्योगिक वसाहत उभारली. तेथे वाइन प्रकल्प चालवून रोजगारनिर्मितीचाही प्रयत्न त्यांनी केला. मुलगा अभिजित याच्या अपघाती मृत्यूमुळे झालेल्या आघातातून सावरत त्यांनी राजकीय काम पुढे सुरूच ठेवले.गटातटाच्या राजकारणामुळे सांगली महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हातून निसटली असता नाच मागील निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेऊन तेथे काँग्रेसला सत्तेत आणले. काँग्रेसशी ते अखेरपर्यंत निष्ठावंत होते.
श्रद्धांजली ...
एका लहान खेड्यात जन्म घेऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. पतंगराव कदम हे मूर्तिमंत उत्साही व्यक्तिमत्व होते. खेड्यातील मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये गणित व इंग्रजी शिकवावे, या उद्देशाने त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. यशवंतराव मोहिते,एन.डी.पाटील अशा नेत्यांसह झालेल्या या स्थापनेच्या बैठकीस मी उपस्थित होतो. पक्ष-विचार यांचा कोणताही भेद न करता सर्व क्षेत्रांतील गोरगरीब आणि विद्यार्थ्यांना त्यांनी आयुष्यभर भरभरून मदत केली. त्यांच्या या स्वभावामुळेच सर्वच पक्षांत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
                                                                                                    - उल्हास पवार, ज्येष्ठ नेते 

डॉ.पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य मोठे आहे. एका वेगळ्या प्रकारची दिशा त्यांनी शिक्षणाला दिली.एका छोट्या संस्थेपासून अभिमत विद्यापीठापर्यंतची वाटचाल त्यांनी भारती विद्यापी ठाच्या मार्फत करून दाखविली. शिक्षण क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या पंतगरावांना श्रद्धांजली.
- डॉ. अरुण निगवेकर,माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग
आमदार : भिलवडी मतदारसंघ
संस्थापक : भारती विद्यापीठ, पुणे
कुलपती : भारती विद्यापीठ, पुणे
राजकीय कार्य -
1991 ते मे 1995 : शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य
ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 : उद्योग, वाणिज्य आणि संसदीय कार्यमंत्री.
नोव्हेंबर 2004 : सहकार, मुदत व पुनर्वसन मंत्री.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष
डिसेंबर 2008 : महसूल, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, शालेय शिक्षण मंत्री.
मार्च 2009 : महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य.
नोव्हेंबर 2009 : वनमंत्री, महाराष्ट्र राज्य.
19 नोव्हेंबर 2010- वने मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य
विविध समित्यांवरील सदस्यपदे ...
बोर्ड ऑफ डायरेक्टर : महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ
सिनेट आणि कार्यकारिणी सदस्य, पुणे विद्यापीठ
सिनेट आणि कार्यकारिणी सदस्य, मुंबई विद्यापीठ
राज्याच्या विविध समित्या आणि उपसमित्यांचे कायदेशीर सल्लागार
कुलपतिद्वारा नियुक्त शिवाजी विद्यापीठ सिनट सदस्य
आजीव सभासद; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
सिम्बोयसिस एज्युकेशन संस्था, पुणे 

Post a Comment

 
Top