Add

Add

0

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रयत्नांना यश : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भाजपला मदतीचा हात

                        'स्थायी' अध्यक्षपदी सुनील कांबळे बिनविरोध

पुणे (प्रतिनिधी ):- पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पुणे महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी दि.5 रोजी बिनविरोध पार पडली. महापालिकेच्या इतिहासात स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोधपणे पार पडली आहे..
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी दि.5 रोजी 
होती.या पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे आणि राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे यांच्यात लढत होणार होती.अर्थात, या लढतीत विजय हा भाजपचा होणार होता. त्यामुळे मंगळवारी केवळ औपचारिकता पूर्ण केली जाणार होती. त्यानुसार सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. त्यात स्मिता कोंढरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिलीप बराटे यांनी कोंढरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार त्यांनी कांबळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा. अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आदी उपस्थित होते..
सुनील कांबळे यांची निवड जाहीर होताच सभागृहाबाहेर भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. या निवडीमुळे आता मातंग समाजाला स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी तिसऱ्यांदा मिळाली आहे. कांबळे हे सलग पाचवेळा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आतापर्यंत भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवली आहे. गेल्यावर्षी ते स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे दावेदार होते. मात्र, ऐनवेळी योगेश मुळीक यांना उमेदवारी देण्यात आली होती..
पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडे स्थायी समितीची सूत्रे आहेत. 16 सदस्यांच्या समितीत 10 भाजपचे, 4 राष्ट्रवादीचे, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यातील 8 सदस्यांचा 2 वर्षांचा कार्यकाल गुरुवारी दि.28 फेब्रुवारीला  संपला आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्याने आता स्थायी समितीमध्ये भाजप व सहयोगी सदस्यांची संख्या 11 झाली आहे. शिवसेना बरोबर असल्याने भाजपचे स्थायी समितीमधील बहुमत आणखी बळकट झाले आहे. त्यातच आता स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध पार पडल्याने आगामी काळात अंदाजपत्रकांची अंमलबजावणी करणे सोपे जाणार असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केेले जात आहे..

Post a Comment

 
Top