Add

Add

0
सागरपुत्र वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेने सभागृह भारावले
अण्णा शिरगावकर : दाभोळमधील साठ वर्षे ‘वाटचाल’ विशेषांकाचे भावपूर्ण प्रकाशन
 दापोली (धीरज वाटेकर):- ‘आदरणीय अण्णा ! आम्ही तुमचे सागरपुत्र आणि कोकणकन्या आज या समारंभातून तुमचं आमच्यावर असलेलं मोठं ऋण अंशतः फेडत आहोत. आम्हाला काहीसं ऋणमुक्त होऊ द्या. तुमचं ध्येय, स्वप्न होतं सागरपुत्र विद्याविकास संस्था ! तुम्ही सर्वस्व ओतलंत त्यासाठी...!’ अशा आशयाच्या कृतज्ञता पत्राचे वाचन व्यासपीठावरून सुरु असताना शीघ्र गतीने सारे सागरपुत्र आणि वाशिष्ठीकन्या वसतिगृहाचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व्यासपीठाच्या दिशेने झेपावत 89वर्षांच्या अण्णांसमोर नतमस्तक झाले.हा अत्यंत भावनिक प्रसंग याचि देहि याचि डोळा अनुभवलेल्या, तुडुंब भरलेल्या सभागृहातील प्रत्येकाच्या डोळ्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. निमित्त होते अण्णा शिरगावकर: दाभोळमधील साठ वर्षे वाटचाल’ या विशेषांकाच्या प्रकाशनाचे. दापोलीच्या राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात शिवजयंतीदिनी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.
तालुक्यातील जगप्रसिद्ध दाभोळमध्ये आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण साठ वर्षे घालविलेले आणि सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिरगाव(चिपळूण)येथे आपल्या मुलीकडे वास्तव्यास असले ले कोकणच्या प्राचीन इतिहासाचे संशोधक, पुराणवस्तू संग्राहक,अभ्यासू लेखक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा शिरगावकर यांच्या दाभोळमधील साठ वर्षांच्या कार्यकालावर आधारित ‘वाटचाल’ हा लेखक धीरज वाटेकर आणि त्यांचे सहकारी विलास महाडिक यांची निर्मिती-संकलन-संपादन असलेला 132पानी,संपूर्ण रंगीत,दुर्मीळ माहिती, कात्रणे आणि छायाचित्रांचा संग्रह असा संग्राह्य विशेषांक शिवजयंतीला उपस्थितांच्या हस्ते प्रकाशित झाला.हा विशेषांक म्हणजे,‘दाभोळमध्ये राहून अण्णा शिरगावकर यांनी केलेल्या कामाचा वयाच्या 89व्या वर्षी समाजाला सादर केलेला अहवाल होय’. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर स्वतः अण्णा, डॉ. अशोक देशमुख आणि निवृत्त प्राचार्या शांता सहस्रबुद्धे, भागवत हॉस्पिटलचे संचालक डॉ. एन. आर. भागवत, धीरज वाटेकर, विलास महाडिक, कार्यक्रमाचे निमंत्रक उद्योजक-पत्रकार रमेश जोशी, उखाणेकर श्रीमती मिलन मोहन गुजर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अण्णांनी, शिवजयंती आणि संत रोहिदास जयंतीच्या अनुषंगाने आरक्षण आणि माणसांना जातीजातीत विभागल्या गेलेल्या सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य केलं. ‘मला वेळच मिळत नाही’ अशी सबब देणाऱ्यांना आपल्या अनुभवातून समजावण्याचा प्रयत्न केला. सागरपुत्र वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर त्यांचा सन्मान घडवून आणल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ अशीच काहीशी त्यांची भावना झाली होती.कार्यक्रमाचे निमंत्रक उद्योजक-पत्रकार रमेश जोशी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील आपली भूमिका मांडली.एका साध्या सूचने वरून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. उखाणेकर श्रीमती मिलन मोहन गुजर यांनी कवितावाचन केले.वाशिष्ठीच्या तीरावरील दानशूर स्वामीभक्त अंबरीश उर्फ दादा खातू आणि परिवाराच्या सेवाभावी वृत्तीस अण्णांनी हा विशेषांक समर्पित केला आहे. स्वामींच्या कृपेने जीवनात केलेल्या कणभर कामाला अण्णांनी मणभर कौतुकाची झालर लावल्याची भावनिक प्रतिक्रिया दादा खातू यांनी व्यक्त केली. दाभोळच्या डॉ. अ. न. केतकर यांनी सागरपुत्र संस्थेतील अण्णांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णांसोबत साठ वर्षांपूर्वी दाभोळला आलेले डॉ.एम.बी.लुकतुके म्हणाले,तेव्हा दाभोळमध्ये कस्टम,पोर्ट,शाळा,हेडमास्तर एवढेच काय ते होते. अण्णांनी गावाला अनेकांच्या सहकार्याने सामाजिक आणि बौद्धिक पातळीवर गावपण देण्याचा प्रयत्न केला. अण्णांच्या पूनम स्टोअर्सच्या मागील रिकाम्या जागेत काऊंटरपेक्षा अधिक गर्दी कायम राहिली असे त्यांनी सांगितले.
वाटचाल विशेषांकाच्या निर्मिती-संकलन-संपादन विषयी लेखक धीरज वाटेकर यांनी आपल्या मनोगतातून माहिती दिली. वयाच्या 89व्या वर्षी अण्णांचा तरुणांना लाजविणारा उत्साह, त्यांची तल्ल ख बुद्धी, कामातील वक्तशीरपणा, कागदावरच्या नोंदी यांबाबत आपले अनुभव सांगितले. कोकणला प्राचीन इतिहास नाही हे शासकीय तज्ज्ञांचे म्हणणे आपल्या अविश्रांत पायपिटीतून, पुराणवस्तूंच्या संग्रहातून खोडून काढणारे अण्णा, कोणत्याही शासकीय मदतीशिवाय तब्बल नऊ ताम्रपटांचा शोध घेणारे भारतातील एकमेव रेकॉर्ड नोंदविणारे अण्णा या त्यांच्या कामाची आजही शासनदरबारी योग्य नोंद घेतली न घेल्याची खंत वाटेकर यांनी व्यक्त केली. निवृत्त प्राचार्या शांता सहस्रबुद्धे यांनी बोलताना, अण्णांनी एवढे लेखन केले परंतु हे सारे उभे करताना त्यांना  किती उंबरे झिजवायला लागले ? त्यावेळी कायकाय अनुभव आले असतील,किती वेदना झाल्या असतील.याची नोंद कुठेही केलेली नाही. या मुद्द्यावर भाष्य केले. अण्णांना मिळालेले ‘दलितमित्र आणि निर्भय’हे दोन पुरस्कार आपल्याला अधिक भावतात असेही सहस्रबुद्धे म्हणाल्या.अण्णांसारख्या मुठभर कामाच्या वेडाने झपाटलेल्या माणसांमुळे हे शहाण्यांचे जग कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.अशोक देशमुख यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात व्यक्तीसापेक्ष असंख्य ओव्यांचा संदर्भ दिला.अण्णा आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यातला त्यांनी अनुभवलेला दिलखुलास गप्पांचा किस्सा आवर्जून सांगितला.   
साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात अण्णांच्या, स्वामी स्वरुपानंदांपासून सत्यसाईबाबांपर्यंत आणि दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयींपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंतच्या झालेल्या मार्गदर्शन भेटींच्या नोंदी अंकात आहेत. सुरुवातीच्या भागात सुमारे 40 पानात अण्णांनी दाभोळ गावचा विविध अंगांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत आढावा घेतला आहे.दुसऱ्या भागात संबंधित निवडक लेख आहेत.तिसऱ्या आणि अंतिम भागात इतिहास आणि संशोधन, समाजकार्य, सागरपुत्र आणि शैक्षणिक, प्रशस्ती आणि सन्मान या अनुषंगाने सचित्र कार्यदर्शन अनुभवायला मिळेल. दाभोळच्या इतिहासाचे संदर्भही अंकात आहेत.अण्णांच्या सागरपुत्रवर यापूर्वी लेखन केलेल्या नामवंतांची यादी स्तंभित करते. त्यांचा मरणाच्या दारातून हा लेख वेगळेपणा दर्शविणारा आहे. तर मॅनर्स, एटीकेट्स, शिष्टाचार आणि वागावे कसे? वगैरे हा लेख अण्णांच्या सेवाकामाचे गमक स्पष्ट करणारा आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या दाभोळचे वर्णन कवितेची मूळ प्रत, विविध संशोधने,विदेश दौरे,अंजनवेलच्या प्रिन्सची ऐतिहासिक कोकण भेट, दाभोळच्या अनेक जुन्या जाणत्यांच्या आठवणी, दाभोळमधील पहिली शिवजयंती, पुस्तक प्रकाशने, महाराष्ट्राच्या पहिल्या आणि एकमेव मुख्यमंत्र्यांनी केलेली वाशिष्ठी खाडीची सैर,अण्णांच्या प्रचारसभा,मुंबईतील घरेलूकामगार संघाचा प्रारंभ,आपल्या 60वर्षांच्या दाभोळ मधील कारकिर्दीत अण्णांनी समाजकारण,राजकारणपुराणवस्तूसंग्रहइतिहाससंशोधन या क्षेत्रात केलेल्या डोंगराएवढ्या कामाच्या अहवालाची दस्तऐवज स्वरुपात संक्षिप्त नोंदींनीअंक संपन्न आहे.
यावेळी स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या आशाताई कामत,डॉ.प्रशांत मेहता,डॉ.दिलीप जोशी, डॉ. गोविंद जोशी,डॉ.दीपक हर्डीकर,डॉ.शैलजा जोशी,डॉ.अशोक निर्बाण,श्री.व सौ.शेलार,मुख्याध्यापक सुनिल देसाई,दाभोळचे डॉ.अ. न.केतकर,डॉ.एम.बी.लुकतुके, अनिष पटवर्धन, किशोर तांबडे,दादा मुरमुरे, कोमसापच्या दापोली अध्यक्षा रेखा जेगरमल, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह फाटक,वाशिष्ठी कन्या छात्रालयाच्या माजी अधिक्षका आरती लाड, नूतन प्रकाशनच्या सौ. रिना आणि श्री.रविंद्र लब्धे, नवी मुंबईच्या सौ. विभावरी कामेरकर, श्री.व सौ. उज्ज्वला बेंडखळे यांच्यासह सुमारे अडीचशे नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कृतज्ञता पत्राचे वाचन कुणाल मंडलिक यांनी केले. गप्पा-टप्पांच्या सुमारे अडीच तास रंगलेल्या साध्या कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी खमंगवडा आणि चहापानाने झाला. आयोजन सागरपुत्र आणि वाशिष्ठी कन्या छात्रालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी केले. 


Post a Comment

 
Top