Add

Add

0

      पुणे व मुळशी बाजार समितीचे एकत्रीकरण..?

           मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व नष्ट ?

पुणे (प्रतिनिधी):-कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती, मुळशी यांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश पुणे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) आनंद कटके यांनी शुक्रवारी दि. 8 मार्च रोजी दिले आहेत. त्यामुळे नव्या बाजार समितीची स्थापना झाल्याने सध्याच्या दोन्ही बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले आहे, तर दोन्ही समित्यांच्या एकत्रीकरणानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे अस्तित्वात आल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

नवनिर्मित कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या प्रशासकपदी सहकारी संस्थांचे सह निबंधक बाळासाहेब जयराम देशमुख यांची नेमणूक करण्यात येत आहे, असेही नमूद केले आहे.नव्या आदेशामुळे या समितीचे बाजार क्षेत्र हे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दतील सर्व गावे, पुणे खडकी व देहूरोड छावणी मंडळाच्या हद्दीतील क्षेत्र, हवेली तालुक्यातील उर्वरित सर्व गावे व मुळशी तालुक्यातील सर्व गावे असे राहतील, तर मुख्य बाजार व उपबाजारामध्ये प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे मुख्य बाजार आवार श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड,गुलटेकडी,पुणे 37 हे राहील.उपबाजार खडकी,पिंपरी-चिंचवड,मोशी,स्व. अण्णासाहेब मगर बाजार आवार मांजरी, उत्तमनगर, खेड शिवापूर व प्रस्तावित उपबाजार ताथवडे-मुळशी हे राहतील.
मुळशी तालुक्यातील मौजे ताथवडे येथील सर्व्हे नंबर 99 मधील 36 हेक्टर 42 आर गायरान जागा संपाद नाबाबत 31 मे 2010 रोजी जाहीर झालेल्या संपादनाच्या अधिसूचनेनुसार ही जमीन नव्याने अस्तित्वात आले ल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेस संपादन करण्याचे व वापराचे अधिकारही राहतील. त्याप्रमाणे सदर जमीन संपादनाकरिता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) 1963 चे कलम 12 (1) नुसार 25 जुलै 2002 रोजी दिलेली परवानगी ही नव्याने अस्तित्वात आलेल्या बाजार समितीस लागू राहील व त्यानुसार बाजार समिती कार्यवाही करेल. आर्थिक वर्ष 2013-14 च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालानुसार मुळशी बाजार समितीचे स्वतःचे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे बाजार समिती बंद करणे अथवा तिचे इतर बाजार समितीमध्ये विलीनीकरण करणे आवश्यक असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. 
मुळशी बाजार समितीने  कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेमध्ये विलीनीकरण करण्याबाबतचा ठराव 9 ऑगस्ट 2018 रोजी केला आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी तसा प्रस्ताव राज्य कृषी पणन मंडळाकडे सादर केला होता. याबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर पणन मंडळाच्या 23 फेब्रुवारी 2019 च्या संचालक मंडळ बैठकीत विलीनीकरणास मान्यता देण्यात आल्याचेही याबाबतच्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

Post a Comment

 
Top