Add

Add

0

राजेंद्र सोनार एक हरहुन्‍नरी व्‍यंगचित्रकार
सध्‍या धुळ्यात स्‍थायिक असलेले राजेंद्र गंगाधर सोनार हे एक व्‍यंगचित्रकार.  पण त्‍यांच्‍या अंगी विविध कलागुण असल्‍यामुळे ते हरहुन्‍नरी कलाकार म्‍हणूनच ओळखले जातात. पत्रकार, संपादक,  चित्रकार,  छायाचित्रकार, कवी, बासरीवादक, हार्मोनियम वादक, बेंजो वादक, सुतारकाम, गवंडीकाम,  राजकारणी असे अनेक कलागुण त्‍यांच्‍या ठायी आहेत. स्‍पष्‍टवक्‍तेपणामुळे त्‍यांना जीवनात अनेकदा त्रास सहन करावा लागला तरी त्‍याची त्‍यांनी कधी तमा बाळगली नाही.
            राजेंद्र सोनार यांचा 2 जानेवारी 1963 ला जन्‍म झाला.  त्‍यांचे बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण झाले आहे, पण जीवनाच्‍या शाळेत त्‍यांनी मिळवलेले अनुभव डॉक्‍टरेटच्‍या तोडीचे आहेत. त्‍यांचे पहिले व्‍यंगचित्र 1988 साली जळगावच्‍या गांवकरीमध्‍ये प्रकाशित झाले. आतापर्यंत 10 हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत. तसेच चित्रांची 20 हून अधिक प्रदर्शने झाली आहेत. 
            आपल्‍या वाटचालीविषयी ते म्‍हणतात, लहानपणी पहिलीत असतांना पाटी आणि पेन्सिल मिळाली. मुले पहिल्यांदा अ ब क ड शिकतात, मी चित्रे काढली. चित्रे म्हणजे काय रेषा काढल्या. विविध प्रकारच्या रेषा, पण माणसाचे चित्र जमत नव्हते. आईने पाटीवर एक गोल काढला.  त्यात नाक, डोळे, तोंड, कान तिला जमेल तसे काढले. मलाही शिकविले. त्यामुळे आई हाच माझा चित्रकलेतला पहिला आणि शेवटचा गुरु. नंतर भरपूर सरावामुळे मला कोणाकडे शिकायची आवश्यकता भासली नाही. त्या काळी आमच्याकडे चांदोबा नावाचे मासिक यायचे. त्यात भरपूर चित्रे असायची. ती पाहून तशीच चित्रे काढायला लागलो. गणितही आईमुळे शिकलो. दोन डोळे, एक नाक, हाताला पाच बोटे हे सर्व अचूक हवे तर गणित आलेच पाहिजे. पुढे रावेर येथे के. एम. पाटील नावाचे शिक्षक पाचवीला होते. के म्हणजे कडु नाव. त्यावेळी आर्ट मास्टर झालेले चित्रकला शिक्षक होते. ते मला प्रत्येक चित्रकला स्पर्धेत भाग घ्यायला लावायचे. तालुक्यात जिल्हा पातळीवर पहिल्या क्रमांकाची अनेक बक्षिसे मिळविली. ते सुद्धा मोठे जिद्दी होते.  पुढे त्यांनी एम. ए. केले, पी. एच. डी. केली.  नंतर एम. जे. कॉलेजला मराठी विभाग प्रमुखही झाले. मी दहावी नंतर धुळे येथे स्कूल ऑफ आर्टसला प्रवेश घेतला. फाऊंडेशन  डिप्लोमा केला. नंतर वडिलांनी कॉमर्सला टाकले.  बी.कॉम. झालो, पण चित्रकला- फोटोग्राफी सोडली नाही.
1976 ला धडगाव (जि. धुळे) येथे आय सोली 2 हा कॅमेरा वडिलांनी घेतला. मी सर्वात आधी त्यात रोल टाकायला शिकलो, तेव्‍हापासून कॅमे-याशी नाते जोडले ते कायमचे. वृत्तपत्रात 1981 पासून फोटो प्रकाशित झाले. वृत्‍तपत्र छायाचित्रकार म्‍हणून अनेक छायाचित्रे काढली. अनेक जीवघेण्‍या प्रसंगातून बचावलो. व्यावसायिक  कामे खूप केली. 300 च्या वर लग्नाच्या ऑर्डरी केल्या. व्हिडीओ 100 च्या वर आहेत. अनेकांना फोटोग्राफी शिकविली. कॅमे-याच्‍या जगात जस-जसा बदल घडला तस-तसे मी कॅमेरे बदलले. पण त्या मागील डोळा तोच आहे. फक्त चष्म्याचा नंबर मधुमेहामुळे वाढला आहे.
            आज भारतात माहीत नाही पण महाराष्ट्रात बॉलपेनमध्ये चित्रे काढणारा मी एकमेव आहे. 2017 च्‍या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये बॉलपेनमध्ये चित्र काढणारा चित्रकार म्हणून नोंद झाली आहे, असे ते अभिमानाने सांगतात. 1982 साली  मिनाकुमारी यांचे पाकीजा चित्रपटातील चित्र बॉलपेनमध्ये काढले. मी पहिल्यांदाच बॉलपेनचा वापर केला. कारण ऑईल कलरमध्ये चित्र काढले तर त्या काळी 50 ते 75 रुपये खर्च यायचा. एवढे पैसे रोज मिळायचे नाहीत. बॉलपेनला कमी खर्च यायचा.  तिनशेच्‍यावर बॉलपेनमध्ये चित्रे काढली आहेत.  स्टिपलिंग बिंदुचित्रे काढली आहेत. ऑइल कलर, वॉटर कलर, वॉटरप्रूफ इंकमध्‍ये  चित्रे काढली आहेत. हे करत असतांना जे शिकायला मिळाले ते शिकलो. हार्मोनियम, फिडल-बेंजो, बासरी वाजवायला शिकलो.  नंतर बासरी बनवायला शिकलो. स्क्रीन पेंटिंग व्यवसाय केला. पेंटिगचा व्यवसाय केला. हीरोचे बोर्ड्स रंगवायचो. गवंडीकाम येते. सुतारीकाम येते. फोटो लॅमिनेशन व्यवसाय केलाय. 30 वर्षापासून पत्रकारितेत आहे. त्यात प्लेट मेकिंग,ऑफसेट मशिन चालविणे, पेस्टिंग, संपादकीय, व्यंगचित्रकार सर्व विभागाची कामे शिकलो. अजूनही जगात शिकण्यासारखं बरंच काही आहे. वेळ मिळाला तेव्‍हा  शिकतोच.  जळगांवला 1988 ते 1997 पर्यंत पत्रकारिता केली. 1994 ला जळगावला नगरपालिका निवडणूक हरलो. 1996 ला स्टुडीओ टाकला. अखेर सतत भाड्याची घरे बदलविण्याचा कंटाळा आल्याने जळगाव सोडले.  धुळ्याला स्थायिक झालो. 1998 पासून प्रेस फोटोग्राफर म्हणून लोकमतला लागलो. माझे व्यंगनगरी नावाचे दैनिक सुरु केले. छायाचित्रकार म्‍हणून असो की व्‍यंगचित्रकार-संपादक म्‍हणून राजेंद्र सोनार यांनी आपला अव्वल दर्जा आजही कायम राखून ठेवला आहे.
            सोनार यांना नामवंत व्‍यक्‍तींची चित्रे काढून त्‍यावर स्‍वाक्षरी घेण्‍याचा छंद होता. ज्ञानपीठ पुरस्‍कार  विजेत्या महादेवी वर्मा, श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव, नितीन गडकरी, शरद पवार, ना.धों.  महानोर, मंगेश पाडगांवकर, रणजीत देसाई, शंकरराव खरात, एकनाथ सोलकर, दिलीप वेंगसरकर, राज कपूर, दिलीपकुमार, कल्याणजी-आनंदजी, बाबला, अनुप जलोटा, जयश्री टी., महेंद्र कपूर, नितीन  मुकेश, पेंटल, श्रीराम लागू, यशवंत दत्त, रोहिणी हट्टंगडी, तनुजा, जया बच्चन, दादा कोंडके, रमेश देव, सचिन पिळगांवकर, आर. के. लक्ष्‍मण अशा अनेक दिग्‍गजांची त्‍यांनी स्‍वाक्षरी घेतली आहे. त्‍याबाबत सोनार  म्‍हणतात, 1980 मध्ये निळूभाऊ फुले राजकारण गेलं चुलीत या नाटकासाठी रावेर (जळगाव) येथे आले होते. मी त्यांचे चित्र घेऊन भेटायला गेलो. त्यांना भेटण्यासाठी तुफान गर्दी होती. सर्व को-या कागदावर त्यांची सही  घेत होते. कुणीतरी मी काढलेले चित्र पहिले आणि मला थेट त्यांच्यासमोर घेऊन गेले. त्यांनी चित्र पहिले. त्यावर सही केली. माझ्याशी बोलले. तेव्‍हा मला कलेला मिळणारा मान समजला. त्या दिवसापासून कुणीही मोठी व्यक्ती आली की  मी त्यांचे चित्र काढायचो, त्यांची स्वाक्षरी घ्यायचो.  त्यांच्यासोबत फोटो काढायचो.
  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍याबद्दलची आठवण सांगतांना सोनार म्‍हणाले, बाळासाहेब जळगावी आले असता एक लाख लोक सभेला होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र त्यांना गर्दीतून दाखविले.  त्यांनी पोलिसांना पाठवून मला स्टेजवर बोलाविले. काय करतोस,  मी म्हणालो, व्यंगचित्रकार  आहे. खूप मोठा हो असा आशीर्वाद दिला. बाळासाहेबांना कलावंतांविषयी असलेली कदर मला अनुभवाला आली.  
जयंत नारळीकर यांचे  चित्र काढले होते. ते एम. जे. कॉलेजला आले होते.  प्राचार्य डी. एस. नेमाडे  यांच्यासमोर त्यांना दाखविले. त्यांनी पहिले, मी चित्रावर स्वाक्षरी मागितली त्यांनी नकार दिला. म्हणाले मी कुणालाही सही देत नाही.  मी ते चित्र त्‍यांच्‍यासमोर फाडले आणि सांगितले, सही नसेल तर या चित्राला काही अर्थ नाही. दुसरी एक घटना आहे. आत्माराम भेंडे यांची.  मी त्यांच्या चित्रावर सही मागितली.  ते म्हणाले,  तू काढले आहे एवढे सुंदर चित्र?  माझा विश्वास नाही, चल मला  वेळ आहे, आत्ता माझे चित्र काढ. मी 15 मिनिटात बॉलपेनने त्यांचे चित्र काढले.  त्यांनी पहिले. त्यावर लिहिले ‘15 मिनिटात काढलेले हे चित्र सुंदर वठले आहे’. मी त्यांना म्हणालो, आधी तुमचा विश्वास का नव्हता. ते म्हणाले,  अरे वेळ जात नव्हता म्हणून तुझी परीक्षा घेतली. मी सर्वात जास्त निळूभाऊंची( फुले) चित्रे काढून सही घेतली आहे.  त्यांनी पुण्याला घरी येण्याचे आमंत्रणही दिले  होते. आता दोनच मोठी माणसे राहिली आहेत एक अमिताभ बच्चन (त्‍यांची 16 पत्रे मला आलेली आहेत स्वाक्षरीसह पण चित्रावर सही नाही) आणि दुसरे प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी.
राजेंद्र सोनार यांचे आईवर खूपच प्रेम आहे. आईविषयी ते सांगतात, 3 नोव्हेंबर 2000 ला माझी आई आनंदीबाई ही स्वर्गवासी झाली. आज 18 वर्ष झाली आईला जाऊन,  पण आई गेली असं कधीच जाणवलं  नाही. कारण संगणक स्क्रीनवर आईचाच फोटो आहे. घरात भिंतीवर आईचा फोटो आहे आणि मनात देखील. पुढील आयुष्यात आईच्या नावाने आनंदी कलादालन निर्माण करायचे स्‍वप्‍न ते मनाशी बाळगून आहेत.
            निवासी पत्‍ता- 79, फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी जवळ, देवपूर- धुळे
                                      मोबाईल- 9422288574


Post a Comment

 
Top