Add

Add

0
शेखर कल्याणकर यांनी आपल्यातील अष्टपैलु कलाकार ठेवला जागता
           शिक्षकी पेशा सांभाळत देहदान करून जपली सामाजिकता 

निकेत पावसकर : तळेरे,
1993-94साली कासार्डे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज इथे नेमणूक झाल्यापासून जवळजवळ 25 वर्षे अखंड अविरत सेवा बजावताना एक शिस्तप्रिय शिक्षक व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आपला ठसा उमटवताना वेळोवेळी एक अष्टपैलू कलावंत म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.आणि त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात वावरत असतानाच सामाजिक क्षेत्रातही स्वत:च वेगळेपण त्यांनी सिद्ध केल. शिवाय एक परखड विचारांचा सडेतोड माणूस म्हणून कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शेखर कल्याणकर परिचित आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांचे मित्र कमी आणि शत्रू जास्त असावेत. पण त्याची त्यांना फिकीर नाही. 
ते म्हणतात शंभर खोटारडे मतलबी नालायक मित्र असण्यापेक्षा शंभर वर्षे टिकणारा एकच सच्चा मित्र मला पुरे. चांगल्या गोष्टीचे कौतुक करायला जसा हा माणूस थकत नाही तसाच न पटणा-या गोष्टीवर कुणाचाही कसलाही मुलाहिजा न ठेवता कान उपटायला बिचकत नाही. देवळात बसणारा, लाडू-मोदक खाणारा सतरा हात असूनही कुणाच रक्षण न करणारा आणि भलं न करणारा देव ते मानत नाहीत. सणासुदीला चतुर्थी असो कि दिवाळी घरातले मोदक, लाडू फराळ कपडे असे बरेच काही आधी रस्त्यावरच्या भिकार्याला नेऊन देणारा हा माणूस फक्त माणुसकी हा एकच धर्म मानतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाची हि दुसरी बाजू. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातला वेगळेपणा सातत्याने जाणवतो आणि प्रत्येकातील माणुसकी जागी करतो.  
लहानपनापासूनच कलेचं बाळकडू अंगात मुरलेल. त्यांचा जन्म कोल्हापूरचा. तिथेच त्यांचे बालपण गेलं आणि कोल्हापुरातच त्यांच्या कलेचं शिक्षण झाले. मधला काहीकाळ माध्यमिक शिक्षण व त्यापुढील शिक्षण कोकणात झाले. त्यामुळे दोन्हीकडचे कलासंस्कार त्यांच्यात रुजले. याचा त्यांना अभिमान आहे. म्हणूनच ते कोल्हापूर म्हणजे प्राण आणि कोकण हा श्वास असल्याचे मानतात.       
कलामहर्षी बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर हे त्यांचे प्रेरणास्त्रोत. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचे चिरंजीव श्री रवींद्र मेस्त्री व अरविंद मेस्त्री यांचे ते शिष्य. कलानिकेतनमध्ये शिकताना त्यांचा कला सहवास लाभला. कला तपस्वी चित्रकार अभिनेते बंधू सुर्यकांत मांडरे व चंद्रकांत मांडरे हे हि त्यांचे आदर्श होत. या सर्वांच्या बरोबरच माळी सर, मगदूम सर, हर्डीकर सर, भोसले मॅडम या कला क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यामुळेच त्यांच्यातील कलाकाराला वेगवेगळे पैलू पडत गेले. त्यातून एक अष्टपैलू कलाकार निर्माण झाला. नृत्य सोडले तर कलेच्या वेगवेगळ्या प्रातांत त्यांचा मुक्त वावर असतो.एक चित्रकार,शिल्पकार,गायक, वादक, कवी, गझलकार, निवेदक, कथाकार,वास्तू रचनाकार, नाट्य लेखक, अभिनेता, वास्तूशास्त्र अभ्यासक, इंटेरियर डिझायर असे वेगवेगळे पैलू असणारा हा अष्टपैलू कलावंत प्रसिद्धीपासून मात्र जाणून बुजून दूर राहिला. इतके सर्व असूनही अजिबात गर्व नसणारा हा विनयशील कलावंत सर्वांसमोर यावा यासाठीच हा लेखनप्रपंच.
प्रथम त्यांच्यातला कलावंत ओळखला तो शेठ म. ग. हायस्कूलच्या ना. वा. रानडे या कलाशिक्षकाने. तेव्हा ते माध्यमिक शिक्षण त्या प्रशालेत घेत होते. रानडे सरांनी त्यांच्यातल्या चित्रकाराला, गायकाला, कवीला जागे केले. प्रोत्साहन दिले. मार्गदर्शन केले. तेव्हापासून हा प्रवास सुरु झाला तो आजवर तसाच सुरु आहे. पण शिक्षकी पेशात त्यांना आणले ते जामसंडे हायस्कूलचे पहिले कलाशिक्षक कै. श्री. गंगाधर गोंधळी यांनी. गंगाधर गोंधळी शिक्षक होते पण त्याहीपेक्षा ते जास्त माझे मित्र होते. वयाचा थोडाफार फरक सोडला तर या शिक्षक मित्राने ३० वर्षांपूर्वी जी वाट दाखवली त्या वाटेवर आणताना धरलेलं बोट सोडून तो तो अचानक निघून गेला खरा पण आजही त्याच्या हातात माझे बोट अजूनही तसच आहे. हि जाणीव सारखी होत राहते. यातच खरा मित्र म्हणजे काय? मैत्री कशी असावी? हे तनामनात भिनल. रानडे सरांचे आणि गंगाधरचे हे ऋण या जन्मात फिटने शक्य नाही. ते तसेच डोक्यावर ठेवणच योग्य वाटत असे ते म्हणतात. 
कलाक्षेत्रात वावरताना त्यांना आजवर अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले खरे पण त्याहीपेक्षा जास्त रवींद्र मेस्त्री, अरविंद मेस्त्री, सुर्यकांत मांडरे, प्रसिद्ध साहित्यिक श. नां. नवरे, रानडे सर, कै. गंगाधर गोंधळी, बी. कांबळे, टि. के. वडणगेकर वगैरे थोरा मोठ्यांचा लाभलेला कला सहवास, त्यांचे मार्गदर्शन, त्यांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन, त्यांची कौतुकाची पाठीवरची थाप ते सोनेरी क्षण त्यांना इतर कोणत्याही सन्मानापेक्षा मोठे वाटतात. 
गेली 25 वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असताना चित्रकला, नाट्य, गायन स्पर्धा किंवा शासकीय रेखाकला परीक्षा असोत यामध्ये मुलांचा उदंड प्रतिसाद आणि चित्रकलेत उज्वल यश मिळाले. याचे श्रेय ते आजवरच्या प्रशालेच्या मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि संस्था चालकांना देतात. त्यांच्या पाठीशी उभं राहण्यामुळे, प्रोत्साहनामुळे हे सर्व शक्य झाले असे ते मानतात. 
एक यशस्वी कलाशिक्षक म्हणून वाटचाल करताना त्यांच्यातला कवी, गझलकार, कथा लेखक, नाट्य लेखक, दिग्दर्शक ह्या कलाही फुलत गेल्या. अधिकाधिक परिपक्व होत गेल्या. अगदी चारोळी पासून गझलपर्यंत काव्याच्या प्रत्येक प्रातांत त्यांची मुक्त मुशाफिरी अजूनही सुरूच आहे. 
तू म्हणजे प्राजक्ताचं फुल 
हि तुझी स्तुती नव्हे उक्ती आहे,
तू असताना प्राजक्तानं फुलनं 
अतिशयोक्ती नव्हे मस्ती आहे.
या चारोळीतून जसं मन पाखरू अलगद भिरभिरत. तसच 
तडकल्या भिंतीवर छत फाटके
तरी उभे मकान आहे
घरट्यात माझ्या चिऊ-काऊने 
मांडले दुकान आहे 
हि गझल मनाच्या गाभार्याला खरडवून काढते. आणि 
तुझ्यासह जगता जगता...
तुझ्याविना जगाया लागलो...
जीवनाचे घोट विषारी 
अमृतापरी प्याया लागलो...
अशी गझल जिव्हारी लागून जाते. कवितेवरच्या या अस्सल प्रेमाची दखल प्रसिद्ध साहित्यिक कै. श. नां. नवरे यांनी घेतली आणि पाठीवर कौतुकाचा हात फिरवला. यापेक्षा आणखी मोठं बक्षीस काय असाव? असे सोनेरी क्षण त्यांनी आजही जपून ठेवलेत. प्रशालेत नेहमीच विविध उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यावेळी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागतगीत हि त्यांनी स्वत:च लिहून ते संगीतबध्द केलय. 
वाहतो सुरांची सरगम तुम्हाला,
शुभाशिष तुमचे...
लाभो आम्हाला 
या स्वागत गीताचे कवी ते आहेत. हे त्यांच्या प्रशालेतही फारसे कोणाला माहित नाही. असा हा सर्वांसमोर असून सर्वात मागे राहणारा माणूस. एकदा प्रसिद्ध भावगीत गायक कै. अरुण दाते यांच्या समोर त्यांचच 
‘हिरव्या हिरव्या गवतावरती चंद असावा निथळत
चांदण्यात त्या तुझे नि माझे प्रेम असावे उजळत उजळत’
हे गीत म्हणण्याची संधी मिळाली. मध्यतरांत जेव्हा अरुण दाते आत विंगेत आले आणि पाठीवर हात ठेवत ‘छान म्हटलस तू’ म्हणाले. एन उमेदीत एखाद्या मोठ्या माणसाकडून कौतुकाचे हे दोन शब्द पूर्ण आयुष्यभर पुरेल अशी उमेदीची शिदोरी देऊन गेले. आजही गाताना ते शब्द कानात घुमतात. आणि एक आत्मविश्वास येतो, यापेक्षा आणखी काय हवे? 
कोल्हापुरात पंडित हृदयनाथ मंगेशकर, जगदीश खेबुडकर, जगजीत सिंग, अरुण दाते, सुरेश वाडकर, लता मंगेशकर, आशा भोसले या महान कलावंतांना लाईव्ह एकता आले, बघता आले. त्यांच्याशी बोलता आले. कारण तानसेन होण शक्य नाही पण कानसेन होण शक्य होत. त्या काळात हे असे ऐकायला, पाहायला मिळाले. त्यातून खूप शिकायला मिळाले, हे महत्वाचे वाटते. आयुष्याची सुरुवात एक छोटासा कलावंत म्हणून अशी झाली याचे समाधान वाटते. 
त्यावेळी ऑर्केंस्ट्राचा जमाना होता. ऑर्केंस्ट्रा झंकार, स्वरबहार, सप्तसुरांच्या झुल्यावर, अशी काही मराठी वाद्यवृन्दातून गायक, वादक, निवेदक म्हणून वावरता आले. शिकता आले. डग्गा तबला, ढोलकी-ढोलक, कोंगो-बोंगो, ट्रीबलसारखी तालवाद्य ते वाजवतात. हे सर्व कोणाकडे शिकलात असे विचारल्यावर ते म्हणाले कि, यात कोणताही माझा गुरु नाही. रेडीओ, टेपरेकॉर्डरवर जसं गाणं वाजत तस एकून एकून आधी टेबल वाजवली. मग डबे, कॅन वाजवले आणि मग तबला डग्गा अशी सुरुवात झाली. आता सर्व प्रकारची चर्मवाद्य मी वाजवतो. मग ते गाण फिल्मी असो नाहीतर शास्त्रीय झपताल, दादरा, केहरवा, एकताल, त्रिताल, रूपक पासून सर्व, हे जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष वाजवून दाखवले आणि काही प्रत्यक्ष संगीतसाथीचे त्यांचे व्हिडीओ पहिले त्यावेळी यावर विश्वास बसला. 
कविता, गीत, संगीत यावर प्रेम जडण्याचे आणखी एक कारण म्हणजे प्रसिद्ध गीतकार, कवी जगदीश खेबुडकर. कोल्हापुरात एका महोत्सवात त्यांचा कार्यक्रम होता. त्यांचा मितभाषी स्वभाव, ओघवते शब्द आणि समोरच्याशी सुसंवाद साधण्याची कला मनावर गारुड घालून गेली. कार्यक्रमानंतर खेबुडकर यांना भेटलो. काही कविता त्यांना दाखवल्या, मार्गदर्शन करा म्हणालो, ‘तुझा प्रयत्न प्रामाणिक आहे. ताला सुरांची जोड मिळाली कि कवितेच गाण बनत. पण कविता तेव्हाच जन्माला येते जेव्हा काळजाला कळ लागते. हि ठेच पोचली ना कि आपलच प्रतिबिंब शब्द रूपाने कागदावर उतरते. ओढून ताणून काही कराव लागत नाही. तू फक्त शब्दांशी प्रामाणिक राहा. बस्स.’ हे त्यांचे शब्द त्याक्षणी अंतरात कुठेतरी कोरले गेले ते कायमचेच. वयाच्या ऐन विशी पंचविशीत असं काहीतरी ऐकायला, पहायला मिळाल, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. 
याच प्रेरणेने कथा, कविता, एकांकिका, नाट्यछटा लिहित गेलो. आज मराठा मोर्चाचे वातावरण तापत आहे. त्या मराठा बांधवांना प्रोत्साहन मिळाव म्हणूनं त्यांनी उत्तम काव्यरचना केली. प्रेरणा शब्द वापरण्याइतपत मी मोठा नाही अशी कबुली ते देतात. आणि मुख्य म्हणजे आज अस वर्तमान पत्रातून प्रकाशित होणारी हि त्यांची पहिलीच काव्यरचना...
ना किड्या मुंग्यासारखे जगायचे आहे 
ना कुत्र्या मांजरासारखे मरायचे आहे 
अरे मराठा आहे मी मराठा...
जाता जाता सर्वांना पुरून उरायचे आहे
अशा अनेक कविता, चारोळ्या, गझल्सची हस्तलिखिते त्यांच्याकडे पाहायला मिळतात. वस्त्रहरण र्हवला बाजूक, होम मिनिस्टर गेले खय?, डुकराचा मटाण, रात्रीस खुळ चाले, पोरा जोमात मास्तर कोमात, माझ्या नव-याची चुलत बायको अशी अनेक विनोदी नाट्यछटा हसून हसून पोट दुखवणा-या आहेत. तशाच काहि कथा समाजातील भीषण वास्तवाचे चटके देणार्याही आहेत. तर वारी सारखे नाट्क आणि माय, अनिकेत अशा अनेक कथा चलबिचल करणाऱ्या आहेत. 
त्यांचा आणखी एक पैलू म्हणजे अभिनय. कलाप्रेमी, कलादर्पण, नाट्यगंध, रंगभूमी प्रतिष्ठान, अक्षरसिंधू सारख्या नाट्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विविध एकांकिंका स्पर्धा, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा मधून अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तसेच काही चित्रपटामधूनहि अभिनय केला आहे. परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांनी प्रत्यक्ष कामत महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच मालवणी गाव गाता गजाली या मालिकेतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 
त्यांचा आणखी एक आवडता विषय म्हणजे वास्तुशास्त्र व वास्तुरचना. परंतु पुस्तकी वास्तुशास्त्रापेक्षा प्रत्यक्ष जागा पाहून उन्हाची बाजू, वा-याची दिशा या बाबी पाहून वस्तूची रचना कशी केली पाहिजे, याबाबत ते मार्गदर्शन करतात. तर तयार वास्तूत प्रसन्न वाटावे, समाधान व्हावे यासाठी अशा वास्तूत आवश्यक बदल ते सुचवतात. याबाबत अनेकजण त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाल्याचे सांगतात. अशा लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहिला, आनंद दिसला कि बरं वाटते, असे आवर्जून सांगतात. याशिवाय, जुदो कराटे या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात त्यांनी ब्राऊन बेल्ट पर्यंत धडक मारली आहे यावर विश्वासच बसत नाही. परंतु त्यांच्याकडे असलेली सर्टिफिकेट आणि फोटो पाहिले तेव्हा याची खात्री पटली.
कल्याणकर सर अष्टपैलू कलावंत तर आहेतच परंतु माणूस म्हणूनही त्यांनी आपली काही तत्वे जपली आहेत. तर सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी मरणोत्तर नेत्रदान तसेच त्वचा व देहदानाचा संकल्प केला आहे. तसेच अनाथ आश्रमातील एक मुल दत्तक घेऊन त्याचे पालकत्व स्वीकारले आहे. 
संपर्क :-
श्री. शेखर कल्याणकर, सहाय्यक शिक्षक 
कासार्डे माध्य. विद्यालय, कासार्डे 
9921962220

लेखन - निकेत पावसकर, तळेरे (सिंधुदुर्ग) 9860927199 / 9403120156

Post a Comment

 
Top