Add

Add

0
राम निर्विवाद असून हिंदूंच्या चौकटीत बंदिस्त नाही
डॉ.श्रीपाल सबनीस यांचे मत  - रामेश्‍वर (रूई) येथे प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळा संपन्न
 
पुणे(प्रतिनिधी ):-संपूर्ण जगात वाद चालू आहे. परंतू रामेश्‍वर (रूई) येथील राम हा निर्विवाद असून तो हिंदूंच्या चौकटीत बंदिस्त नाही. येथे सर्वधर्माचा अर्क म्हणजेच वारकरी हा दिसतो. कारण वारकर्‍याच्या खांद्यांवर तिरंगा दिसतो. त्यातूनच राष्ट्रीयत्वाची बेरीज दिसून येते. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे  व रामेश्‍वर (रूई) ग्रामस्थांच्या वतीने मानवतातीर्थ म्हणून साकार झालेल्या रामेश्‍वर (रूई) येथे प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळा व श्रीराम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण हे होते.
     विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड,सौ. उषा विश्‍वनाथ कराड, सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड, श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड,  एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड,  कमाल राजेखाँ पटेल, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, प्रा. सुनीता मंगेश कराड, डॉ. हनुमंत तु. कराड आदी उपस्थित होते.
     डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, रामनवमीच्या निमित्त निघालेल्या रथयात्रेत  प्रथमच रामनामाच्या जयजयकारा बरोबर बुध्दम् शरणम् गच्छामि हे वाक्य ऐकले. या गावात सर्वधर्मएकतेचे प्रतीक दिसून आले.  मुस्लिम धर्मात मूर्तिपूजा नसतांनाही रथयात्रेच्या वेळी मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी रामाच्या मूर्तिला हार घातला. त्यावेळेस राम-रहिमच्या जयजयकारांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला गेला. येथील गोपाळबुवा हे देवत्वाला पोहचलेले होते. त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या मंदिरातून  सात्विकता आणि देवत्वाने प्रत्येक व्यक्तीमध्ये यावे अशा पवित्र ठिकाणी येऊन मन प्रसन्न झाले. दोन धर्माच्यामधील अंतर कमी करण्यासाठी राम-रहिम सेतू बांधण्यात आलेला आहे. या सेतू मध्ये सर्व धर्मांचे सूत्र मांडण्यात आलेले आहे आणि या धर्माचा अर्क म्हणजे वारकरी आहे.  
डॉ. कराड हे सर्वांना पेलून नेणारे विश्‍वनाथ आहेत. ते सामान्य माणसांसाठी हरिभक्त, मौलवी, भन्ते असे सर्वधर्मसमावेशक आहेत.  त्यांनी या गावात प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी  केलेले कार्य हे भौतिकवादी आहे. तसेच येथे ज्ञानगंगे बरोबरच पैलवानांसाठी आखाडा निर्माण केला आहे. त्यांनी केवळ भक्ती केली नाही तर शिक्षणांची गंगा दारोदारी पोहचविली आहे. रामेश्‍वर या गावात सर्व धर्मांची प्रतीके साकारलेली असल्याने भविष्यात या गावाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, मानवता आणि विश्‍वबंधुत्व व शांतीचा संदेश जगाला दिला जाईल.
     डॉ.एस.एन. पठाण म्हणाले, धर्माच्या नावाने जगामध्ये जो वणवा पेटला आहे. तो थांबविण्याचे कार्य बर्‍याच ठिकाणी सुरू आहे. परंतू या देशामध्ये रामेश्‍वर रूई हे गाव असे आहे, जे सर्वांसाठी आदर्श ठरू शकते. येथे सर्वधर्मसमभाव दिसून येतो. भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे दर्शनही येथे दिसून येते. येथे मानवतातीर्थ उभारले आहे. त्यामुळे येणारा काळ हे संपूर्ण विश्‍वाला त्याचा संदेश देईल. भारतीय संस्कृती ही रूपात आहे. ती प्रतीकामध्ये परिवर्तित झाल्यामुळे समाजावर संस्कार घडविण्याचे कार्य करीत आहे. श्रध्दा व सहिष्णुता निर्माण करण्याचे कार्य हे भारतीय संस्कृतीमुळे घडते आहे. 
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तिमंत प्रतीक प्रभू श्रीराम हे आहेत.राजा कसा असावा,बंधू कसा असावा व सखा कसा असावा याचे प्रतीक श्रीराम आहेत. त्यांच्या गुणांचा आदर्श आम्हाला घ्यावयाचा आहे. अयोध्येतील राम हा आज रामेश्‍वमध्ये अवतरला आहे असा भास होत आहे. म्हणून रामाशी एकरूप होणे गरजेचे आहे. श्रीरामच्या जीवनाची तत्त्वे आपल्या जीवनात उतरविली पाहिजेत .21व्या शतकात भारत विश्‍वगुरू म्हणून उदयास येईल. त्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे.
ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर (बनकरंजा, ता. केज) यांनी काल्याच्या  कीर्तनात सांगितले की, प्रभू श्रीराम हे सर्वगुणसंपन्न होते.त्यांनी संपूर्ण समाजाला एक आदर्श दिला आहे.त्यांच्यातील कोणत्यातरी एका सद्गुणाला आत्मसात करून आचरणात आणावे.ज्ञान मार्ग व भक्ती मार्गावर चालून समा जातील वाढत जाणार्‍या व्यसनाधीनतेला आळा घालावा. हाच संदेश श्रीराम जन्म सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांनी स्वीकारावा.  
     भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक, तसेच, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेली भारतीय संस्कृती दर्शन - ‘श्रीराम’ रथयात्रा श्रीराम मंदिरापासून सुरू झाली. ही  रथयात्रा गौतम बुद्ध विहार येथे पोहचल्यानंतर बौद्ध बांधवांनी स्वागत केले. तसेच, जामा मस्जिद व जैनुद्दीन चिश्ती दर्ग्याजवळ मुस्लिम बांधवांनीही  तिचे स्वागत केले.
     संत गोपाळबुवा मंदिर येथून निघालेल्या रथयात्रेने ग्रामप्रदक्षिणा करून राम मंदिर येथे समारोप झाला. रामेश्‍वरच्या रथयात्रेसाठी पंचक्रोशीतील महिला व पुरूष भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. तसेच, मिरवणूकीच्या दरम्यान शालेय विद्यार्थिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी प्रास्ताविक केले.
     
  

Post a Comment

 
Top