Add

Add

0
          संगीत कलाविष्कारातून पांडुरंगाची ‘अनुभूती’ 
              कवयित्री सौ.उर्मिला विश्‍वनाथ कराड यांच्या ‘अनुभूती’ कविता संग्रहाचे गायन व वाचन... 

 पुणे(प्रतिनिधी ):- संसाराच्या रणसंग्रामी विचलित मन स्थिर झाले, रूप सावळे श्यामलवर्णी विटेवरी ठाकले... या कवितेला गाण्यात स्वरबध्द करून संपूर्ण सभागृहाला विठ्ठलाची अनुभूती दिली. निमित्त होते कवी कुसुमाग्रज मंच यांच्या सौजन्याने ‘अनुभूती’ संगीत कलाविष्कार या कार्यक्रमाचे.
कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये कवयित्री सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अनुभूती’ या कार्यक्रमात त्यांच्या जवळपास दहा कवितांना संगीतबध्द चालीत गुंफून त्याचे सादरीकरण संगीतकार व गायक पं. रवींद्र यादव व गायिका अमृता यादव यांनी केले. 
यावेळी सुप्रसिध्द मराठी लेखिका डॉ. माधवी वैद्य, जगविख्यात संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर, कवी कुसुमाग्रज मंचाचे विजय जोग आणि श्री. नाईकडे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस. एन. पठाण आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ यांनी दीप प्रज्वलन केले. 
या कार्यक्रमात कवयित्री सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड यांनी डोळे, हुंदका, मायबोली, सृजन, संगणक यासारख्या अनेक कवितांचे वाचन केले. या कवितांच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक, पर्यावरण, संगणकीय क्षेत्र व कुटुंबाची स्थिती मांडली.
गायक पं. रवींद्र यांनी आपल्या सुरेल आवाजात परब्रह्म ते विटेवरती अठ्ठावीस युगे ठाकले.. हे गीत सादर करून रसिकांना जणू पंढरपूरची वारी घडविली. त्यानंतर गाडी चालली टेचात, पाहटंच्या चांदण्यात..., विश्‍वाची जननी आदिमाया माउली आणि श्री गरूडस्तंभाचा सोहळा भेदिला गगनमंडळा... या कवितांना स्वरबध्द केले. 
यावेळी कवयित्री सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड म्हणाल्या, आज मी माझ्या आयुष्याची 76 वर्षे पूर्ण केली, हे भाग्याचे आहे. जीवनात आलेला सर्व अनुभव अनुभूती कविता संग्रहात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात आध्यात्मिक वाटचाल, वारकरी संप्रदायातील अनुभव आणि जीवनातील विविध प्रसंग आहेत. रसिकांच्या प्रेमातूनच या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली आहे.सत्य सुंदर विश्‍व माझ्या दृष्टीला पडले, त्यातूनच माझी कविता जन्माला आली. या कविता म्हणजे सुख, शांती, समाधान व आत्मिक आनंदाचा ठेवा आहे.
गायक पं. रवींद्र यादव व अमृता यादव यांना ज्ञानेश्‍वर सणस (तबला), प्रकाश सुतार (सिंथ.) व गुरूनाथ कदरेकर( तालवाद्य) यांनी साथ दिली. 
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, प्रा. सुनिता मंगेश कराड व शेकडो रसिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे निवेदन मनोजकुमार देशपांडे यांनी केले.
प्रा.डॉ.मिलिंद पांडे यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले. प्रा.ज्योती कराड-ढाकणे यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top