Add

Add

0
   शेतकऱ्यांनो आत्‍महत्‍या करणे उपाय नाहीःचर्चेने प्रश्न सोडवू...

ज्‍येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे मतः एमआयटीतर्फे तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी....
डॉ. मुळीक व डॉ. कांबळे तथागत गौतम बुध्द पंचशील विश्वशांती पुरस्‍काराने सन्‍मानीत....


पुणे(प्रतिनिधी ):-‘‘शेतीला पाणी व वीज देणे ही शासनाची कायदेशीर जबाबदारी आहे.  उत्‍पादनावर आधारीत बाजार भावाचा कायदा करणे, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देणे हे कायदेशीर आहे. सध्या शेतकरी प्रतिकुल परिस्‍थितून वाटचाल करीत असल्‍याने आत्‍महत्‍या करीत आहेत. आत्‍महत्‍या करने हा त्‍यावरील उपाय नसून शासन व शेतकऱ्यांने मिळून प्रश्न सोडवावेत. असे मत ज्‍येष्ठ कृषी तज्ञ  डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्‍यक्‍त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे मानवतातीर्थ रामेश्वर (रुई), येथे उभारण्यात आलेल्‍या ‘तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वशांती स्मृतिभवन’ येथे‘तथागत गौतम बुद्ध जयंती’साजरी करण्यात आली. त्‍यावेळी डॉ. बुधाजीराव मुळीक बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (DICCI)चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांना विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्‍या हस्‍ते ‘तथागत गौतम बुध्द पंचशील विश्वशांती पुरस्‍कारा’ने सन्‍मानित करण्यात आले.  सन्‍मानपत्र, स्‍मृतीचिन्‍ह आणि घोंगडी हे  पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.
या प्रसंगी माजी खासदार गोपाळराव पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, थोर साहित्यिक व लेखक प्रा.रतनलाल सोनग्रा,ज्येष्ठ दलित नेते मोहनराव माने व लातूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती संजय दोरवे  हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.  
यावेळी सौ. सीमा मिंलिंद कांबळे,शेतीनिष्ठ कर्मयोगी, ह.भ.प.तुळशीराम दा.कराड, प्रगतीशील शेतकरी काशी राम दा.कराड,विनायक पाटील,एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, सरपंच सौ. सुधामती  नारायण कराड आणि उपसरपंच कमाल राजेखाँ पटेल हे उपस्‍थित होते.
डॉ. बुधाजीराव मुळीक म्‍हणाले,‘‘शेतकऱ्यांच्‍या आधारावर सर्वांचे चांगले चालते पण शेतकऱ्यांचे वाईट होते. त्‍यामुळे बुध्द पोर्णिमेच्‍या निमित्‍त शासनाने शेतकऱ्यांसाठी चांगला कायदा करावा अशी मागणीही त्‍यांनी केले. तसेच भगवान गौतम बुध्दांनी जीवनातील पाच तत्‍वे सांगितले,ते म्‍हणजे चोरी करणार नाही, व्‍याभिचार करणार नाही, असत्‍य बोलणार नाही, मद्य पान करणार नाही आणि प्राणी हिंसा करणार नाही. याचे पालन सर्वांनी केल्‍यास समाजात विश्वशांती निर्माण होईल.
शासनावर अवलंबून राहू  नका. जे काही दयावयाचे आहे ते कायद्याने दया. जगात शांती पाहिजे असेल तर पोटात दाना हवा, त्‍यासाठी काम दया. 
जगात सर्वांना माहिती आहे की शेती फायदेशीर नाही.शेतकऱ्यांचे उत्‍पन्नाचे नुकसान झाले त्‍याची भर काय द्याने दयावी.शेतकऱ्यापेक्षा शेतमजूर व माथाडी कामगार सुखी आहेत. शेतकऱ्याचा माल कोणी घ्यावा तसा कायदा करने गरजेचे आहे.’’
डॉ. मिलिंद कांबळे म्‍हणाले,‘‘डायलॉग, डिबेट आणि डिक्‍सशन  या त्रिसूत्रीच्‍या आधारे डिक्‍की कार्य करीत आहे. देशाच्‍या आर्थिक क्षेत्रात आम्‍ही भागीदार बनून नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे युवक बनविणे हे आमचे  लक्ष आहे. त्‍याच माध्यमातून भारताला सुदृढ करावयाचे आहे. गरीब, दरिद्र व दुर्बल व्‍यक्‍तीवरच अन्‍याय व अत्‍याचार होत होतात, याचे  कारण त्‍यांच्‍याकडे द्रव्‍य नाही. त्‍यामुळे आम्‍ही आर्थिक लोकशाही प्रस्‍थापित व्‍हावे हा धागा धरून सामाजिक आणि वित्तिय समावेशन होण्याचे कार्य करण्यासाठी डिक्‍कीची स्‍थापना झाली. याच्‍या माध्यमातून आज 2 हजार उद्योजकांना वेंडर व सप्‍लायर म्‍हणून जोडले. डिक्‍कीच्‍या माध्यमातून आम्‍ही युवकांना वेगळा मार्ग दाखविला. आत्‍मविश्वास व कामाच्‍या प्रति निष्ठा असेल तर आर्थिक विकास होईल. तुच तुझ्या जीवनाचा शिल्‍पकार हो हे सूत्र युवकांनी सैदव लक्षात ठेवावे. 
रामेश्वर येथील राममंदिरात बुध्दम शरणम गच्‍छामीची धुन ऐकणे ही इतिहासातील मोठी घटना आहे. डॉ. आंबेडकर यांनी नासिकमध्ये काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी केलेल्‍या आंदोलनाची आठवण झाली. या ठिकाणीतील राम मंदिरातील घटनाने स्‍पष्ट जाणवले की येथील लोकांनी दलितांना स्‍विकारले . या जिल्‍ह्यातील इतिहासात ही घटना लिहिली जाईल.’’
प्रा.डॉ. विनश्वनाथ दा. कराड म्‍हणाले, ‘‘छोट्या गावात दोन मोठ्या लोकांचा सत्‍कार  होणे अभिमानस्‍पद आहे. ही भूमि साधू संतांची आहे. संपूर्ण जगात भगवान गौतम बुध्द आणि महात्‍मा गांधी यांची शांतीदूत म्‍हणून ओळख आहे. वसुधैव कुटुम्‍बकम ही संकल्‍पना भारताने दिली आहे जी संपूर्ण विश्वाची धारणा आहे. 1897साली स्‍वामी विवेकानंद यांनी सांगितले की 21वे शतक भारत मातेचे असेल. या शतकात संपूर्ण जगाला सुख, शांती, समाधान आणि ज्ञानाचा मार्ग भारत दाखविले. परंतू या देशाला जो जाती पातीचा शाप लागला आहे, त्‍यासाठी भगवान गौतम बुध्दांचा संदेश आचरणात आणावा.’’
प्रा.डॉ. रतनलाल सोनग्रा म्‍हणाले,‘‘भगवान बुध्द हे शेतकरी होते त्‍यांनी मना मनाची मशागत केली. प्रत्‍येक मानवाच्‍या मनामध्ये विविध विचारांची स्‍पर्धा निर्माण होत असते. अशावेळेस बुध्दाच्‍या चरणी सर्व अर्पण करने हेच खरे ज्ञान आहे.  येथे भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या नावाने जे  स्‍मृती भवन निर्माण केले आहे. ते जगातील आश्चर्य आहे. हे स्‍मृतीभवन पहायला लाखों पर्यटक येतील तेव्‍हाच खऱ्या दृष्टीने हे मानवतीर्थ म्‍हणून उदयास येईल.’’सुरुवातीला गोविंद जाधव व शेषराव कांबळे बुध्द वंदना सादर केली.डॉ. एस.एन.पठाण यांनी प्रस्‍ताविक केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले.  हणमंत गजधने यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top