Add

Add

0
         पत्रकारिता व अभिनय या दोन्ही क्षेत्राने एकत्रित येवून 
                                   कल्याणकारी कार्य करावे... 
फलटण (रोहित वाकडे ):-एकीकडे माध्यम क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील पत्रकारांना आजही पत्रकारितेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक प्रश्‍नांना वाचा फोडताना अनेकदा त्यांना आपला जीवही धोक्यात घालावा लागतो. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. आज अनेक युवा पत्रकार या क्षेत्रात येत आहेत. त्यांना मुलाखतीचे, वार्तांकनाचे तंत्र याच्या प्रशिक्षणाची गरज आहे. पत्रकारिता आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात ग्लॅमर आहे. मात्र या दोन्हीही क्षेत्रातील अनेक लोकांचा निवृत्तीनंतरचा काळ अत्यंत खडतर असतो. त्यामुळे पत्रकारिता व अभिनय या दोन्ही क्षेत्राने एकत्रित येवून यासाठी कल्याणकारी कार्य करावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली. 
भारतीय पत्रकार संघाच्यावतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून नाशिक येथील औरंगाबादकर सभागृहात राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेडकिहाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते व झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवर्‍याची बायको’ फेम अभिजीत खांडकेकर, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, अखिल भारतीय प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, निमा, सातपुराचे अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी, मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी, भारतीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांची उपस्थिती होती.
या समारंभात रविंद्र बेडकिहाळ यांना ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कारा’ने तर अभिजीत खांडकेकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षण, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांनाही यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. 
बेडकिहाळ पुढे म्हणाले, बर्‍याचदा कार्यातून निवृत्त झालेल्या व्यक्तींचा सन्मान ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने केला जातो. मात्र बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने मिळालेला हा जीवन गौरव सन्मान आपल्याला कार्यासाठी आणखी प्रेरणा आणि उर्जा देणारा असून इथून पुढेही ग्रामीण भागातील पत्रकारांच्या कल्याणासाठी व बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरण कार्यात आपण शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहोत. विविध क्षेत्रातील लोकांना एकत्रित करुन त्यांचा सन्मान करणे हे भारतीय पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद असल्याचे बेडकिहाळ यांनी सांगून कार्यक्रमाच्या उत्कृष्ठ संयोजनाबद्दल महेंद्र देशपांडे यांचे विशेष अभिनंदन केले. 
अभिजीत खांडकेकर म्हणाले, पत्रकारितेत काम करणे किती अवघड आहे याचा आपल्याला जवळून अनुभव आहे. सुरुवातीच्या काळात सहा वर्षे आपण वृत्तनिवेदक म्हणून काम केले. त्यानंतर अभिनय क्षेत्राकडे वळालो. मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. भारतीय पत्रकार संघाने आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला त्यामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. आजच्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने मान्यवरांचा सहवास लाभला हा देखील मोठा सन्मान आहे असे सांगून समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे जागृत नागरिक चौकस नजरेने हुडकले याबद्दल संयोजक कौतुकास पात्र आहेत, असेही खांडकेकर म्हणाले.
राजीव बर्वे म्हणाले, पुरस्कार देताना आपण ते ज्यांना देतो त्यामुळे पुरस्कारांची उंची आणखी वाढत असते. रविंद्र बेडकिहाळ यांनी पत्रकारितेत केलेले कार्य लाखमोलाचे असून त्यांना दिलेला जीवन गौरव पुरस्कार योग्यच आहे. अशा प्रकारे सेवेचा गौरव केल्यावर त्या कार्याला स्फूर्ती मिळते. अभिजीत खांडकेकर हे देखील उमदे अभिनेते आहेत, असे सांगून सर्व पुरस्कारार्थ्यांना बर्वे यांनी शुभेच्छा दिल्या. 
जयप्रकाश छाजेड म्हणाले, राजकारण आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सामान्यांच्यात जागृती ही बाळशास्त्रींची पत्रकारितेमागील भावना होती. आज पत्रकारितेचे क्षेत्र बदललेले आहे. माध्यमांमध्ये कितीही बदल झाले तरी वर्तमानपत्राशिवाय दिवस सुरु होत नाही. फलटणसारख्या निमशहरी भागातून गेली 40 वर्षे वृत्तपत्र चालवणे, वृत्तपत्रसृष्टीच्या जनकाचे स्मरणकार्य करणे हे बेडकिहाळ यांचे काम कौतुकास्पद आहे. नाशिक हे धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्र आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील अभिजीत खांडकेकर यांचे काम उत्तम आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे भारतीय पत्रकार संघाचे काम अभिमानास्पद असल्याचेही छाजेड यांनी सांगीतले. 
यावेळी शिल्पी अवस्थी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
महेंद्र देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्‍या मान्यवरांचा आज सन्मान होत असल्याचे सांगून भारतीय पत्रकार संघाच्या कार्याची सविस्तर माहिती देवून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. 
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.भावना कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्योती सोनवणे, रविंद्र नेरकर, उषा गवई, सायली पालखेडकर, कृतिका मराठे, अमोल भालेराव, लक्ष्मीकांत कोटकर, राजेश आंधळे, वासंती जोगेदव, सुहासिनी नाईक, हेमंत मराठे, सुषमा पगारे, चिराग देशपांडे, सौ.वैजयंती सिन्नरकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त गजानन पारखे, दैनिक यावल समाचारचे प्रमोद वाणी, ‘लोकजागर’चे संपादक रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top