Add

Add

0

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी,पुणे,भारततर्फे शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्माच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या पंचकन्यांना
‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर...!

पुणे(प्रतिनिधी ):-विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या सहाव्या पुण्यस्मरण/ स्मृतिदिनाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका व आदिवासी मुला- मुलींसाठी कार्य करणार्‍या श्रीमती निर्मला (देवकी) नवल सोनीस (नंदुरबार), ज्येष्ठ कीतर्नकार व प्रवचनकार ह.भ.प.सौ.प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी (बीड), आरोग्य सेवा देणार्‍या डॉ.शशिकला अनंत सांगळे (पुणे), ज्येष्ठ समाजसेविका  डॉ. रोहिणी वासुदेव पटवर्धन (पुणे) आणि आदिवासी गरीब कुटुंबाची पालन पोषणाची सेवा करणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका सौ. मधुरा मुकुंद भेलके (पुणे) या पंचकन्यांना “पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आदिवासी मुलांसाठी आश्रामशाळा चालविणार्‍या व ज्येष्ठ समाजसेविका सौ. सुशिला रतनलाल सोनग्रा (पुणे) यांना “विशेष जीवन गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. 
सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. 11,000/- (रुपये अकरा हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार, दि. 31 मे 2019 रोजी, सकाळी  10.15 वा. मानवतातीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रामेश्‍वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार आहे. 
या समारंभासाठी लातूरचे माजी खासदार मा.डॉ. गोपाळराव पाटील हे सन्माननीय प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व कृषीतज्ञ मा.डॉ. शिवाजीराव शिंदे आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व नाशिक येथील नवसंजीवनी वर्ल्ड पीस रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी विश्‍वस्त मा.श्री. सुभाषराव देशमुख हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली,जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरं गाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे.  
पुरस्कारार्थींचा अल्प परिचय खालीलप्रमाणे-
श्रीमती निर्मला (देवकी) नवल सोनीस (नंदुरबार)ः-या ज्येष्ठ समाजसेविका असून नंदुरबार येथील आदिवासी मुला- मुलींची लग्ने लावून देणे, गरीब विद्यार्थ्यांसाठी फी माफ करणे, आदिवासी भागात निःशुल्क शिक्षण देणे, गरीब विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तके वाटणे ही सेवा करतात. तसेच, खेडोपाडी जाऊन कुटुंब नियोजनाची माहिती देऊन समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. आदिवासी क्षेत्रातील मुलांसाठी करीत असलेल्या बहुमूल्य कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थाकडून गौरव करण्यात आला आहे.
ह.भ.प. सौ. प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी (बीड)ः- या मराठवाड्यातील पहिल्या महिला कीर्तनकार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रात 5000 पेक्षा अधिक कीर्तने करून त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले आहे. महिला सक्षमीकरण, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, स्त्रीभ्रुण हत्या हे पाप आहे, स्वच्छतेचा संदेश, महिला बचत गट आदी सामाजिक मूल्यांचा कीर्तनातून प्रचार करीत आहेत. तसेच साक्षरता अभियान अंतर्गत प्रचार कीर्तने करतात.
डॉ.शशिकला अनंत सांगळे (पुणे)ः- बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसन विभागाच्या त्या विभाग प्रमुख आहेत. नोकरी करून सरकारी आरोग्याच्या सर्व सेवा गरीबांपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्या करीत आहेत. तसेच, आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सेवा देत आहेत. स्वाईन फ्लू सारखा संसर्ग रोगाच्या वेळेस त्यांनी राज्यात प्रमुख भूमिका पार पाडली.
डॉ. रोहिणी वासुदेव पटवर्धन (पुणे)ः- एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रोहिणी पटवर्धन यांनी सन वर्ल्ड फॉर सिनियर्स या वृध्दाश्रमाची स्थापना करून जवळपास 40 ज्येष्ठांची त्या सेवा करीत आहेत. वृध्दांना भेडसावणार्‍या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना संजीवन मंत्र देऊन कृतिशील जगण्याचे बळ देण्याचे कार्य करीत आहेत. 1983 मध्ये एक दशलक्ष चौरस फूट जमीन दान करून शिक्षणाच्या माध्यमाद्वारे समाजहिताचे कार्य चालू ठेवले. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना बर्‍याच संस्थेतर्फे पुरस्कृत करण्यात आले. 
सौ. मधुरा मुकुंद भेलके (पुणे)ः- यांनी आदिवासी गरीब कुटूंबाची पालन पोषण व शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे.तसेच,रामकृष्ण मठाद्वारे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक्स-रे सारख्या आधुनिक आरोग्य सुविधा देण्याचे कार्य करीत आहेत.क्षितिज संस्था मार्फत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ग चाल वितात. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. ग्रामस्थांसाठी नेत्र शिबीर व आरोग्य शिबीर चालवितात.  
सौ. सुशिला रतनलाल सोनग्रा(पुणे)ः -यांचा जन्म मध्यप्रदेश येथील खंडवामध्ये गरीब कुटुंबात झाला. बालवयातच लग्न झाल्यामुळे शिक्षण बंद झाले. अचानक पतीचे निधन झाल्यामुळे घरचा गाडा चालवि ण्यासाठी त्यांनी जुन्या कपड्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातच भोपाळ गॅस दुर्घटनेच्या वेळी मदर टेरेसाचे कार्य पाहण्याचा योग आला. त्यांनी सुरू केलेल्या आदिवासी आश्रमशाळेत १५० मुलांना मोफत शिक्षण देत आहेत. 

      

Post a Comment

 
Top