Add

Add

0
  सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या       जन्मोत्सवानिमित्त भव्य  दिंडी पायी दिंडीमध्ये हिंदु राष्ट्राचा उद्घोष 

       पुणे(प्रतिनिधी ):- सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या 77 व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिंडीमध्ये हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यात आला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासह अन्य अनेक समविचारी संघटनांचे कार्यकर्ते या दिंडीत सहभागी झाले होते. भिकारदास मारुती मंदिर येथून शंखनाद आणि धर्मध्वजाचे पूजन करून या दिंडीला प्रारंभ झाला. पुढे शनिपार चौक - लक्ष्मी रस्ता - अलका टॉकीज चौक - लकडी पूल मार्गे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे दिंडीची सांगता झाली. 
   नऊवारी साडी परिधान केलेल्या रणरागिणी, पारंपारिक वेशात सहभागी झालेले कार्यकर्ते, 
क्रांतिकारकांच्या वेशातील बालसाधक, स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे क्षात्रवीर हे या दिंडीचे वैशिष्ट्य ठरले. चौकाचौकांत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि भवानीमाता यांची प्रतिमा असलेल्या पालख्यांचेही अनेकांनी दर्शन घेतले. शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता,अलका टॉकीज चौक आदी ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत करण्यात आले.
           परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे स्वतः संमोहन उपचारतज्ञ असून विज्ञानाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर त्यांनी अध्यात्ममार्गावर प्रवास चालू केला. संत भक्तराज महाराज हे त्यांना गुरू म्हणून लाभले. गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनी अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. सत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मशिक्षणवर्ग, ग्रंथलेखन आदी माध्यमातून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू असतानाच त्यांनी राष्ट्ररक्षण,धर्मजागृती आणि समाजसाहाय्य या त्रिसूत्रीच्या आधारेही कार्य आरंभले. पुढे कालानुरूप धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. कलियुगात जलद अध्यात्मिक उन्नती करून देणाऱ्या 'गुरुकृपायोग' या योगमार्गाची त्यांनी निर्मिती केली आणि व्यष्टीसाधने सह समष्टी साधनेचाही पुरस्कार केला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक जण साधना करत आहेत आणि राष्ट्ररक्षण, तसेच धर्मजागृतीच्या कार्यात सहभागी होत आहेत. सनातन वैदिक हिंदु धर्म, राष्ट्र यांना पुनर्प्रतिष्ठा  प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नरत रहाणे, हीच त्यांच्याप्रती  खरी कृतज्ञता ठरेल ! त्याच भावनेपोटी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. 

Post a Comment

 
Top