Add

Add

0
              मुळशी सत्याग्रह दुर्लक्षून चालणार नाही प्रत्येक
               लढा काहीतरी शिकवत असतो-- अभय चव्हाण

पौड (प्रतिनिधी ):-मुळशी सत्याग्रहाची नोंद इतिहासात अयशस्वी लढा म्हणून झाली. अपेक्षित उद्देश साध्य नाही झाला तर तो लढा अयशस्वी म्हणून ओळखला जातो. असे असले तरी मुळशी सत्याग्रहासारखे लढे दुर्लक्षून चालत नाही. ते काही शिकवून जातात जे समाजाला पुढील वाटचाल करायला उपयोगी ठरतात, असे प्रतिपादन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले.
बबन मिंडे यांनी संपादित केलेल्या मुळशी सत्याग्रह विशेषांकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. पोलीस उपअधीक्षक सई भोरे-पाटील, मुळशी सत्याग्रहाचे प्रवर्तक विनायकराव भुस्कुटे यांचे नातू विजय भुस्कुटे, विनीता भुस्कुटे, रामचंद्र दातीर, नितीन ढेपे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी चव्हाण पुढे म्हणाले की, लौकिकार्थाने मुळशीचा सत्याग्रह अयशस्वी झाला असला तरी हा लढा शेतकऱ्यांना एक नवी दिशा दाखवून गेला. त्यामुळे कोणतीही गोष्ट काहीतरी शिकवत असतेच. मुळशीच्या सत्याग्रहातूनही इतिहासाच्या पानांवर उमटलेल्या अशा अनेक गोष्टी या विशेषांकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील. भोरे-पाटील म्हणाल्या की, आपल्याला अनेकदा भोवतालच्या समाजातील श्रद्धा, परंपरा, इतिहास माहीत असतोच असे नाही. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यातून आपल्याला तो समाज समजून घेता येतो. मुळशी सत्याग्रह विशेषांकातून मिंडे यांनी तो आपल्यासमोर ठेवला आहे. विजय भुस्कुटे यांनी आपले आजोबा विनायकराव भुस्कुटे यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड न करता मुळशी सत्याग्रहात स्वतःला कसे झोकून दिले याच्या आठवणी सांगून मिंडे करत असलेल्या इतिहास लेखन कामाला शुभेच्छा दिल्या. विशेषांकाचे संपादक मिंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मुळशी तालुक्याची खरी ओळख ही मुळशी पॅटर्न नसून मुळशी सत्याग्रह आहे. काळाच्या ओघात ती ओळख पुसली जात असताना हा विशेषांक आपल्यासमोर येत आहे. मुळशी सत्याग्रह हा अखंड हिंदुस्तानातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेला हा पहिला लढा आहे. भारताच्या इतिहासातील ते एक सोनेरी पान आहे. तालुक्याची ही खरी ओळख आपण विसरून चालणार नाही. 
बंडू दातीर यांनी सूत्रसंचालन केले. रमेश ससार यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top