Add

Add

0
     संसार हा खो-खो चा खेळ ह.भ.प.श्री. भानुदास महाराज तुपे
पुणे (प्रतिनिधी ):- “संसार हा खो - खो चा एक खेळ आहे. यात जुनी पिढी नव्या पिढीला सर्व काही सोपवून स्वतः परमार्थाच्या मार्गाला लागतात व पांडुरंगाच्या नामस्मरणात लीन होतात. याच पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण सर्व वारकरी पंढरपूरची वारी करतो. जन्म-मरणाची वारी चुकविण्यासाठी ही आळंदी ते पंढरपूर ही वारी महत्वाची आहे.” असे विचार संत साहित्याचे अभ्यासक, थोर कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प.श्री. भानुदास महाराज तुपे यांनी मांडले. 
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्याच्या प्रस्थान निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे दुसरे पुष्ण गुंफताना ते बोलत होते.
याप्रसंगी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठान, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, पं.उध्दवबापू आपेगावकर, ह.भ.प. चिन्मयमहाराज दांडेकर, श्री. बाळासाहेब रावडे, ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, ह.भ.प. शालीग्राम खंदारे आणि ह.भ.प. नलावडे महाराज हे उपस्थित होते.
ह.भ.प.श्री. भानुदास महाराज तुपे म्हणाले “या विज्ञान युगात पैसा स्वस्त झाला पण माणूस महाग झाला आहे. तो आता माणसासारखा वागत नाही. हा दुर्गण काढण्यासाठी माणसाला पांडुरंगाच्या चरणी स्वतःला अर्पण करावे लागेल. व्यक्तीने स्त्रीची आसक्ती धरू नये कारण या सृष्टीवरी तीच सर्व श्रेष्ठ आहे. ज्या घरात स्त्रियांचा आदर सत्कार होतो त्यांच घरी लक्ष्मी नांदते. सर्वच क्षेत्रात त्यागाची महती आहे. कारण त्यागात सुख, समाधाना बरोबरच आनंद दडलेला असतो. घरच परमार्थ तीर्थ असल्याने सर्वांनी घराकडे लक्ष द्यावे. संतांच्या वचनाप्रमाणे वागणे म्हणजे संतांची सेवा होय.”
“आजच्या युगात सर्व नद्यांची साफ-सफाई होणे गरजेचे आहे. इंद्रायणी व चंद्रभागा या नद्या जरी पवित्र असल्या तरी त्या अशुध्द झाल्या आहेत. या नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी सरकार पैसा देते पण ते पैसे जातात कुठे हा एक मोठा प्रश्‍न आहे. तसेच, सर्व वारकर्‍यांनी वारीच्या वेळेस प्रदूषण टाळावे. त्यासाठी सरकारने पंढरपूरला पूर्वीपेक्षा कितीतरी चांगली सोय केलेली आहे. त्याचा पुरेपूर वापर करावा.”
यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री. बाबामहाराज सातारकर यांच्या सुकन्या ह.भ.प.श्रीमती भगवतीताई दांडेकर (सातारकर) यांचे कीर्तन झाले. तसेच, प्रसिद्ध गायिका व त्यागमूर्ति श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्राप्त श्रीमती गोदावरीताई मुंडे व ह.भ.प.श्री. रमेशबुवा शेनगांवकर यांच्या सांप्रदायिक संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 
वरील कार्यक्रमाचा इंद्रायणीच्या दोन्हीही तीरावरील लाखो वारकर्‍यांनी अध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला.    

Post a Comment

 
Top