Add

Add

0
‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘कलेतील सूक्ष्म पैलूंचे मूल्यांकन करणे’
 या विषयावरील संशोधन लिस्बन, पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !
आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध कलाकृतीतून समाजासह वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात अन् त्यात सामाजिक परिवर्तन घडवण्याची क्षमता असते !
 पुणे (प्रतिनिधी ):- कलाकृतीतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा, म्हणजेच कलाकृतीचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की, आतापर्यंत कलाकृतींचे ज्या प्रकारे मूल्यांकन आपण केले आहे, ते पुन्हा करावे लागणार आहे. चित्रकार कितीही नावाजलेला असला, तरीही तो सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारी  देवतांची किंवा अन्य कोणतीही चित्रे बनवू शकेलच, असे नाही. सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारी आध्यात्मिक दृष्टीकोनातून शुद्ध असलेली अशी कलाकृती घडवण्यासाठी कलाकाराने आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेल्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे आवश्यक आहे. कलाकाराने अध्यात्मशास्त्रानुसार काढलेली देवतांची चित्रे ही सकारात्मक स्पंदनांचा स्रोत असून त्यातून समाज आणि वातावरण यांत सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात अन् अशा कलाकृतींमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. द्रगाना किस्लौस्की यांनी केले. 

             लिस्बन, पोर्तुगाल येथे 19 ते 21 जून या कालावधीत समाजातील कलांसंदर्भातील आयोजित केलेल्या 14 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. सौ. द्रगाना किस्लौस्की यांनी या परिषदेमध्ये ‘कलेतील सूक्ष्म पैलूंचे मूल्यांकन करणे’, हा शोधनिबंध 21 जून या दिवशी सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर सौ. द्रगाना किस्लौस्की आणि श्री. शॉन क्लार्क हे त्याचे सहलेखक आहेत. या परिषदेचे आयोजन अमेरिकेतील इलिनॉय येथील ‘कॉमन ग्राऊंड रिसर्च नेटवर्कस्’(Common Ground Research Networks) या संस्थेच्या ‘द आर्टस् इन सोसायटी रिसर्च नेटवर्क’ (The Arts in Society Research Network) या शाखेने केले होते.

            सौ. द्रगाना किस्लौस्की यांनी विविध चित्रांच्या संदर्भात केलेल्या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या विविध प्रयोगांची विस्ताराने माहिती दिली. यात त्यांनी ‘पिप (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या संशोधनाची माहिती  दिली. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या तंत्रज्ञानाद्वारे काढलेल्या छायाचित्रांत (‘पिप’ छायाचित्रांत) सजीव किंवा निर्जिव वस्तू यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. एका संतांच्या मार्गदर्शनाखाली साधक चित्रकाराने १२ वर्षांच्या कालावधीत काढलेल्या श्री गणपतीच्या संगणकीय ६ चित्रांची ‘पिप’ छायाचित्रे दाखवली. त्या चित्रांतील श्री गणेशतत्त्वाच्या प्रमाणात वाढत जाणारे सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ‘पिप’ छायाचित्रांतून स्पष्टपणे लक्षात येत होते. याउलट एका प्रसिद्ध चित्रकाराने व्यावसायिक हेतूने काढलेल्या देवतांच्या विडंबनात्मक चित्रांतून प्रक्षेपित होणारी नकारात्मक स्पंदने त्या चित्रांच्या ‘पिप’ छायाचित्रांतून स्पष्टपणे लक्षात येत होती.

            सौ. द्रगाना किस्लौस्की यांनी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यू.टी.एस्.) या भूतपूर्व अणुवैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केलेल्या उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनाची माहिती दिली. या उपकरणाद्वारे कोणत्याही सजीव किंवा निर्जिव वस्तूमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा, तसेच त्या वस्तूभोवती असलेली एकूण प्रभावळ मोजता येते. या उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या प्रयोगांत मिळालेल्या निष्कर्षांसारखेच होते. या वेळी सौ. द्रगाना किस्लौस्की यांनी सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असणार्‍या साधकांनी अध्यात्मशास्त्रानुसार काढलेली देवतांची चित्रे आणि विडंबनात्मक चित्रे यांच्याकडे पाहून त्यांना दिसणारी सूक्ष्मातील प्रक्रिया उलगडण्यासाठी काढलेली चित्रे (सूक्ष्म-चित्रे) दाखवली. ही सूक्ष्म-चित्रे प्रभावळ मापक उपकरणांद्वारे मिळणार्‍या छायाचित्रांपेक्षा १० हजार पट अधिक सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारी असतात. त्यामुळे ती महत्त्वाची आहेत. त्यामध्ये सुप्रसिद्ध चित्रकाराने काढलेल्या देवतेच्या विडंबनात्मक चित्रात नकारात्मक स्पंदने आणि अध्यात्मशास्त्रानुसार काढलेल्या देवतेच्या चित्रात सकारात्मक स्पंदने असतात, हे दिसून आले.

             या प्रयोगाअंती सौ. द्रगाना किस्लौस्की यांनी ‘लाखो रुपये व्यय करून घेतलेले नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारे चित्र, मग ते एका प्रसिद्ध कलाकाराने काढलेले का असेना, घरात लावणे योग्य आहे का ?’, असा प्रश्‍न विचारला. हा प्रश्‍न उपस्थितांना केवळ अंतर्मुख करणाराच नव्हे, तर कलाकृतीकडे अध्यात्मिक दृष्टीकोनांतून पहाण्याचा दृष्टीकोन देणारा होता. देवतांच्या चित्रांनंतर सौ.द्रगाना किस्लौस्की यांनी व्यक्ती चित्रांचा (‘पोर्ट्रेट’चा) विषय मांडला. त्यात त्यांनी ‘मोना लिसा’ हे जगप्रसिद्ध व्यक्तीचित्र आणि एका साधना करणार्‍या चित्रकाराने एका संतांचे रेखाटलेले व्यक्तीचित्र या दोन्हीचे ‘पिप (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाद्वारे अन् ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यू.टी.एस्.) या उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनाची माहिती दिली. ‘मोना लिसा’ हे जगप्रसिद्ध व्यक्तीचित्र नकारात्मक, तर संतांचे चित्र सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारे होते, असे या दोन्ही उपकरणांद्वारे केलेल्या संशोधनात दिसून आले. याचे कारण सांगतांना सौ. द्रगाना म्हणाल्या, ‘‘संतांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे संतांच्या चित्रातही सकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा लाभ आपल्यासह वातावरणाला होतो.’’

            शेवटी शोधनिबंधाचे सार मांडतांना सौ. द्रगाना किस्लौस्की म्हणाल्या, ‘‘प्रसिद्ध चित्रकार सकारात्मक स्पंदने असणारी चित्रे काढू शकतीलच, असे नाही. आम्ही केलेल्या अभ्यासात जगातील सर्वांत महागड्या 21 चित्रांपैकी 2 चित्रांमधून अल्प प्रमाणात, तर उर्वरीत सर्व चित्रांतून पूर्णपणे नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे आढळले. आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध कलाकृती घडवण्यासाठी मुळात त्या कलाकृतीचा विषय सात्त्विक असायला हवा आणि त्या विषयातील सकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होईल, अशाप्रकारे त्याचे चित्र काढायला हवे.’’

Post a Comment

 
Top