Add

Add

0

बिग बॉस मराठी -2 च्या घरात एका भाकरीवरून मोठा राडा,

           एक डाव भुताचा टास्कला जोरदार सुरूवात...


बिग बॉस मराठी २च्या घरात एक साधी भाकरी आज मोठ्या वादाचं कारण ठरली आणि त्यावरून हिना पांचाळ झाली टार्गेट. तर दुसरीकडे घरात एक डाव भुताचा या टास्कला जोरदार सुरूवात होताना दिसली.

मुंबई(प्रतिनिधी ):-बिग बॉस मराठी-2 चं घर अजब आहे.इथे क्षणात नाती बदलताना दिसतात तर एखादी क्षुल्लक गोष्ट एका मोठ्या भांडणाचं कारण अगदी सहज ठरू शकते. आज घरात असंच झालं आणि एक भाकरी घरात अनेक वादांचं कारण बनली. सध्या घरात स्पर्धकांना नियम तोडल्याची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे घरात मोजकेच खाद्यपदार्थ उपलब्ध असल्यामुळे फार विचारपूर्वक स्वयंपाक बनवला जात आहे. तर आज जेव्हा सगळ्या स्पर्धकांसाठी घरात चपात्या बनत होत्या तेव्हा हिनाने तिच्या वाटणीच्या पिठाच्या भाकऱ्या बनवण्यास रूपालीला आधीच सांगितलं होतं. त्यावर रूपाली तिला हो म्हणाली. पण थोड्या वेळानं सगळं चित्रंच बदलून गेलं.
वीणाच्या आईचा वाढदिवस असल्या कारणानं वीणाला तिच्या आईसाठी पिठाचा शिरा बनवायचा होता. त्यामुळे उरलेलं पीठ रूपाली वीणाला द्यावं की हिनासाठी ठरल्याप्रमाणे भाकरी बनवावी यामध्ये गोंधळली. यावर घरात हिनासाठी खास काही वेगळं बनायची गरज नाही असं मत पडलं. त्यावर हिनाने तिने आधीच याची कल्पना दिल्याचं सांगितलं. पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. पीठ उरलं होतं तिच्या वाटणीचं ती स्वतः बनवून घ्यायला ही तयार होती. पण घरात नसताना सुद्धा वीणाच्या आईच्या वाढदिवसासाठी बनणाऱ्या शिऱ्यावर कोणाला आक्षेप नव्हता पण घरात राहणाऱ्या स्पर्धकाच्या जेवणावरून वाद होत होता. हा वाद खूप वाढला.
किशोरी यांनी सगळ्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणालाच समजून घ्यायचं नव्हतं. हिनानं नंतर घरचा कॅप्टन अभिजीतला विनंती केली की उरलेल्या पिठात काही बनू शकत नाहीय तर ते पीठ तिला देण्यात यावं.पण यावर सुद्धा पुन्हा मोठा वाद निर्माण झाला. किशोरी हिनाची बाजू घेत आहे म्हटल्यावर वीणा किशोरी यांच्यावर पण चिडली आणि त्यांना सुद्धा उद्धटपणे उत्तरं देताना दिसली. अखेर किशोरी यांचा संयम तुटला आणि त्यांनी मोठ्या आवाजात वीणाला खडसावून बरंच काही सुनावून टाकलं. अखेर बऱ्याच वाद आणि गोंधळानंतर हिनाला भाकरी बनवण्यास परवानगी मिळाली. काही वेळानं घरात बिग बॉस यांनी बरंच खाण्याचं सामान पाठवलं आणि स्पर्धकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हे होतं ना होतं तेच घरात या आठवड्याचा साप्ताहिक टास्क एक डाव भुताचा जाहीर झाला.ज्यासाठी दोन टीम निवडल्या गेल्या. पहिल्या दिवशी भूताची टीम होती अभिजीत-वैशाली-शिव-वीणा तर शिकारींची टीम होती माधव-नेहा-हिना-रूपाली तर किशोरी या टास्कच्या संचालिका होत्या. भूत बनलेल्या स्पर्धकांच्या नावाच्या बाहुल्या लपवण्याचं काम शिकारी टीमनं करायचं होतं. तर एका खोलीतच बंद असलेल्या भुतांनी बजर वाजताच त्यांच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून आपआपल्या बाहुल्या शोधायच्या होत्या. बाहुली मिळताच एक भिंत ओलांडून दुसऱ्या बाजूच्या भुतांच्या सेफमध्ये जायचं आहे. जो आपल्या नावाची बाहुली किंचाळी व्हायच्या आत सेफमध्ये नेऊ शकणार नाही तो पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सी रेसमधून बाहेर होईल असं जाहीर करण्यात आलं.
टास्क तर जोरदार सुरू झाला आणि दोन्ही टीम आपआपली कामं चोख बजावत होती. त्यातच बजर वाजण्याआधी काही वेळ असल्यामुळे खोलीत बंद भुतांनी बाहेर असलेल्या शिकारी स्पर्धकांसोबत डील करायला सुरूवात केली. त्यातच बजर वाजला आणि सगळी भूतं आपल्या बाहुल्या शोधायला बाहेर आली. काही वेळातच सगळ्यांना आपल्या बाहुल्या मिळाल्या आणि शिव, वीणा आणि अभिजीत भिंत पार करून सेफमध्ये पोहचले पण वैशाली मात्र भिंत पार करू शकली नाही आणि त्यामुळे टास्क आणि कॅप्टन्सी रेसमधून ती बाहेर झाली. आता पुढच्या भागात हा टास्क पुढे सरकताना दिसेल आणि त्या अंती या आठवड्याच्या कॅप्टन्सीचे उमेदवार ही स्पष्ट होतील.

Post a Comment

 
Top