Add

Add

0
                             शिवपूर्वकालीन दक्षिणाभिमुख गणेशगुळे... 


      रत्नागिरीच्या दक्षिणेला 20 कि.मी. अंतरावर शिवपूर्वकालीन श्रीलंबोदराचे स्थान आहे. दर्यावर्दी गलबतवाल्यांचा गणपती म्हणून ओळखले जाणारे स्थान सागरकिनारी वसलेल्या निसर्गसंपन्न गणेशगुळे या गावी आहे. ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला’ या जुन्या म्हणीमुळे अनेक अख्यायिकाही आहेत. हे ठिकाण पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपासून अवघ्या 2 कि.मी. अंतरावर असून स्वामींची या स्थानावर अढळ श्रद्धा होती.
पौराणिक कथेनुसार लंबासुराचा वध करण्यासाठी अवतरलेले लंबोदर हे गणपतीपुळे येथे युद्ध करीत असताना लंबासुर गणेशगुळे येथे पळाला. तेथेही लंबोदराने त्यास गाठले. आपले प्राण वाचविण्यासाठी लंबासुर मध्य प्रदेशातील ॐकार ममलेश्वर येथे आला व त्याने नर्मदेत उडी मारली.लंबोदराने शिवाची उपासना करून लंबासुर वधासाठी आवश्यक त्रिशूळ शिवाकडून प्राप्त करून घेतले.लंबासुराचा वध केला. तेव्हापासून गणशगुळे, गणपतीपुळे व ॐकारेश्वर (मध्यप्रदेश) येथील पंचसोंडय़ा गणपती ‘लंबोदर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
स्थानिक कथेनुसार पावस गावचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण गणेशभक्त पोटशूळाच्या विकाराने आजारी पडले. आजार असह्य झाल्याने गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले. परंतु वाटेतच इतक्या वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे जाता येईना, त्यामुळे तेथेच एका झुडुपात ते पडून राहिले. तेथे त्यांनी गणेश अनुष्ठान व नामस्मरणाला प्रारंभ केला. जीवघेण्या वेदनांमध्येही त्यांची निरपेक्ष करुणायुक्त उपासना सुरूच होती. यातूनच त्यांना श्रीगणेशाची ध्यानावस्था प्राप्त झाली. 21 दिवसानंतर श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला, ‘तू व्याधीमुक्त होशील. माझे येथे अवशेषात्मक वास्तव्य आहे. येथे तू माझे मंदिर बांध. या कामी तुला सातारचे शाहू महाराज मदत करतील.’ येणेप्रमाणे शाहू महाराजांनाही दृष्टांत होऊन त्यांचा जासूस आर्थिक मदतीसह गणेशगुळे येथे पोहोचला. यातूनच या मंदिराची उभारणी झाली. चिपळूणकरांचा पोटशूळ गणेशकृपेने बरा झाल्याची वार्ता गावात पसरली. त्यातून हा गणपती पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्धी पावला. 
या काळात दु:खी व पीडित लोक मोठय़ा प्रमाणावर श्रीगणेशाची उपासना करू लागले. गणपतीच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडे. परंतु नंतर एके दिवशी ‘शिवाशिवीमुळं’ हे झिरपणारे पाणी बंद पडले. त्याच दिवशी गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळे येथे स्थलांतर केले, अशी आख्यायिका सांगतात. स्थलांतरादरम्यान गणेशपावलांचे ठसे पावस मार्गावरील डोंगरात दिसतात, असे म्हणतात. स्थानिक भंडारी समाजाचे हे महत्त्वाचे श्रद्धास्थान असून समुद्रप्रवासापूर्वीच्या त्यांच्या विधीवत पूजनातून ‘गलबतवाल्यांचा गणपती’ अशी एक ओळख या ठिकाणाला मिळाली.
हे मंदिर जांभ्या दगडात बांधलेले असून चौथरा डोंगराच्या पाश्र्वभूमीवर 40 फूट उंचीचा आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 द्वारे आहेत. या दोनही दालनांना जोडणारी 12 फूट उंचीची शिळा म्हणजेच श्रीगणेश असे मानले जाते. संपूर्ण डोंगर गणेशमय झाला आहे. अनेक गणेशभक्तांना या ठिकाणी श्रीगणेश साक्षात्कार झाला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे तीन दिवसांचा उत्सव साजरा होतो. माघी गणेशोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. मंदिराचे आवार निसर्गरम्य असून येथे 70 फूट खोल विहीर आहे. पश्चिमेस पसरलेला अथांग सागर अन् अनेक ठिकाणी खाडीच्या स्वरूपात जमिनीत शिरलेली समुद्राचे पाणी यातून जाणवणारे नयनरम्य निसर्गसौंदर्य येथे दिसते.
                                                                                                              धीरज वाटेकर 
                                                                                                                                                                         dheerajwatekar.blogspot.in                              हेदवी गावातील ‘श्रीदशभुजलक्ष्मीगणेश’ मंदीर


डाव्या मांडीवर अष्टसिद्धिंपैकी ‘सिद्धलक्ष्मी’ विराजमान असलेल्या श्रीगणेशाचे कोकण किनारपट्टीवरील गुहागर तालुक्यातील हेदवी येथील ‘श्रीदशभुजलक्ष्मीगणेश’ हे पेशवेकालिन दुर्मिळ व एकमेवाद्वितीय स्वरूप गणेशभक्तांना आकर्षित करते. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्राने वेढलेल्या हेदवीतील या लक्ष्मीगणेश मंदिराच्या परिसरात गेल्यावर मनाला एक शांतता लाभते. मंदिराचा पूर्वेतिहास फारसा उपलब्ध नसल्याने या मंदिराला काही कथांचेही वलय मिळाले आहे. 

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी तत्कालीन पेशव्यांनी एका मंदिरात स्थापना करण्यासाठी खास काश्मीरहून ही मूर्ती मागवली होती. मात्र ती ठरलेल्या वेळेत न आल्यामुळे नियोजित मंदिरात दुसऱ्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. काश्मीरहून आलेली मूर्ती गणेशाचे उपासक आणि तीर्थाटन करून धर्मप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या केळकरस्वामी नामक गणेशभक्ताकडे देण्यात आली. एका कथेनुसार, याच दरम्यान पुण्याच्या एका जहागीरदाराला केळकरस्वामींच्या कृपाशीर्वादाने पुत्र झाला होता. त्यांनी केळकरस्वामींना मंदिर बांधण्यासाठी अमाप धन दिले. धन व मूर्ती घेऊन केळकरस्वामी हेदवी या आपल्या जन्मगावी आले आणि त्यांनी मंदिर बांधले. दुसऱ्या एका कथेनुसार पेशव्यांच्या द्रव्य सहाय्यातूनच हे मंदिर बांधले गेले. ही वैशिष्टय़पूर्ण मूर्ती स्वामींना दिलेल्या दृष्टांतानुसार घडवलेली आहे. दोन फूट उंचीच्या आसनावर साडेतीन फूट उंचीची शुभ्रधवल संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीला दहा हात असून डाव्या मांडीवर अष्टसिद्धिंपैकी एक ‘सिद्धलक्ष्मी’ बसलेली आहे. उजव्या वरच्या पहिल्या हातात चक्र, दुसऱ्यात त्रिशूळ, तिसऱ्यात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या आशीर्वादाच्या हातात महाळुंग फळ आहे. डाव्या बाजूच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्यात पाश, तिसऱ्यात नीलकमळ, चौथ्या हातात दात (रतन) व पाचव्या हातात धान्याची कोंब आहे. सोंडेत अमृतकुंभ अर्थात कलश दिसतो. गळ्यात नागयज्ञोपवीत आहे. या गणेशमूर्तीच्या पुढय़ात एक तांब्याची मूर्ती आहे. त्या मूर्तीवर षोडशोपचार केले जातात. त्यापुढे पादुका असून त्यावर शेंदूर वाहिला जातो. गाभाऱ्यात मोक्याच्या ठिकाणी आरसे बसवल्याने मूर्तीवरील कोरीवकाम पाहता येते. गाभाऱ्यात कुठेही उभे राहिले तरी मूर्ती आपल्याकडे पाहत असल्याप्रमाणे त्रिमितीय नेत्ररचना आहे. नेपाळमध्ये अशा स्वरूपाच्या मूर्ती आहेत. पूर्वी भारतात अशा शस्त्रसज्ज मूर्ती पूजायचा अधिकार केवळ सेनानेतृत्व करणाऱ्या सेनापतीस असे. संपूर्ण पेशवाईत अशा तीन-चार मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. मंदिराभोवती किल्ल्याची आठवण करून देणारा तट, वैशिष्टय़पूर्ण दगडी दीपमाळ, सुंदर फुलांचा बगीचा, मंदार, शमी, आम्रवृक्ष, कळसाचा व घुमटाचा आकार एकूणच हिरव्या-निळ्या पाश्र्वभूमीवरील गुलाबी रंगाचं प्राधान्य असलेले हे मंदिर अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे. सन 1995 पर्यंत हा सारा जंगलमय दुर्लक्षित परिसर काकासाहेब जोगळेकर व शंभू महादेव हेदवकर यांनी प्रयत्नपूर्वक सन 1956 मध्ये जीर्णोद्धारित केला आहे. मंदिर गुहागरपासून मोडकाआगर- पालशेतमार्गे 24 कि.मी. अंतरावर आहे. तर चिपळूणपासून 51 कि.मी. अंतरावर आहे. 
याच हेदवी गावात आलात तर समुद्रकिनाऱ्यावर ‘समुद्रघळ’ नामक निसर्गनवल पाहण्यासारखे आहे. उमामहेश्वराच्या मंदिरामागे काळ्याकभिन्न खडकात एक भेग पडली असून भरतीचे पाणी वेगाने आत शिरून निर्माण होणारा जलस्तंभ पाहणे केवळ अविस्मरणीय आहे.
                                                                                        धीरज वाटेकर 

Post a Comment

 
Top