Add

Add

0

                  रामनदी घेणार मोकळा श्वास...

पुणे (प्रतिनिधी ):-अतिक्रमण, प्रदूषण, मानवी हस्तक्षेप आणि कचऱ्यामुळे संकटात सापडलेल्या रामनदीला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेण्याची संधी मिळावी,यासाठी गेल्या महिनाभरात रामनदी परिसरात लोकचळवळ उभी राहिली आहे.रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध संस्थांमधील जलप्रेमी एकत्र आले असून, त्यांनी महिनाभरात केलेल्या कामांमुळे खाटपेवाडी तलावाची पातळी 25 टक्क्यांनी वाढविण्यास यश आले आहे. तलावाच्या जैवविविधतेला कुठेही धक्का न लावता, कार्यकर्त्यांनी तलावाची स्वच्छता आणि किनाऱ्यांच्या पुन:आखणीला सुरुवात केली आहे.
'किर्लोस्कर वसुंधरा क्लब'च्या पुढाकारातून रामनदी पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी जीवित नदी, बायोस्फिअर्स,इकॉलॉजिकल सोसायटी,जलबिरादरीसह विविध संस्था एकत्र आल्या आहेत. या संदर्भात वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड,शैलजा देशपांडे,डॉ.सचिन पुणेकर, विनोद बोधनकर, डॉ. गुरुदास नूलकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष माधव चंद्रचूड म्हणाले, 'पहिल्या टप्प्यात खाटपेवाडी तलावाचे पुनरुज्जीवन हा या अभियानाचा केंद्रबिंदू आहे. केतकी घाटे यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनाचे प्रारुप आखले असून,पुणेकर यांनी जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिको नातून सहकार्य केले आहे. या 30 दिवसांच्या कालावधीतील कामामुळे खाटपेवाडी तलावाची सुमारे 25 टक्के पाणीपातळी वाढली आहे; याशिवाय निसर्गाला हानिकारक ठरणाऱ्या बेशरमसारख्या परदेशी वनस्पती हटवून स्थानिक वनस्पतींची लागवड; तसेच पक्ष्यांची घरटी आणि अंडी जपणे अशी कामे सुरू आहेत.
मोहिमेत काय?
- भुकूम येथील ऐतिहासिक रामेश्वर मंदिर म्हणजे रामनदीचा उगम..
- मंदिर परिसरातील तीन विहिरी आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन
- खाटपेवाडी तलाव आणि परिसरातील मानवनिर्मित कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान
- जलस्रोतांच्या परिसरातील जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करणे
- परदेशी वनस्पती हटवून स्थानिक प्रजातीच्या तणांचे रोपण करणे

Post a Comment

 
Top