Add

Add

0
         नवभारतासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरजः डॉ.मिश्रा 
        डॉ. एस.एन.पठाण यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमात घडले जीवन शिक्षण विषयक चिंतन 


पुणे(प्रतिनिधी ):-“ देशाच्या प्रगतीचे सर्वात मोठे माध्यम शिक्षण आहे. नव भारताचे स्वप्न पाहावयाचे असेल तर आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे बीज पेरावे लागतील. त्यासाठी नव्या पिढीसमोर आम्हाला फक्त चित्रातील रोल मॉडलची गरज नाही तर संघर्षातून शिक्षण घेऊन नवनिर्माण करणार्‍यांची गरज आहे.” असे विचार कराड येथील कृष्णा मेडिकल अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी मांडले.
ग्लोबल हेल्थ केअर आणि एज्युकेशन फाउडेशन, किवळे आणि महा फेडरेशन ऑफ मायनॉरिटीज एज्युकेशन इन्स्टिट्युशन फॉर डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड वेल्फेअर, पुणे यांच्यातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांच्या वयाच्या सत्तरीपूर्ती निमित्त अल्पबचत भवन सभागृह येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला राज्यभरातील शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार हे होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड आणि सिंबायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ. एस.बी.मुजुमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
तसेच, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, एन.सी.जोशी, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, स्पायसर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय अडसूळ, मौलाना मुफ्ती शाकीर खान आणि लतीफ मगदूम हे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले,“ सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याची क्षमता फक्त शिक्षणातच आहेे. शिक्षण हे जीवनाला उंच स्तरापर्यंत नेते. त्यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते. या देशात एकता व समरसता केवळ शिक्षणामुळेच येऊ शकते. शिक्षण हे सर्वापर्यंत पोहोचविण्याचे काम डॉ. एस.एन. पठाण यांनी केले. ते समाजाला प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहेत. समता, समवेदना आणि समानुभूती या महान व्यक्तीनी दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे.”
डॉ.पी.ए. इनामदार म्हणाले,“स्वातंत्र्योत्तर काळात जी प्रगती झाली ती पाच हजार वर्षात झालेली नव्हती. आपला भूतकाळ चांगला असल्याने वर्तमानात कष्ट करीत असल्याने भविष्यकाळ उत्तम आहे. कष्टातून पुढे आलेल्या व्यक्तीमुळे जग घडत असते, डिजीटल दरीमुळे होणार्‍या दुष्परिणामातून हे जग बाहेर काढण्याचे प्रयत्न आता जुन्या जाणत्यांनी केले पाहिजेत.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले “ जगात धर्माच्या नावावर हिंसाचार फोफावत असताना शुध्द माणुसकीची जपणूक करणारे डॉ. पठाण यांच्यासारख्या माणसांची गरज या देशाला  आहे. ते पवित्र कुराणाचा संदेश असून त्यांचे अंतःकरण शुध्द आहे. डॉ. पठाण यांनी सर्व समाजाला नमाज म्हणजे योग आहे याची प्रचिती करून दिली आहे. त्यांना कुराणाचा खरा अर्थ समजला त्यामुळे ते सामाजिक सद्भावनेचे कार्य करीत आहेत.”
डॉ. एस.बी. मुजुमदार म्हणाले “शिक्षण हा प्रगतीचा प्राणवायू आहे. हा देश तीन स्तरांमध्ये आहे. त्यात अती श्रीमंत, मध्यम आणि गरीब. परंतू देशाच्या सहा लाख खेड्यांमध्ये विखूलेल्या गरीबांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली पाहिजे. जीवनात वर यावयाचे असेल तर त्यासाठी फक्त शिक्षण आणि शिक्षणच आहे. त्यामुळे या देशात संरक्षणानंतर सर्वात जास्त खर्च शिक्षणावर केला गेला पाहिजे. 
डॉ.पठाण यांनी आपल्या कर्तृत्वातून ही किमया करून दाखविली की शिक्षण हे व्यक्ती, समाज आणि देशाचा विकास करते. यांचा सत्कार हा शिक्षण मार्गाचा सत्कार आहे. शिक्षणाची गुणवत्ता विकसित झाली तर देशाचा विकास होईल.”
डॉ. एस.पठाण म्हणाले,“ माझ्या कष्टाची फुले झालेली आहेत. नियत साफ असल्याने जीवनाच्या प्रवासात ईश्‍वराची सतत मदत मिळाली. भारतीय संस्कृतीने मला मोठे केले. त्या संस्कृतीचा विश्‍वात्मक संदेश पुढे नेण्याचे काम करीत राहीन.”
यावेळी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील यशस्वी प्रेरणादायक व्यक्तिमत्वांचा सत्कार ही येथे करण्यात आला. त्यात जिल्हाधिकारी अय्याझ तांबोळी, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख, डॉ. तौसिफ मलिक, गीतांजली शेळके, डॉ. संजीव खुर्द, मारूती भांडकोळी, आकांक्षा चव्हाण यांचा समावेश होता.
डॉ. एस.एन.पठाण यांचा वाढदिवस असल्याचे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी समृध्द मातृभूमी या मासिकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.सर्फराज पठाण यांनी प्रास्ताविक केले. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के.जी. पठाण यांनी आभार मानले.


Post a Comment

 
Top