Add

Add

0
                ताम्हिणी अंधारबनमध्ये जाण्यास मज्जाव ?पौड (वार्ताहर):-मुळशी तालुक्यातील ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यातील प्लस व्हॅली आणि सुधागड वन्यजीव अभयारण्य भागातील अंधारबन भागात पर्यावरणाच्या दृष्टीने ठरवून देण्यात आलेल्या अतिसंवेदनशील भागात 15 जुलै ते 15 ऑगस्टदरम्यान पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. ही माहिती ताम्हिणी वनपरिक्षेत्र विभागाच्या वनाधिकारी अंकिता तरडे यांनी दिली.
पश्चिम घाटातील पर्यटकांचा बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. या भागातील महत्त्वाची जैवविविधता नष्ट झाली आहे. तसेच पर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रशासनाने त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे; त्यामुळे यापुढील काळात या परिसरात बेतालपणे वर्तन करणार्‍यांवर व नियम तोडणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सन 2013 च्या राज्य वन विभागाच्या अधिनियमानुसार ताम्हिणी घाटातील अभयारण्याची नोंद आहे. 49.62 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले हे अभयारण्य वेगवेगळ्या 12 भागांत विभागले असून, ते पुणे वन विभागात येते. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या 25 प्रजाती आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी  ‘शेकरू’ याचाही समावेश आहे. याबरोबरच बिबट्या, भेकर हेदेखील या परिसरात आढळतात. 150 हून अधिक पक्ष्यांच्या जाती आणि फुलपाखरांच्या 70 पेक्षा अधिक प्रजातींचे वास्तव्य या अभयारण्यात आहे. 
अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत प्रसिध्द ठिकाण आहे. येथे सातत्याने पर्यटकांची वर्दळ सुरू असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. काही खासगी ट्रेकर संस्था या ठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन करतात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी असतेे. मात्र आता 15 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास बंदी आहे.
पर्यटकांकडून वन विभागाच्या वतीने नमूद केलेल्या कुठल्याही नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय त्यात दोषी आढळल्यास पर्यटक अथवा संबंधित सहल आयोजकाला शिक्षेला सामोरे जावे लागेल. 
                                             अंकिता तरडे, वनाधिकारी, ताम्हिणी अभयारण्य 

Post a Comment

 
Top