Add

Add

0

              महाराष्ट्राच्या सामाजिक,राजकीय चळवळींमध्ये 
            प्रत्येक कालखंडात मराठी पत्रकारिता निर्णायक ठरली 
फलटण(रोहित वाकडे ):- महाराष्ट्राच्या आजवरच्या साहित्यिक,सामाजिक,राजकीय चळवळींमध्ये प्रत्येक कालखंडात मराठी पत्रकारिता निर्णायक ठरली आहे. आचार्य अत्रे, आगरकर, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा वेगवेगळ्या प्रवाहातील पत्रकारिता व समाजसुधारणा जर आपण लक्षात घेतली तर याचे मुळ बाळशास्त्री जांभेकरांच्या कर्तृत्त्वात आहे.1832 साली बाळशास्त्रींनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली मात्र त्यांचे कार्य राजकारणी, साहित्यिक यांच्याबरोबर पत्रकारही विसरले ही शोकांतिका आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. 
येथील अमर शेंडे लिखीत ‘बाळशास्त्री’ चरित्राचे प्रकाशन डॉ.सबनीस यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलींद जोशी होते. व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विवेकशिलता हा पत्रकारितेतला आणि सांस्कृतिक जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ती विवेकशिलता आज लोप पावताना दिसत आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय सामाजिक सुधारणा घडू शकत नाही ही वास्तवता बाळशास्त्रींना ज्ञात होती. जांभेकर ब्रिटीशांच्या नोकरीमध्ये जरी असले तरी इंग्रजांच्या राज्याचे समर्थन करणारे ते नव्हते. स्वातंत्र्याची आकांक्षा त्यांच्याही मनात होती. बाळशास्त्रींचे चरित्र व चारित्र्य त्यांच्या मर्यादा आणि सामर्थ्यासह मांडण्याचा प्रयत्न लेखक अमर शेंडे यांनी या चरित्रात केला आहे, असेही डॉ.सबनीस यांनी सांगीतले. 
प्रा.मिलींद जोशी म्हणाले, ज्ञाननिष्ठा आणि विज्ञाननिष्ठेचा विकास हा भारतीय समाजजीवनामध्ये झाला पाहिजे हे बाळशास्त्रींचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’ सुरु केले. त्यांच्या अभ्यासाला आणि चिंतनाला सखोलता होती. वृत्तपत्र हे समाजजीवनाचे संस्करण करण्याचे माध्यम आहे आणि पत्रकार शिलवान, चारित्र्यवान, सुबुद्ध आणि जाणता असला पाहिजे ही जाण भारतीय समाजामध्ये निर्माण करण्याचे काम बाळशास्त्रींनी केले. ‘बाळशास्त्री’ या चरित्रात नायकाचे केवळ गुणगान न करता वस्तुस्थिती समोर ठेवून बाळशास्त्रींच्या कृर्तृत्त्वाचा परिचय लेखकाने आपल्यासमोर ठेवलेला आहे. 
रविंद्र बेडकिहाळ यांनी, ज्या बाळशास्त्रींनी मराठी वृत्तपत्रसृष्टीला दिशा आणि दृष्टी दिली त्यांच्या कार्याचा साहित्यिक, पत्रकार व सत्ताधार्‍यांना विसर पडलेला आहे. कर्मभूमी मुंबईमध्ये बाळशास्त्रींचे आजही स्मारक नाही, अशी खंत व्यक्त करुन बाळशास्त्रींच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांच्या नावे दरवर्षी एक व्याख्यान आयोजित करावे असे आवाहन केले. 
‘बाळशास्त्री’ या चरित्रामुळे तरुण पत्रकारांना ‘दर्पण’कारांच्या कार्याची ओळख होईल, असे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगीतले. सुभाष शिंदे यांनी, या नवसाहित्याचे स्वागत वाचकांनी करावे असे आवाहन केले. 
लेखक अमर शेंडे यांनी, गेल्या वीस वर्षापासून रविंद्र बेडकिहाळ यांच्यामुळे जांभेकरांच्या कार्याशी जोडलो गेलो आहे. त्यांच्या कार्याच्या प्रभावातून हे चरित्र लिहिले. या पुस्तकरुपी चरित्रात प्रसंगानुरुप चित्रे समाविष्ट केली आहेत. त्यामुळे हे चरित्र नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. 
प्रास्ताविक सौ.अलका बेडकिहाळ यांनी केले. उपस्थितांचे स्वागत अनंतराव शेंडे फौंडेशनचे अध्यक्ष रमेशचंद्र शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी ताराचंद्र आवळे यांनी तर आभार सौ.स्मिता शेंडे यांनी मानले. कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त, सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य, पुणे व फलटण येथील लेखक, वाचक, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चौकट : 
रविंद्र बेडकिहाळ यांच्या आवाहनानुसार, मसाप पुणेच्यावतीने बाळशास्त्रींच्या जयंतीदिनी दि.20 फेब्रुवारी रोजी प्रतीवर्षी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वावर एक व्याख्यान आयोजित केले जाईल असे प्रा.मिलींद जोशी यांनी जाहीर केले. तर पहिले व्याख्यान मी देईन, असे डॉ.श्रीपाल सबनीस यांनी सांगीतले. 

Post a Comment

 
Top